भुगर्भशास्त्रज्ञानी दिलेल्या अवघ्या एका पत्रावर टाटा स्टीलचा जन्म झाला होता..

टाटा स्टील. भारतात ज्या काही हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या जुन्या आणि नामवंत कंपन्या आहेत त्यापैकीची एक आघाडीची कंपनी. आता जुनी म्हणजे किती? तर तब्बल ११४ वर्ष जुनी. याची स्थापना झाली होती जमशेदजी टाटा यांच्या स्वप्नातुन आणि दोरबजी टाटा यांच्या भगीरथ प्रयत्नांमधून.

पण त्यासोबतचं त्याच्या पाठीमागचे कारण होतं ते म्हणजे एका भुगर्भशास्त्रज्ञानं लिहीलेल एक पत्र.

जमशेदजी टाटा म्हणजे पाश्चात्य आधुनिक उद्योगधंद्याशी जुळवून घेतलेल्या भारताच्या पहिल्या पिढीच्या व्यापाऱ्यांपैकी एक. त्यांना सुरुवातीपासूनच काहीतरी वेगळं करायचं होतं. त्यामुळे जमशेदजींनी चीनला जाऊन कापसाचे महत्व जाणले होते. १९ व्या शतकाच्या शेवटच्या काही वर्षांमध्येच त्याचा उद्योग ही त्यांनी सुरु केला होता.

पण जमशेदजी यांना त्यापेक्षाही काहीतरी मोठे करायचे होते आणि त्याच्याच शोधात त्यांचं जगभर फिरण चालू होतं. या काळात ते जेव्हा इंग्लंडची कापडनगरी असलेल्या मॅंचेस्टरला गेले होते. तेव्हा त्यांनी थॉमस कार्लाईलला एका भाषणात बोलताना ऐकलं. तो म्हणत होता,

“जो देश पोलाद आणि स्टीलवर पकड मिळवतो तो देश काहीच काळात सोन्यावर ही अधिपत्य गाजवतो. “

या वाक्याने जमशेदजींच्या आयुष्यावर खोलवर परिणाम केला. स्टील उद्योगचं येणाऱ्या शतकावर राज्य करणार हे त्यांनी ओळखलं. त्या दिवशीच ठरवलं की आपण भारतात स्टीलवर काम करायचे आणि आपल्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करायची. मात्र काम कुठून सुरुवात करायची याबाबत बरेच दिवस खलबत सुरु होती.

त्याच पार्श्वभुमीवर विसाव्या शतकाच्या सुरवातीला चार्लेस पेज पेरील नावच्या भूगर्भशास्त्रज्ञाला स्टील प्लांन्टसाठी साईट सुचवण्यास सांगितले. मध्यप्रदेशमध्ये लोखंडाच्या खाणीचा शोध सुरु झाला.

याच काळात ओरिसाच्या मयूरभंज संस्थानच्या राजाने जीओलॉजी सर्वे ऑफ इंडियामधून निवृत्त झालेले भुगर्भशास्त्रज्ञ पी. एन. बोस यांना आपल्या राज्यामधल्या सर्व्हेसाठी अपॉइन्ट केले होते. हा सर्वे करत असताना त्यांच्या लक्षात आले की गोरुम्हीसानी इथे लोखंड मिळू शकते.

यावर बोस यांनी तत्काळ हालचाल केली आणि १९०४ मध्ये जमशेदजी टाटा यांना याबद्दल पत्र लिहिले.

त्यांच्याच आग्रहामुळे जमशेदजीनी छोटा नागपूर पठाराच्या जवळ स्टील प्लॅन्ट लावायचे ठरवले.

जमशेदजींचे चिरंजीव दोराबजी टाटा, त्यांचा भाचा शापूरजी साक्त्वाला हे सगळे झारखंडच्या जंगलात स्टील प्लँटसाठी जागा शोधू लागले. तो शोध संपला साक्ची येथे. सुबर्णरेखा आणि खारकाई नदीच्या संगमावरची जागा ही टाटा स्टील प्लँटसाठी योग्य होती.

स्टील प्लँटच्या स्वप्नाची जमशेदजींनी अनेक वर्ष वाट पाहली होती; पण जेव्हा हा प्रकल्प आकार घेऊ लागला तेव्हा दुर्दैवाने जमशेदजी आजारी पडले. यातुनच १९०४ मध्येच त्यांचं निधन झालं. त्यानंतर सर्व गोष्टी त्यांच्या मुलांनी हाताळल्या.

१६ फेब्रुवारी १९१२ रोजी पहिला स्टील रॉड टाटा कंपनीमधून बाहेर पडला. हा संपुर्ण भारतासाठी ऐतिहासिक दिवस होता. कारण पारतंत्र्यात असलेल्या गरीब देशामध्ये एका कंपनीने स्वतःची स्टील निर्मिती सुरु केली होती ही काही कमी कौतुकाची गोष्ट नक्कीच नव्हती. हळूहळू कामगार वाढू लागले, आर्थिक सामाजिक विकास सुरु झाला तसं बाजापेठ तयार झाली. अनेक कंपन्या येऊ लागल्या रोजगार उपलब्ध झाला.

टाटांनी या भागात केवळ कारखानाच उभा केला नाही तर ११४ वर्षापुर्वी एक स्मार्टसिटी देखील वसवली होती.

खरंतर जमशेदजींना कारखान्यासाठी १ हजार ५०० एकर जमिनीची गरज होती. मात्र तरीही त्यांनी इथं तब्बल १५ हजार एकर जमिन अधिग्रहीत केली. १९०७ मध्ये जेव्हा इथं कंपनी सुरु झाली तेव्हा साक्चीमध्ये केवळ जंगल आणि झाडी होती. मात्र १० वर्षानंतर इथं एक परिपुर्ण गावं उभं राहिल होतं. किंबहुना जमशेदजींची दृष्टी आणि दोरबजी यांचे कष्ट यामुळे हे शहर उभे राहू शकले होते.

त्यावेळची एक आठवण सांगितली जाते ती म्हणजे,

रस्ते बनवत असताना जमशेदजी टाटा आजारी होते, त्यामुळे ते साक्चीला जाऊ शकत नव्हते. पण त्यांनी पत्र लिहून मुलगा दोराबजी याला काही विशेष सूचना दिल्या होत्या. जसं की रस्ते बनवत असताना दोन्ही बाजूला चांगली सावली देणारी झाडे लावा. शहरामध्ये गार्डन, लॉन साठी भरपूर जागा सोडा, फुटबॉल, हॉकीसाठी मोठी मैदाने सोडा असे निर्देश त्यांनी दिले होते. सोबतंच हिंदूंच्या मंदिरासाठी, मुस्लिमांच्या मस्जिदीसाठी आणि ख्रिश्चन लोकांच्या चर्च साठी योग्य जागा निवडा असे ही त्यांनी सांगितले होते.

दोराबजी यांनी ही वडिलांची प्रत्येक सूचना अमलात आणली आणि काळाच्या ओघात एक सुंदर शहर तयार होत गेलं. जगाची आयर्नसिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या पिट्सबर्गमधील ज्युलिअन केनडी सहलीन कंपनीने या शहराचं डिझाईन बनवलं होतं.

पुढे पहिल्या महायुद्धात टाटा स्टीलने दिलेल्या योगदानामुळे व्हायसरॉय लॉर्ड चेम्सफोर्ड यांनी साक्ची या गावचं नाव जमशेदपूर केलं.

आज घडीला तिथे जुबली पार्क, दल्मा अभयारण्य, टाटा स्टील झुओलोजीकाल पार्क, जे.आर. डी .क्रीडा संकुल, टेल्कोचा थीम पार्क, हाय टेक सिटी पार्क, एयरपोर्ट, गोल्फ ग्राउंड,अत्याधुनिक दवाखाने अशा सर्व गोष्टी तिथे आहेत.

या गोष्टींमुळे या शहराने आधुनिकता अंगिकारली. जमशेदपुरमध्ये अनेक दर्जेदार शैक्षणिक संस्था ही आज आहेत. महात्मा गांधी मेमोरियल मेडिकल कॉलेज, नॉशनल स्कूल ऑफ टेक्नोलॉजी, राष्ट्रीय धातू संशोधन लॅबोरेटरी, कौन्सिल ऑफ सायंटिफिक अंड इंडस्ट्रियल रिसर्च. इतर अनेक शैक्षणिक संस्था तिथे तयार झाल्या आहेत.

१९३० च्या दशकात महात्मा गांधी याचं जमशेदपूरला दोन वेळेस जाण झालं. गांधी भांडवलशाहीचे प्रखर विरोधक होते. पण तरीही दोराबजी यांची इच्छा होती की त्यांनी एकदा तरी हे शहर पाहावं. आणि गांधीजींना खरोखर इथली प्रगती आवडली. इथे कामाबरोबरच कंपनी कामगार आणि त्यांच्या कुटुंबाची ही सर्वार्थाने काळजी घेत होती. हे बघून गांधीनी या शहराचे आणि पर्यायाने टाटांचे कौतुक केले.

आजही हा कारखाना तेवढ्याच ताकदीनं उभा आहे. कामगारांची काळजी देखील तेवढ्याच आपुलकीने घेतली जाते. याच मुर्तीमंत उदाहरण म्हणजे कोरोना काळात जर एखाद्या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला, तर टाटा स्टीलच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना त्या कर्मचाऱ्यांच्या वयाच्या ६० वर्षांपर्यंत पगार मिळणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजेच, त्याला मृत्यूपूर्वीच्या महिन्यात जो पगार मिळाला तेवढा पगार वयाच्या ६० वर्षांपर्यंत कुटुंबातील वारसदाराला मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.