भारतीय क्रिकेटमधले सगळे राडे, विराट-रोहितच्या दोस्तीवर येऊन थांबतात

दोन दिवस झाले ट्विटरवर लय राडा सुरूये. तेही क्रिकेटबाबत. आता क्रिकेटबद्दल ट्विटरवर राडा होणं हे काय नवीन नाही. त्यात भारतीय क्रिकेटबद्दल राडा होणं, तर ट्विटरचा रोजचा विषय आहे. म्हणजे कसं असतंय विराट कोहलीचे फॅन रोहित शर्माला शिव्या देत असतात, रोहित शर्माचे फॅन विराट कोहलीला.

धोनीअण्णा कायम ट्रेंडिंगमध्ये असतात, म्हणजे मॅच भले पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियामध्ये होऊ द्या… धोनी ट्रेंडिंगमध्ये नसला तर फिक्स फाऊल धरायचा. बरं विराट आणि रोहितचे फॅन एकमेकांशी कितीही भांडू द्या. पाकिस्तानला शिव्या घालायची वेळ आली, की ही मंडळी फिक्स एकत्र असणार.

गेल्या दोन दिवसांत मात्र ट्विटरवर लय गोंधळ सुरू आहे. तसा मॅटर सुरू झाला विराट आणि रोहितमुळंच, पण शिव्या पडल्या त्या बीसीसीआय आणि अध्यक्ष सौरवदादा गांगुलीला.

आता रिसेन्टवाला किस्सा सुरू झालाय तो टीम इंडियाच्या कॅप्टन्सीवरुन. टी२० वर्ल्डकपच्या आधीच विराट कोहलीनं आपण टी२० टीमचं कर्णधारपद सोडत असल्याचं जाहीर केलं होतं. दक्षिण आफ्रिका दौरा तोंडावर आलेला असताना, बीसीसीआयनं वनडे कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती झाल्याचं सांगितलं आणि एकटं ट्विटरच नाही, तर सगळ्याच सोशल मीडियावर जबरदस्त कल्ला सुरु झाला.

सगळ्यात आधी पेपर फुटल्यासारखी बातमी फुटली, की ‘बीसीसीआयनं कोहलीला वनडेची कॅप्टनशिप सोडण्यासाठी ४८ तासांची मुदत दिली होती. मात्र त्यानं बीसीसीआयचं ऐकलं नाही म्हणून त्याला डच्चू देण्यात आला.’ कट्टर विराट कोहली फॅन्स ही बातमी खरी का खोटी याची वाट बघत बसले नाहीत. त्यांनी ट्विटरवर बीसीसीआय आणि गांगुलीचा बाजार उठवायला घेतला.

ट्विटरवर ट्रेंड सुरू झाला, #ShameOnBCCI. कोहलीसारख्या भारी प्लेअरला असं डायरेक्ट कसं काय काढलं? साधी पत्रकार परिषद नाही, की कोहलीला थँक यु म्हणणारी पोस्ट पण नाही. कोहली चाहत्यांच्या मते कोहली डायरेक्ट बीसीसीआयपेक्षा मोठा आहे. त्यांनी थेट गांगुलीचीच मापं काढली.

लईच गंभीर ट्रोलिंग सुरू झाल्यावर बीसीसीआयनं थँक यू विराटवाली पोस्ट टाकली, त्याचा एक व्हिडीओही टाकला आणि बऱ्यापैकी डॅमेज कंट्रोल केलं.

आता गांगुलीनं डायरेक्ट स्टेटमेंट केलं की, ‘व्हाईट बॉलच्या दोन वेगवेगळ्या फॉरमॅट्समध्ये आम्हाला दोन वेगळे कॅप्टन्स नको होते. कारण त्यामुळं कन्फ्युजन वाढलं असतं. आम्ही विराटला टी२० चं कर्णधारपद सोडू नको, असं सांगितलं होतं. आता दोन कॅप्टन्स नको म्हणून आम्ही रोहितकडे नेतृत्वाची भूमिका सोपवत आहोत. याबाबत आम्ही विराटशी बोललो आहोत.’

दादाच्या स्टेटमेंटमुळं कोहलीला हाकललं, ४८ तासांची मुदत या सगळ्या बातम्यांमधली हवा निघून गेली. 

हा झाला वर्तमान आता तुम्हाला इतिहास सांगतो-

विराट कोहली आणि रोहित शर्मा हे भारताचे सध्याचे बेस्ट प्लेअर्स. एकदम दर्जा बॅटर्स. पण या दोघांमध्ये वाद असल्याच्या बातम्या लय आधीपासून येतात. रोहितची बायको रितिका ही आधी विराटची मॅनेजर असल्याचं बोललं जातं. पुढं रोहित आणि रितिकाचं लग्न झाल्यावर यांच्या फ्रेंडशिपवर परिणाम झाला, अशी एक थेअरी आहे.

दुसरी थेअरी अशी आहे की, रोहित शर्मा विराट कोहलीला इन्स्टाग्रामवर फॉलो करत नाही, म्हणजे यांच्यात दोस्ती नाही. यांच्यात भांडणं आहेत म्हणून आपली टीम सारखी सारखी हरते. आता रवी शास्त्री म्हणजे, ‘दोस्त दमदार… भावी आमदार.’ कोचिंग करत असताना, त्यानं विराट आणि रोहितमध्ये समेट घडवून आल्याची बातमी पब्लिश झाली. लॉकडाऊनमुळं मनमिलन झाल्याची ही बातमी चांगलीच हिट झाली.

मात्र या दोघांकडं बघून तसं वाटतं का?   

विराट आणि रोहितला मैदानावर पाहिलं, की त्यांच्यात भांडणं असतील… असं अजिबात वाटत नाही. दोघांपैकी एकजण भारी खेळला की दुसरा त्याला मिठी मारतो. दोघं कायम हसताना दिसतात. मैदानाबाहेरच्या फोटोंमध्ये विराट रोहितच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढतो. त्यांची फॅमिली एकत्र फिरायलाही जाते. पण सोशल मीडियावर भांडणाच्या चर्चा काही थांबत नाहीत.

आता खरंच भांडणं आहेत की नाही… हे या दोघांशिवाय कुणीच सांगू शकत नाही. एक मात्र खरं, भारताची टीम हरली की सोशल मीडियावर राडे सुरू होतात आणि हे राडे थांबतात विराट आणि रोहितच्या दोस्तीवर. जसं काय आपली टीम हारायला ही दोघंच कारणीभूत आहेत. रोहित शर्माच्या नेतृत्वात तरी ही परिस्थिती बदलणार का? आणि भारताच्या खात्यात आयसीसी ट्रॉफी येणार का? याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं असेल.

हे ही वाच भिडू:

English Summary: When the Indian team loses, there are rumors on social media and these rumors stop at the friendship between Virat and Rohit. Both of them are responsible for the loss of our team. Will this situation change under the leadership of Rohit Sharma? And will India get the ICC Trophy? This must-have caught the attention of the fans.

 

Web title: Team India new captain Rohit Sharma and  former captain Virat Kohli controversy

Leave A Reply

Your email address will not be published.