युद्ध कुठलंही असो एअर इंडिया भारतीयांसाठी नेहमीच फ्रंटफूटवर राहून मोठं काम करते

भारतावर कुठलही संकट येऊ देत, संकटमोचक म्हणून पुढे येणाऱ्यांमध्ये टाटाचं नाव हमखास असतं. मग ते महामारी असो किंवा भारतात कुठल्या गोष्टीचा तुटवडा असो. ‘जिथं कमी तिथं आम्ही’ ही म्हण टाटा ग्रुप ला लागू होते.

आता सुद्धा रशिया-युक्रेन युद्धा दरम्यान  युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी परत आणण्यासाठी टाटांची एअर इंडिया कामाला लागलीये. युद्धा दरम्यान कित्येक प्रयत्नानंतर २६ फेब्रुवारी पासून सुरू झालेल्या ऑपरेशन गंगा अंतर्गत ही कामगिरी सुरू झालीये.

आत्तापर्यंत एअर इंडियाने ४ उड्डाणं घेऊन भारतीयांना तिथून परत आणलयं. पण भिडू जसा टाटा कंपनीच्या सक्सेसचा इतिहास दांडगा आहे, तसाच आपल्या देशातील नागरिक इतर देशात अडचणीत असतांना त्यांना सोडविण्यासाठी एअर इंडिया नेहमीच मदतीसाठी पुढे राहिला आहे.

अडचणीच्या काळात आपल्या लोकांना सुरक्षितपणे घरी आणण्याचा एअर इंडियाचा मोठा इतिहास आहे. मग ती परिस्थिती किती ही भयानक असो.

तर आता पर्यंत किती ठिकाणाहून एअर इंडियाने आपल्या नागरिकांना परत आपल्या मायदेशी आणले.

कुवैत एअरलिफ्ट

१९९० सालची घटना सद्दाम हुसेनचे सैन्य कुवेतमध्ये घुसले. इराकी सैन्य जवळपास ७  महिने कुवेतमध्ये तळ ठोकून होते.  तसं कुवैतमध्ये भारतीयांची संख्या नेहमीच जास्त असते. त्यावेळी सुद्धा  देशात राहणारे आणि काम करणारे १ लाखांपेक्षा जास्त भारतीय अडकले होते. सगळी विमान उड्डाण जवळपास थांबवली गेली होती, त्यामुळं बाहेर पडणं म्हणजे मोठं जोखमीचं काम. 

शेवटी परराष्ट्र मंत्रालयाने त्या देशांसोबत चर्चा करून आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी अनेक लष्करी विमानांची नियुक्ती केली. पण परदेशात लष्करी जेट उडवण्याची परवानगी मिळण्यासाठी हवाई क्षेत्राची मंजुरी आवश्यक होती.त्यामुळं टेन्शन आणखी वाढलं. शेवटी सरकारनं भारतीयांना सुखरूप आणण्याचा मोर्चा एअर इंडियाकडे वळवला. 

एअर इंडिया सुद्धा सज्ज झाली आणि ५९ दिवसांमध्ये जवळपास ४८८ उड्डाणं चालवली. आणि लाखो भारतीयांना भारतात परत आणलं गेलं. 

भारताच्या इतिहासात हे आतापर्यंतचं सगळ्यात मोठं ऑपरेशन होत. 

लेबानन 

२००६ साली लेबानन आणि इस्रायल या दोन देशांमध्ये युद्ध सुरु झालेलं. सैनिकांच्या अदलाबदली वरून हे युद्ध सुरु झालेलं. ज्यात दोन्ही देशांनी आपण जिंकलो म्ह्णून जाहीर केलं, पण खरं जिंकलं होत ते लेबानन. आणि नंतर इस्रायलनं हे मान्य सुद्धा केलं. 

पण या दोन्ही देशांच्या युद्धादरम्यान लाखो नागरिक फसले होते. ज्यात भारतीय सुद्धा होते.पण भारतीय नौदलाने भारतीयांबरोबर इतर देशांच्या नागरिकांना सुद्धा आणण्याची जबादारी घेतली. नौदलाने एअर इंडियाची मदत घेऊन भारतीय, श्रीलंकन ​​आणि नेपाळी नागरिकांना आणि सोबतच लेबनीज नागरिकांना बाहेर काढण्यासाठी सुकून ऑपरेशन चळवळ गेलं. 

हे ऑपरेशन भारतीय नौदलाने केलेल्या सर्वात मोठ्या ऑपरेशन पैकी आहे. ज्यात १,७६४ भारतीय, ११२ श्रीलंकन, ६४ नेपाळी आणि ७ लेबनीज नागरिकांना तिथून सुखरूप हलवलं

लिबिया सिव्हिल वॉर 

१५ फेब्रुवारी २०११ ते २३ ऑक्टोबर २०११ दरम्यान लिबियामध्ये सिव्हिल वॉर सुरु झालेलं. या दरम्यान जवळपास १८ हजार भारतीय लिबियामध्ये अडकलेले. यासाठी भारत सरकारकडून ऑपरेशन सेफ होमकमिंग चालवलं गेलं. एअर-सी ऑपरेशन भारतीय नौदल आणि एअर इंडियाकडून हे ऑपरेशन ऑपरेट केलं गेलं.

यमन- सौदी अरेबिया

२०१५ च्या एप्रिल महिन्यात सौदी अरेबियाच्या नेतृत्वाखालील हुती बंडखोरांनी येमेनची राजधानी साना इथं हवाई हल्ले सुरु केले. त्यावेळी मोठं वातावरण जरी पेटलं असंल तरी हे युद्ध अजूनही संपलेलं नाही. अधून- मधून तिथल्या हल्ल्याच्या बातम्या समोर येतच असतात. 

पण त्यावेळी यमन मधली परिस्थिती दिवसेंदिवस अवघड बनत चाललेली. यमन नो- फ्लाय झोन म्हणून घोषित झालेला. पण तरीही भारतीय लष्कराने एअर इंडियासोबत मिळून भारतातील ४६३० नागरिकांसोबत ४५  देशांतील ९६० नागरिकांना तिथून बाहेर काढलेलं, ज्याला ऑपरेशन राहत असं नाव देण्यात आलं होत. 

कोरोना महामारी 

कोरोना महामारी हा असा काळ होता, जेव्हा संपूर्ण जग लॉकडाऊन झालं होत. सगळ्याच देशांनी आपली विमान सेवा सुद्धा बंद केलेली. त्यावेळी एअर इंडियाने चीन, इराण, इटलीमध्ये अडकलेल्या हजारो भारतीयांना परत आणलं होत.  विमानात ५ डॉक्टर आणि १ पॅरामेडिक होते.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.