सिद्धूनी कॅच पकडला आणि सगळ्या भारतानं दिवाळी साजरी केली…

मोठ्या प्रयत्नांनी १९८७ च्या क्रिकेट वर्ल्डकपचं आयोजन भारतात झालं. प्रायोजक शोधणं, आयोजनासाठीचं मतदान जिंकणं असे सगळे कुटाणे करत भारतानं बाजी मारली आणि १९८७ चा वर्ल्डकप भारत आणि पाकिस्तानच्या भूमीवर खेळवला गेला.

तेव्हा वनडे मॅचेसही पांढऱ्या कपड्यात खेळवल्या जायच्या. आता ड्रेस रंगीत नसले, तरी खेळ मात्र मजबूत रंगायचा.

वर्ल्डकपच्या पहिल्याच मॅचमध्ये ऑस्ट्रेलिया आणि भारत आमनेसामने आले. आता अंगणातली पहिलीच मॅच म्हणल्यावर भारतीय चाहते जय्यत तयारीत होते. दोन वर्ष आधीच रवी शास्त्रीनं ऑस्ट्रेलियाच्या मैदानात ऑडी घुमवली होती, त्यामुळं वर्ल्डकपचा श्रीगणेशा भारताच्या बाजूनं होणार याबाबतीत सगळेच शुअर होते.

पण क्रिकेटमध्ये कधी कधी नशिब बाजी मारून जातं, पहिल्याच मॅचमध्ये भारत फक्त एका रननं हरला. थोडक्यात या शब्दापेक्षाही थोड्या फरकानं भारतानं मॅच गमावली.

त्याच्यानंतरची मॅच होती न्यूझीलंडविरुद्व, ती भारतानं १६ रन्सनं मारली. मग झिम्बाबेला आठ विकेट्सनं किरकोळीत हरवत भारतानं परत माहौल बनवला. आता फॅन्स कार्यकर्त्यांचा विषय कसा असतो- तुम्ही जगात कुणाकडूनही हारा, पण पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियाकडून चुकून पण नाही. समजा हरलाच तर मग त्यांनाही दणक्यात हरवायचंच.

त्या एका रनच्या पराभवामुळं झालेली जखम भरून काढायला भारताला न्यूझीलंड आणि झिम्बाबेविरुद्धचे विजय पुरेसे ठरले. आता या मॅचेस सुरू असताना दिवाळीची लगबगही सुरू होती. कपडे, फटाके, फराळ सगळं सेट होतं, पण सण निवांत साजरा होणार की धुव्वाधार हे दिवाळीच्या दिवशीच ठरणार होतं.

तारीख २२ ऑक्टोबर १९८७. दिवाळीचा दिवस. सकाळी अभ्यंगस्नान झालं, फराळ झाला, देवदर्शनही झालं. त्या देवदर्शनात एक प्रार्थना कॉमन होती ती म्हणजे, ‘देवा, आज भारत जिंकुदे!’ फटाक्याच्या पिशव्या भरून तयार होत्या, पण फटाके वाजवायचे की नाही हे मात्र मॅचवर अवलंबून होतं.

दिल्लीचं ग्राऊंड. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली. आपले गडीही फॉर्मात होतेच. श्रीकांत २६ करून गेला, पण भरवशाचा गावसकर, स्फोटक सिद्धू आणि कर्नल वेंगसरकर तिघांनी खणखणीत फिफ्टी लगावली. कॅप्टन कपिल पाजींची गाडी अडखळली, पण स्कोअरबोर्डला ब्रेक न लागू द्यायचं काम अझरुद्दीनच्या मनगटांनी केलं. त्यानं केले नॉटआऊट ५४ आणि भारताचा स्कोअर झाला २८९.

आता हे काय ऑस्ट्रेलियाला जड टार्गेट नव्हतं, त्यांची पण सुरुवात कडक झाली. बॉर्डर सोडला, तर डेव्हिड बून, डीन जोन्स आणि जेफ मार्श तिघंपण मस्त खेळले. मनिंदर सिंगनं जोन्सची विकेट काढली आणि मग ऑस्ट्रेलियाची पाकपुक झाली. असं वाटलं हे सगळे फराळाला जातात आणि भारत मॅच मारतो.

पण बिर्याणीत वेलची यावी, तसा स्टीव्ह वॉ नावाचा भिडू भारत आणि विजयाच्या मध्ये उभा ठाकला होता. त्यानं एक बाजू पद्धतशीर लावून ठेवली आणि ४२ रन्स ठोकले. त्याला दुसऱ्या बाजूनं म्हणावी तशी साथ मिळाली नाही आणि विजयातलं अंतर वाढत गेलं. पण आशा कायम होतीच.

तेवढ्यात मॅजिक मोमेंट आली. बॉलिंगला आला अझरुद्दीन, मॅकडरमॉटनं फुल ताकद लावून बॉल मारला आणि तितक्याच शांततेत अझरुद्दीननं कॅच पकडला. आता फक्त वॉचा अडसर. त्यानं कपिल देवला फ्लिक करण्याच्या नादात, थेट सिद्धूच्या हातात गोळा दिला. आता फटाके वाजणार हे फिक्स होतं.

पोरांनी उदबत्त्या पेटवल्या आणि फुलबाज्याही, तेवढ्यात ब्रुस रेडनं अझरुद्दीनच्या बॉलिंगवर कव्वा उडवला. बॉल हवेत आणि थेट सिद्धूच्या हातात. भारतानं ऑस्ट्रेलियाला हरवलं. बदला पूर्ण झाला.

हातातल्या उदबत्त्या आणि फुलबाज्या फटाक्यांना लागल्या आणि त्यावर्षीची दिवाळी, लई हॅप्पी झाली. त्यामागचं कारण होतं, टीम इंडिया!

हे ही वाच भिडू:

 

Leave A Reply

Your email address will not be published.