शिक्षकांनो कोरोनाची कोणती टेस्ट सर्वात खात्रीशीर आहे ते समजून घ्या…

राज्यातील मुंबई, ठाणे, पुणे असे काही मोजके जिल्हे वगळून आजपासून ९वी, १०वी आणि १२वी ची शाळा सुरु होत आहेत. पण या शाळा सुरु करण्यापुर्वी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना कोरोनाची चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. यात ही RT-PCR चाचणीचे बंधन घालण्यात आले होते.

मात्र शिक्षकांच्या रोषानंतर RT-PCR चे बंधन मागे घेत इतर उपलब्ध असलेल्या चाचण्या करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे.

पण कोरोना आपल्या शरीरात शिरला आहे की हे तपासण्यासाठी नेमक्या कोणत्या टेस्ट आहेत आणि त्यांचे प्रकार कोणते आहेत याबाबत आठ महिन्यांनंतरही बरेच संभ्रम आहेत.

तर कोरोना टेस्टच्या प्रकारांपैकी एक असलेली RT-PCR आणि त्या सोबतच इतर ही टेस्ट आहेत. यात एकुण तीन प्रकारच्या टेस्ट्स केल्या जाऊ शकतात.

१) RT-PCR Test

२) Rapid Antigen Detection Test

३) Rapid Antibody Test

पण या चाचण्यांमध्ये नेमके फरक काय आहेत आणि त्यांची अचूकता किती आहे हे देखील समजून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.

RT-PCR चाचणी कशी असते?

RT-PCR म्हणजे Real Time Reverse Transcription Polymerase Chain Reaction.

यालाच सोप्या भाषेत सांगायच तर स्वॅब टेस्ट असे पण म्हणतात. या टेस्ट मध्ये नाकाच्या मागच्या भागाचा आणि घशातील स्वॅब घेतला जातो.

नाक आणि गळ्याच्या मध्ये ज्या भागातून स्वॅब काढला जातो त्याला नेजोफ्रेंजीयल असे म्हणतात.

यशिवाय स्वॅब हे एक प्रकारचे इंस्ट्रुमेंट असते. ह्यात एका पातळ आणि निर्जंतुक रॉडवर कापूस लावून त्याच्या माध्यमातून नेजोफ्रेंजीयल मधून ऑर्गेनिजम (विषाणू) तपासला जातो. कारण नेजोफ्रेंजीयल शरीराचा तो भाग आहे ज्यात विषाणू व जंतूंचा प्रभाव अधिक असतो.

भारतात अगदी सुरुवातीपासूनच याच पद्धतीचा वापर केला जातो. प्रयोगशाळेतल्या या तपासणीसाठी २ ते ५ तास लागतात, पण एकूणच लॅब्सवरचा भार पाहता महाराष्ट्रात खासगी प्रयोगशाळांमध्ये साधारणपणे एका दिवसांत याचे निकाल येतात, सरकारी हॉस्पिटल्सच्या लॅबमध्ये यालाच २ दिवस लागतात.

RT-PCR Test ही कोरोनाचा संसर्ग झाला आहे की नाही हे अगदी खात्रीशीर पद्धतीने सांगू शकते. तुमच्या शरीरात कोरोनाचा संसर्ग कमी प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात असला तरी तो या टेस्टमार्फत कळू शकतो.

ICMR ने तर या चाचणीला टेस्टिंगचा गोल्ड स्टँडर्ड असे म्हटले आहे.

रॅपिड अँटीजेन टेस्ट म्हणजे काय?

या चाचण्यांमध्ये सुद्धा RT-PCR प्रमाणेच स्वॉब सँपल घेतले जाते. पण याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याचे निकाल साधारण अर्ध्या तासात मिळू शकतात. म्हणूनच याला रॅपिड अँटीजेन म्हणतात.

या स्वॅबमध्ये कोरोनाचे विषाणू आहेत किंवा नाही हे या अँटीजेन टेस्टमध्ये कळते.

कारण, अँटीजेन्स हे विषाणूंचा एक भाग असतात. शरीरात जे विषाणू प्रवेश करतात त्यांच्या पृष्ठभागावर अँटीजेन्स असतात. आपले शरीर या अँटीजेन्सना बाहेरून आलेला घटक म्हणजेच फॉरेन बॉडी म्हणून ओळखते. हा घटक आपल्या शरीरातला नाही हे आपल्या बॉडीला कळते

या टेस्टचे सँपल तपासण्यासाठी प्रयोगशाळेत न्यावे लागत नाही. जिथे स्वॅब घेतला आहे तिथेच याची तपासणी करता येते. ही किट्स तुलनेने स्वस्त, लवकर निकाल देणारी आणि वापरायला सोपी असल्याने याचा जगभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

या टेस्टचे प्रमाण सध्या प्रशासनाने सर्वाधिक वाढवले आहे जेणेकरून करोना रुग्णांची ओळख लवकरात लवकर व्हावी आणि त्यांच्यावर वेळीच उपचार केले जावेत. भारत सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात सध्या दररोज १० लाख चाचण्या केल्या जात आहेत आणि यातील रॅपिट अँटिजेन टेस्ट्सचे प्रमाण मोठे आहे.

ICMR ने सांगितल्यानुसार या टेस्ट्समधून फॉल्स निगेटिव्ह म्हणजे चुकीचा नकारात्मक रिझल्ट येण्याची शक्यता जास्त आहे. याच कारणामुळे जरी तुमची Antigen Test मध्ये निगेटिव्ह आली तरी तुम्ही RT-PCR चाचणी सुद्धा करवून घ्यावी.

पॉझिटिव्ह निकालांसाठी वेगळी RT-PCR टेस्ट करून घेण्याची गरज नाही असे ही ICMR चे म्हणणे आहे.

रॅपिड अँटीबॉडी टेस्ट

अँटीबॉडी म्हणजे सोप्या भाषेत एखाद्या विषाणूशी लढण्यासाठी आपल्या शरीराराने तयार केलेली यंत्रणा.

अँटीबॉडी टेस्टमध्ये व्यक्तीच्या रक्ताचे नमुने घेतले जातात. यात एखाद्या व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत का, हे या टेस्टद्वारे तपासले जाते.

अँटीबॉडीज आहेत याचाच अर्थ त्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होऊन गेलेला आहे, आणि त्याच्या रक्ताच्या पेशींमध्ये विषाणूंना मारण्यासाठी अँटीबॉडीज तयार झालेल्या असतात.

वेगवेगळ्या शहरांमध्ये सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत. लोकांचे रक्ताचे नमुने घेऊन त्यात जर कोरोनाशी लढणाऱ्या अँटीबॉडी दिसल्या तर त्यांना कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे हे ओळखता येते. यासाठी या टेस्ट्सचा वापर केला जातो.

ICMR ने एप्रिल महिन्यातच या टेस्ट्स हॉटस्पॉट्समध्ये किंवा अशाप्रकारच्या सर्वेक्षणासाठी वापरल्या जाव्या असे स्पष्ट केले आहे.

प्लाझा थेअर’पीसाठी उपयुक्त.

कोरोनाशी लढण्यामध्ये या अँटीबॉडीजची भूमिका महत्त्वाची आहे, म्हणूनच कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांचा प्लाझ्मा कोरोनाशी आता लढणाऱ्या रुग्णांना देऊन त्यांच्यावर उपचार करणाऱ्या ‘प्लाझ्मा थेरपी’चे प्रयोग सध्या करण्यात येत आहेत.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.