टाटा मोटर्सची सुरूवात ट्रक बनवण्यापासून नाही तर स्वदेशी रणगाडे बनवण्यातून झाली.

टाटा उद्योगसमूह म्हणजे भारताचा अभिमान. अगदी मिठापासून ते अत्याधुनिक सॉफ्टवेअर पर्यंत प्रत्येक गोष्ट सचोटीने आणि विश्वासाच्या भक्कम पायावर त्यांनी बनवली. भारताची आत्मनिर्भर होण्याची स्वदेशी गाथा म्हणजे टाटा !

अशा या टाटांचा फ्लॅगशिप उद्योग म्हणजे टाटा मोटर्स. याची सुरवात केली होती जे आर डी टाटा यांनी !

गोष्ट आहे चाळीसच्या दशकातली. जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातून साकारले गेलेले टाटा स्टील हे जगातल्या सर्वोत्तम स्टीलपैकी एक असे गणले जात होते. त्यांचा जमशेदपूर मधला पसारा प्रचंड मोठा झाला होता. हजारो हाताना काम मिळाल होतं.

भल्यामोठ्या टाटा उद्योग समूहाची धुरा जेआरडी टाटांच्या खांद्यावर आली तेव्हा त्यांचं वय फक्त ३४ वर्षे होतं. युरोपात शिकून आलेले जे आरडी टाटा हे नाविन्याचे भोक्ते होते. पारंपारिक कारखान्यापेक्षाही येत्या भविष्यात भारताला कोणत्या गोष्टी लागतील यासाठी नवीन उद्योग सुरु करण्याकडे त्यांचा कल होता.

यातूनच जेआरडी यांनी जुन्या संचालकांचा सल्ला मोडून नवनवीन प्रयोग सुरु केले.

दुसऱ्या महायुद्धाचा काळ. याच काळात अत्याधुनिक शस्त्रास्त्रे निर्मितीची देखील स्पर्धा सुरु झाली होती. यात जर्मनी व अमेरिका आघाडीवर होतेच पण प्रत्येक देश आपल्या स्वसंरक्षणासाठी सज्ज राहण्यावर भर देत होता.

भारतावर तेव्हा ब्रिटीशांच राज्य होत. भारताचा तसा महायुद्धाशी संबंध नव्हता तरी इंग्लंडवर जर्मनीने हल्ला केल्यामुळे त्यांचा मांडलिक देश म्हणून पर्यायाने आपण ही युद्धात ओढले गेलो होतो. इंग्रजांचे शत्रू ते भारताचे शत्रू बनले. भारतीय सैन्य इंग्लंडच्या युद्धात लढू लागलं.

दूर युरोपमध्ये असलेल्या जर्मनीला भारतावर हल्ला करता येणे अवघड होते पण पूर्वेला असलेला जपान मात्र कधीही भारतावर चालून येईल याची शक्यता होती.

यामुळे आपल्यालासुद्धा युद्धाची तयारी करणे भाग होते.

या परिस्तिथीची जाणीव सर्वप्रथम जेआरडी टाटांना झाली. म्हणूनच त्यांनी निर्णय घेतला भारतात व्हील आर्मरड कॅरियर बनवायचे. इंग्लंडला युद्धात याची कमतरता भासतच होती. एरवी भारतीय उद्योगांना बंधनात जखडून टाकणाऱ्या ब्रिटीश सरकारने टाटांना यासाठी आनंदाने परवानगी दिली.

साधारण १९४० सालच्या दरम्यान टाटांनी कॅनडामधून फोर्ड गाडीचे चासिस मागवले. त्यावर टाटा स्टील कारखान्यात तयार होणारे खास प्रकारचे १४ इंची जाड स्टीलचे पत्रे बसवून भारताचे पाहिले स्वदेशी बनावटीचे रणगाडे तयार केले.

इंडियन पॅटन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रणगाड्यांना ब्रिटीशांनी नाव दिल, “टाटानगर”

जवळपास २६०० किलो वजनाचं हे धूड असूनही ८०च्या वेगाने हा रणगाडा धावू शकत होता. यात चार सैनिक बसू शकत होते. ट्रकप्रमाणे याला स्टिअरिंग होतं. तर शत्रूवर हल्ला करण्यासाठी एक ब्रेन लाईट मशीनगनसुद्धा बसवलेली होती. प्रसंगी अॅन्टी एअरक्राफ्ट मिसाईलगन सुद्धा या रणगाड्यावर वापरली जायची.

टाटानगर रणगाडे जमशेदपूरला असलेल्या रेल्वेवर्कशॉपमध्ये बनत होते.

पुढे १ सप्टेंबर १९४५ साली जे आरडी यांनी टाटा इंजिनियरिंग अँन्ड लोकोमोटिव्ह या कंपनीची स्थापना केली, आणि टाटानगर रणगाडे तिथे बनवण्यास सुरवात केली. याचाच अर्थ टेल्को उर्फ टाटा मोटर्सची पहिली निर्मिती ट्रक नसून पहिले स्वदेशी रणगाडे होते.

या टाटानगर रणगाड्यांनी दुसऱ्या महायुद्धात प्रचंड मोठा पराक्रम दाखवला.

युद्धभूमीवर शत्रूंच्या प्रचंड मोठ्या बॉम्बवर्षावातही टाटानगर रणगाडे ठामपणे उभे राहिले. त्यावर बसवलेल्या टाटांच्या पोलादी स्टीलला कितीही मोठा बॉम्बस्फोट झाला तरी साधे पोचे यायचे पण आतल्या सैनिकांना जराही धक्का बसायचा नाही.

जॉण किनन या ब्रिटिशाने एकेठिकाणी लिहून ठेवलं आहे,

“जर टाटानगर रणगाडे नसते तर जपान्यांनी इंग्रजांच्या हातातून भारत सहज हिसकावून घेतला असता.”

पुढे भारताला स्वातंत्र्य मिळालं. नव्या सरकारने संरक्षणविषयक धोरणे बदलली. टाटांनीदेखील ट्रक निर्मिती मध्ये उडी घेतली. भारताचे स्वदेशी रणगाडे विस्मरणात गेले. अगदी काही वर्षांपूर्वी म्हणजे २०१४ साली आर्मीच्या स्क्रपयार्ड मध्ये भंगारात पडलेले दोन टाटानगर रणगाडे सापडले. आर्मीने ते टाटांना सुपूर्द केले. त्यांच्या इंजिनियरिंग टीमने त्याला पुन्हा उभा केल. त्यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाच्यादिवशी जमशेदपूरमधल्या फेरीत या रणगाड्याने सहभाग देखील घेतला.

आपल्या इतिहासाची झळाळती आठवण टाटांनी जमशेदपूरच्या कारखान्यात उभी करून ठेवलेली आहे. आजही ते पराक्रमी रणगाडे आपल्याला तिथे पाहायला मिळतात.

हे ही वाच भिडू.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.