नॅनो ते टियागो इव्ही, पेट्रोल असो की इलेक्ट्रिक परवडणाऱ्या गाड्या टाटांनीच आणल्यात…
एक जमाना होता, जेव्हा कार घेणं म्हणजे लई मोठी गोष्ट वाटायची. आपल्याला अजून पण वाटते, पण आधीसारखी क्रेझ नाय राहिली हे पण खरं. सध्या विषय असा रंगतो की गाडी घ्यायची कुठली ? कारण पर्याय तर लई ढिगानं आहेत, पण मॅटर असाय की, गाडी परवडेल खरं पेट्रोल-डिझेल परवडणार का ? गाडी पंपावर नेल्यावर कुणाच्या मनात काय येतं हा आपला विषय नाही, आपला विषय खिशाला परवडणाऱ्या गाडीचा आहे. कसंय पेट्रोल-डिझेल परवडना झाल्या म्हणून लोकं वळली इलेक्ट्रिक गाड्यांकडे.
पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचत असला, तरी या गाड्यांची किंमत काय सगळ्यांनाच परवडते असं नाही, म्हणजे फोर व्हीलरचं बघायचं झालं तर, व्होल्व्हो XC40 जाते ५६ लाखाला, किया इव्ही६ चं गणित ६०-६५ लाखापर्यंत जातंय. बरं एवढ्या सगळ्यात टाटांची नेक्सॉन इव्ही कितीला पडते तर, १५ ते १८ लाखाला. त्यामुळं इलेक्ट्रिक फोरव्हीलर घ्यायचं मध्यमवर्गीय माणसाचं स्वप्न कधी पूर्ण व्हायचं ?
फार आधी साध्या गाड्यांबद्दल हा प्रश्न पडायचा तेव्हा टाटांनी नॅनो आणत विषय सोपा केला होता, आताही पुन्हा एकदा टाटांनीच टियागो इव्ही आणत इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटमध्ये एक नवा स्वस्त पर्याय आणलाय.
ज्यावेळी टाटांनी टियागो आणली तेव्हा ५ ते ८ लाख या किंमतीमुळं ही स्वस्त पण दणकट कार लई चालली. याच धर्तीवर टियागो इव्ही हा इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटमधला स्वस्त पर्याय ठरु शकतो.
त्यामुळं खास इच्छूक कार्यकर्त्यांसाठी या गाडीचे स्पेसिफिकेशन्स, मॉडेल्स आणि किंमत या गोष्टी डिटेलमध्ये घेऊन आलोय.