टाटा सन्सचे चेअरमन, टाटांशी भांडणं सायरस मिस्त्रींची कारकीर्द मृत्यूसारखीच धक्कादायक होती

टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू  झाला आहे. अहमदबादहून मुंबईला येत असताना पालघरजवळील चारोटी येथे त्यांची गाडी डीव्हाडरला धडकून गाडीचा भीषण अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की गाडीतल्या चौघांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सध्या शापूरजी पालनजी या प्रसिद्ध उद्योगसमूहाचे अध्यक्ष असणारे सायरस मिस्त्री खरे चर्चेत आले जेव्हा त्यांची २०१२ मध्ये टाटा ग्रुपच्या चेअरमनपदी नियुक्ती झाली होती.

टाटा उद्योगसमूहाच्या १४४ वर्षांच्या इतिहासात चेअरमानपदी निवड होणारे ते टाटा कुटुंबा बाहेरचे दुसरेच व्यक्ती होते. त्याआधी 1932 मध्ये दोराबजी टाटा यांच्या नंतर नवरोजी सकलातवाला हे टाटा समूहाचे पहिले नॉन टाटा चेअरमन होते.

 विशेष म्हणजे सायरस मिस्त्री मोठ्या बिझनेसमन फॅमिलीतून येत होते. शापूरजी पालनजी ह्या ग्रुपचे सध्या चेअरमन होते तो त्यांच्याच फॅमिलीचा.

अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे या मिस्त्री कुटुंबाचा टाटा ग्रुपशी संबंध फार जुना राहिला आहे. 

मिस्त्री कुटुंबाचा टाटांशी संबंध 1930 मध्ये सुरू झाला जेव्हा शापूरजी पालनजी मिस्त्री यांनी एफ इ दिनशॉ इस्टेटमधून टाटा सन्सचे 12.5 टक्के शेअर्स विकत घेतले. त्यानंतरही मिस्त्रींनी टाटा समूहाचे शेअर्स विकत घेण्याचा सपाटा चगळूच ठेवला आणि शापूरजी पालनजी समूहाची टाटा सन्समधली होल्डिंग सुमारे १६.५ टक्क्यांवर नेली.  मिस्त्री यांनी टाटा कंपनीतील आपली हिस्सेदारी कायम ठेवण्यासाठी ९० च्या दशकात टाटा सन्सच्या राइट्स इश्यूमध्ये ६० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक केली होती.

1938 मध्ये टाटा समूहाचे चेअरमन बनलेल्या जेआरडी टाटा यांना सुरुवातीला मिस्त्री यांनी टाटा सन्समध्ये मोठा हिस्सा खरेदी करण्याला विरोध केला होता.

मात्र त्यानंतर दोन्ही कुटुंबामध्ये  पॅचअप झाले. टाटा ग्रुप जसा जसा फॉरमात येत गेला तस तसा मिस्त्री कुटुंबाच्या संपत्तीतही झपाट्याने वाढ होत गेली.

हि भागीदारी मजबूत करण्यासाठी पालनजी मिस्त्री यांनी आपली मुलगी आलू हिचे रतन टाटा यांचे सावत्र भाऊ नोएल टाटा यांच्याशी लग्न लावून दिले. आलू या सायरस मिस्त्री यांच्या बहीण.

त्यामुळे सायरस मिस्त्री पूर्णपणेच टाटा समूहाच्या बाहेरील होते असं नाही.

त्यामुळे २०१२ मध्ये रतन टाटा यांनी रिटायर्ड होण्याचा आणि टाटा सन्सची जबाबदारी एक विश्वासू माणसावर सोपवण्याचा निर्णय घेतला तेव्हा सायरस मिस्त्री हेच नाव त्यांच्या डोळ्यासमोर आलं.सायरस मिस्त्री यांनी जेव्हा टाटा सन्सची जबाबदारी हातात घेतली तेव्हा त्यांची शापूरजी पालनजी ग्रुप त्यांच्या टाटा समूहातील सर्वात मोठा स्टेकहोल्डर होता. 

मात्र यापलीकडे जाऊन सायरस मिस्त्री यांचा करियर प्रोफाइलही बेस्टच होता. 

सायरस यांनी आपलं शालेय शिक्षण मुंबईच्या प्रतिष्ठित कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूलमधून पूर्ण केलं होतं. तर पुढच्या शिक्षणासाठी ते लंडनला गेले. लंडनच्या इंपीरियल कॉलेजमधून त्यांनी सिविल इंजिनिअरिंग पूर्ण केली तर लंडन बिझनेस स्कुलमधून त्यांनी एमबीएची डिग्री पूर्ण केली होती. म्हणजे घरचा कंस्ट्रक्शनच्या बिझनेस चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या दोन्ही डिग्र्या त्यांच्याकडे होत्या.

आणि अपेक्षेप्रमाणे त्यांनी आपल्या घरच्याच शापूरजी पालनजी या बांधकाम व्यवसायात मोठं नाव असलेल्या कंपनीत काम करण्यास सुरवात केली.त्यावेळी त्यांचे वडील पालनजी मिस्त्री हे टाटा ग्रुपच्या डायरेक्टर बॉडीवर होते. त्यानंतर २००६ मध्ये पालनजी रिटायर झाले आणि वयाच्या अडतिसाव्या वर्षी सायरस मिस्त्री टाटा ग्रुपचे डायरेक्टर झाले.

त्यानंतर नीरा राडिया टेपमध्ये बदनामी झाल्यानंतर २०१२ मध्ये टाटा संघूची धुरा पुढच्या पिढीच्या हाती सोपवण्याचा निर्णय रतन टाटा यांनी घेतला तेव्हा त्यांनी सायरस मिस्त्री यांनाच आपल्या जागी नियुक्त केलं.

सायरस मिस्त्री यांचीचेअरमनपदी निवड झाल्यानंतर त्यांनी टाटा समूहात मोठ्या प्रमाणात बदल करण्यास सुरवात केली. 

त्यांच्या काळात समूहाने भांडवली खर्च मोठ्या प्रमाणात वाढववाल्याने टाटा ग्रुपवर कर्जाचा डोंगर उभा राहत होता. त्याचबरोबर त्यांनी कंपनीतल्या रतन टाटा यांच्या जवळच्या माणसांना ही बाहेरचा रास्ता दाखवण्यास सुरवात केली होती. त्यांचे काही निर्णय ज्यामध्ये ब्रिटनमधील  टाटा स्टील पोर्ट प्लांटची विक्री करण्याचा निर्णय देखील सामील होता. यामुळे टाटांच्या इमेजला तडा जात असल्याचा आरोप होत होता. तसेच त्यांच्याच कार्यकाळात डोकोमो कंपनिशी झालेला वादात टाटा ग्रुपला $1.2 अब्ज डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागले होते.

अखेर टाटांनी कंपनीच्या कामकाजात पुन्हा एंट्री घेतली आणि सायरस मिस्त्री यांना ऑक्टोबर २०१६ ला चेयरमन पदावरून पायउतार केलं. काही जण असंही सांगतात की टाटांना अध्यक्षपदी ते सांगितलं तेव्हढच करणार सांगकाम्या माणूस पाहिजे होता मात्र सायरस मिस्त्री यांनी तसं वागण्यास नकार दिला होता.

चेयरमन पदावरून बाहेर काढल्यानंतर सायरस मिस्त्री यांनी कोर्टाची पायरी धरली होती.

त्यामुळे मिस्त्री विरुद्ध टाटा हा वाद आणखीनच चिघळला. २०१९ मध्ये नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने मिस्त्री यांना पुन्हा चेअरमनपदी बसवण्याचा निर्णय देखील दिला होता. मात्र सुप्रीम कोर्टात हा निर्णय फिरला आणि सायरस मिस्त्री यांना पुन्हा कधीच टाटा सन्सच्या चेअरमनपदी बसता आलं नाही आणि सायरस मिस्त्री टाटा समूहाचे सगळ्यात कमी काळ चेअरमन राहिलेले व्यक्ती म्हणून इतिहासात नोंदवले गेले.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.