टॅक्स वाचवण्यासाठी मुंबईत रंगलेला एक सामना : किटकॅट चॉकलेट आहे की वेफर..

किटकॅट खाल्ली नाही असा माणूस भारतात शोधूनही तुम्हाला सापडणार नाही. ‘हॅव अ ब्रेक, हॅव अ किटकॅट’ ही त्यांची टॅगलाईन आजही अनेकांच्या ओठांवर असते. बऱ्याच जणांनी आयुष्यभराच्या आणाभाका या किटकॅटच्याच साक्षीने घेतल्या होत्या. मात्र १९९९ मध्ये याच किटकॅट मुळे एक मोठा वाद निर्माण झाला होता. एवढा की किटकॅट बनवणार नेस्ले कंपनी थेट कोर्टात गेली होती.

अर्थात त्याला कारणंही तसं होतं.

किटकॅट बाजारात आणताना नेस्लेनी छोटीशी गेम केली होती. त्यांनी किटकॅट हा वेफरचा प्रकार असून त्यावर फक्त चॉकलेटचं कोटिंग आहे असं सांगत किटकॅटला १०% टॅक्स ब्रॅकेटमध्ये बसवलं.

टॅक्सवाले लोकसुद्धा लेचेपेचे नव्हते. त्यांचं म्हणणं होतं, ‘किटकॅट हे चॉकलेट आहे ज्याच्या आतमध्ये वेफर आहे.’ त्यामुळे त्याला २०% टॅक्स लागला पाहिजे.

आता काय करायचं?

शेवटी प्रकरण मुंबई कस्टमच्या एक्साइज अँड गोल्ड ट्रिब्युनलसमोर आलं. आता हे ट्रिब्युनल ठरवणार होतं की किटकॅट वेफर आहे की चॉकलेट आहे? त्यावर १०% की २०% टॅक्स लागला पाहिजे?

या केसमध्ये टॅक्स अथॉरिटीला पहिल्यांदा बाजू मांडण्याची संधी मिळाली. त्यांचं म्हणणं होतं,

‘किटकॅट ही चॉकलेट, वेफर आणि प्रालीन या घटक पदार्थांपासून बनते. त्यामुळे त्याला वेफर म्हणू शकत नाही. किटकॅटमध्ये सर्वात जास्त वाटा मिल्क चॉकलेटचा आहे.’

‘नेस्ले कंपनीनेसुद्धा किटकॅट हे चॉकलेटच आहे अशा पद्धतीने त्याचा साठा केला आहे. तसेच त्याची वाहतूकही चॉकलेट म्हणूनच केली जाते. किटकॅट विकणारे विक्रेते आणि ती विकत घेणारे कस्टमर हेदेखील किटकॅट एक चॉकलेट म्हणूनच विकतात आणि खातात. कुणीही किटकॅटचा उल्लेख वेफर म्हणून करत नाही.’

त्यामुळे किटकॅट हे चॉकलेटच आहे.

ट्रिब्युनलला मात्र हे पटलं नाही. ते म्हणाले,

‘मिल्क चॉकलेटमध्ये कोकोआ बटर आणि कोकोआ पावडर असते हे बरोबर. पण म्हणून लगेच त्याला चॉकलेट म्हणता येणार नाही. कोकोआ असलेला प्रत्येक पदार्थ चॉकलेट असेलच असे नाही.’

‘शिवाय किटकॅटची विक्री चॉकलेट म्हणून केली जाते असं तुमचं म्हणणं असलं तरी ते कुठेही सिद्ध होत नाही. किटकॅट हे चॉकलेट आणि बिस्कीटचं कॉम्बिनेशन आहे असे समजून लोक ते विकत घेतात. त्यामुळे नेस्ले कंपनी म्हणते त्याप्रमाणे किटकॅट हे चॉकलेट नसून वेफरच आहे.’

शेवटी निकाल नेस्ले कंपनीच्या बाजूने मिळाला आणि किटकॅट वेफर म्हणूनच विकली जाऊ लागली. 

हे हि वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.