टाटांच्या सक्सेस स्टोरीची सुरवात मुंबईत नाही तर नागपूर मध्ये झाली..

मूळचे ते व्यापारी नव्हतेच. टाटा हे पारसी समाजातील पौरोहित्य करणारं घरं. गुजरात मधल्या नवसारी गावाचे. नुसरेवान जेव्हा जन्मला तेव्हा एका म्हाताऱ्या ज्योतिषाने भविष्य सांगितलेलं,

“संपूर्ण जगाला पालथं घालेल इतका पैसा हा मुलगा कमवणार आहे.”

खरोखरच नुसरेवान महत्वाकांक्षी होता. शिक्षण काही नव्हतं, व्यापार काय असतो याची काही माहिती नव्हती. भांडवल नव्हतं पण काही तरी वेगळं करण्याची दुर्दम्य इच्छाशक्ती होती. अगदी लहान वयात लग्न झालेलं. वयाच्या सतराव्या वर्षीच थोरला मुलगा झाला होता. त्याच नाव ठेवलं जमशेद. त्याला सुद्धा पंडित करायचं घरच्यांच्या डोक्यात खूळ शिरलं. हि बातमी कळताच नुसरेवानने ठरवलं आता गावात राहायचं नाही. मुंबईला जायचं.

मुंबईत काही मित्र होते. त्यांच्या मदतीने तिथे व्यवसाय सुरु केला.

नुसरेवान यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. त्यांनी आपलं सगळा कुटूंब कबीलाच मुंबईला आणलेला. परतीचे दोर कापले होते. व्यापाराची माहिती घेत जपून हळुवार पावले ते टाकू लागले. आपलं शिक्षण झालं नाही याची नुसरेवान याना कायमची खंत होती.

नुकतंच इंग्रजांचं भारतावर राज्य स्थापन झालं होतं. एल्फिन्स्टन सारख्या खुल्या विचाराच्या अधिकाऱ्याने भारतात आधुनिक शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याच्याच नावाने सुरु झालेल्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये शिकून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधुनिक भारताची पायाभरणी करण्यास सुरवात केली.

नुसरेवान याने काळाची पावले ओळखत आपल्या लेकाला इंग्रजी शिक्षण मिळणाऱ्या शाळेत घातले.

तो हुशार देखील होता. त्याने पहिल्या फटक्यात महाविद्यालयाचा ग्रीन स्कॉलर हि पदवी मिळवत शिक्षण पूर्ण केलं. सुरवातीला स्वतःच्या पायावर उभं राहायचं म्हणून एकेठिकाणी नोकरी देखील केली पण लवकरच वडिलांच्या व्यवसायात दाखल झाला.

नुसरेवान यांनी त्याला व्यापाराच्या निमित्ताने परदेशी हॉंगकॉंगला पाठवलं. पहिल्याच फटक्यात त्याने तिथं अफूच्या व्यापारात आपले पाय रोवले. युरोपशी कापसाचा आणि चीनशी अफूचा व्यापार करून जमशेद आणि नुसरेवान यांची बापलेकाची जोडी चांगलाच पैसे कमवू लागली.

त्याकाळी अमेरिकेतूनही युरोपला कापूस निर्यात व्हायचा.मात्र तिथे झालेल्या यादवी युद्धामुळे कापूस व्यापार थांबला आणि भारतातून युरोपला कापूस पाठवणाऱ्या व्यापाऱ्यांची चांदी झाली. यात टाटा देखील होते. त्यांनी थेट लंडनला आपले ऑफिस उघडले.

जमशेदची नेमणूक लंडन ऑफिसवर झाली. तिथे असताना त्याच्या लक्षात आलं कि अमेरिकेतील यादवी युद्ध संपलं कि आपल्याला लागलेल्या या लॉटरीचा अंत होणार. तिथल्या स्वस्तात पिकणाऱ्या कापसाशी स्पर्धा आपल्याला जमणार नाही. आणि घडलंही तसंच. अमेरिकेतून कापूस निर्यात पुन्हा सुरु झाल्यावर भारतीय व्यापाऱ्यांचा फुगा फुटला. प्रेमचंद रायचंद सारख्या कापूस सम्राटाची कंपनी धुळीस मिळाली.

टाटांच्या मागे देणेकऱ्यांचा ससेमिरा सुरु झाला. खुद्द जमशेद टाटा एकेठिकाणी कर्जवसुली अधिकारी म्हणून नोकरीला लागले. नुसरेवान यांनी बांधलेला सात मजली वाडा विकून हे पैसा फेडावं लागला.

अमेरिकेत घडलेल्या घटनेमुळे त्यांचा व्यापार देशोधडीला लागला तसाच आफ्रिकेत घडलेल्या एका घटनेमुळे त्यांचे सगळे अपयश धुवून निघालं.

ऍबसिनिया येथे सुरु झालेल्या युद्धात इंग्रजांना रसद पुरवण्यासाठी एका कंत्राटदाराची आवश्यकता होती. यात टाटा उतरले. त्यांनी या व्यवहारात तब्बल ४० लाख रुपये कमवले. यात आलेला पैसे कुठे तरी गुंतवायचा हे त्यांच्या डोक्यात पक्क बसलं होतं.

अमेरिकन कापूस संकटामुळे भारतातील सगळा माल पडून होता. या स्वस्तात उपलब्ध झालेल्या कापसाचं कापड करून विकलं तर भरपूर पैसे कमवता येईल हे टाटांच्या डोक्यात बसलं. त्यासाठी त्यांनी मुंबईत एक गिरणी चालवायला घेतली. अलेक्झांड्रिया नावाची हि कापड गिरणी त्यांनी दोन वर्ष चालवली. त्यात पैसे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं. हि गिरणी त्यांनी विकून टाकली.

आता एकच लक्ष्य डोक्यात होतं, स्वतःची स्वदेशी कापड गिरणी सुरु करायची.

ते वर्ष होत १८७३. जमशेदजी टाटा पुन्हा लंडनला गेले. तिथे जाऊन त्यांनी वेगवेगळ्या कारखान्यांचा अभ्यास केला. भारतात इंग्लंडमध्ये देखील नसेल अशी अत्याधुनिक कापड गिरणी सुरु करायचं त्यांच्या मनात होतं. त्याकाळी फक्त अमेरिकेत मिळणारे काही मॉडर्न टेक्नॉलॉजी असणारे माग त्यांनी खरेदी केले.

हि कापड गिरणी सुरु करायचं ठिकाण सुद्धा त्यांनी वेगळं निवडलं. त्याकाळी भारतातल्या सगळ्या कापड गिरण्या या मुंबईत नाही तर अहमदाबाद येथे असायच्या. टाटांनी ठरवलं की आपली गिरणी मुंबईत नाही तर कापूस जिथे पिकतो त्या ठिकाणी उभी करायची.

हे ठिकाण होतं नागपूर.

तिथं एक पाणथळ जागा त्यांना मिळाली. ती जागा वापरात आणण्यासाठी त्यांना भराव घालावा लागणार होता. बरेच पैसे खर्च झाले. त्यासाठी त्यांनी स्थानिक सावकाराला काही कर्जाऊ रक्कम मागितीला. तेव्हा त्याने चक्क नकार दिला.

इतक्या भंगार जमिनीसाठी सोन्यासारखा पैसे घालताय. काहीही हाती लागणार नाही.

जमशेदजी जराही नाराज झाले नाहीत. त्यांनी भांडवल उभं केलं. जमीन सपाट केली. तांत्रिक दृष्ट्या कार्यक्षम करण्यासाठी बेझनजी मेहता आणि जेम्स ब्रकुसबी नावाच्या इंजिनियरला घेतलं. ब्रूक्स आणि डॉक्सी नावाच्या कंपनीतून आपल्याला हवे तसे खास माग बनवून घेतले.

१ जानेवारी १८७७ रोजी ही गिरणी उदयास आली. तिला नाव देण्यात आले एम्प्रेस मिल.

नुकताच इंग्लंडची राणी व्हिकटोरीया हिला भारताची सम्राज्ञी म्हणून घोषित करण्यात आलं होतं. तिच्या स्मरणार्थ या गिरणीला एम्प्रेस हे नाव देण्यात आले होते. जमशेजी यांनी आपलं ठाण नागपूर मध्ये मांडलं. हि गिरणी उभी करण्यापासून तिला प्रगतीच्या शिखरावर नेई पर्यंत ते नागपुरातच होते.

जवळपास चार वर्षे त्यांनी नागपुरात वास्तव्य केलं.

नागपुरातच असताना त्यांनी भारतात पहिल्यांदा आपल्या कर्मचाऱ्यांसाठी भविष्य निर्वाह निधीची सुरवात केली. त्यांनी तिथे आपल्या कामगारांसाठी लागू केलेल्या तरतुदी तेव्हा इंग्लंड अमेरिकेमध्ये देखील नव्हत्या. भविष्य निर्वाह निधीच तर जगभरातून कौतुक करण्यात आलं. टाटा हे नाव एम्प्रेस मिल मुळे सगळीकडे फेमस झालं. त्यांना फर्स्ट फॅमिली ऑफ इंडियन इंडस्ट्री हे नाव मिळालं.

टाटांच्या घरात लक्ष्मी आली ती नागपूरच्या एम्प्रेस मिल मुळे. याच मिलच्या जोरावर त्यांनी पुढे यशाची शिखरे पार केली.

हि फॅक्ट्री फक्त टाटांच्याच नाही तर एकूण भारताच्या उद्योग जगताची सुरवात मानली जाते. पुढे जवळपास शंभर वर्षांनी सरकारने ती ताब्यात घेतली. २००२ साली तिच्या चिमणीने अखेरचा श्वास घेतला. मात्र त्याच्या आधी तिने कित्येक विक्रम आपल्या नावावर केले.

हे ही वाच भिडू.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.