टिम संजय गांधी विरुद्ध टिम राहूल गांधी, कोण ठरलं वरचढ..?

काल मध्यप्रदेश आणि राजस्थान विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती आले. राहुल गांधीच्या नेतृत्वाखालचा विजयाचा दुष्काळ संपून या दोन्ही राज्यावर काँग्रेसचा झेंडा गाडला गेला. आता या दोन्ही राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार असा प्रश्न फक्त तिथले कार्यकर्तेच नव्हे तर उभ्या भारताला पडला होता.

आता त्याचं उत्तर आलंय राजस्थानमध्ये ६७ वर्षांचे अशोक गेहलोत आणि मध्य प्रदेशमध्ये ७२ वर्षाचे कमलनाथ.

आज राहुल गांधी यांच्या हातात काँग्रेसची कमान आहे. एक काळ होता जेव्हा त्याचे काका संजय गांधीकडे काँग्रेसची सूत्रे होती.

आणीबाणीचे दिवस होते. इंदिरा गांधी यांनी आपले धाकटे चिरंजीव संजय गांधीना राजकारणात लॉच केले होते. संजय गांधीना भारताच्या विशेषतः काँग्रेसच्या राजकारणात आलेली मरगळ झटकायची होती. थोडक्यात काय त्यांना पक्षातले म्हातारे घालवून आपल्या पिढीतल्या माणसांना राजकारणात आणायचं होत. त्यांनी बनवली स्वतःची वेगळी टीम. सगळे तरुण फायरब्रांड नेते होते.

या टीम संजय गांधी मध्ये सगळ्यात आघाडीवर होते कमलनाथ. एके काळी त्यांना संजय गांधीची सावली म्हटल जायचं. इंदिरा गांधी त्यांना आपला तिसरा मुलगा समजायची. संजय आणि ते दोघेही शाळेत असल्यापासूनच दोस्त. डेहराडूनच्या डूनस्कूल मध्ये सुरु झालेला हा मैत्रीचा प्रवास संजय गांधीच्या आणीबाणीनंतरच्या वाईटकाळातही थांबला नाही.

जेव्हा कोर्टात संजय गांधीच्यावर न्यायाधीशांनी आरोप निश्चित केले तेव्हा कमलनाथ यांनी त्यांच्यावर कागदाचे बोळे फेकले आणि त्याबद्दल जेलची हवा खाल्ली.

सगळ्यांना वाटले संजय गांधीच्या अपघाती मृत्यूनंतर कमलनाथ राजकारणात मागे पडतील पण राजीव गांधीशी ही त्यांनी जुळवून घेतले. क्लीन इमेज आणि कामाचा प्रचंड उरक हे कमलनाथ यांची वैशिठ्ये त्यांना कॉंग्रेसच्या केंद्रातल्या प्रत्येक मंत्रिमंडळात महत्वाच्या मंत्रीपदापर्यंत पोहचवली. 

या वेळच्या मध्यप्रदेश निवडणुकीत त्यांच्यासोबत होते काँग्रेसचे युवा नेता ज्योतिरादित्य शिंदे. लोकसभेच्या सेशनपासून प्रचारापर्यंत कायम राहुल गांधीच्या शेजारी दिसणारे ज्योतिरादित्य हे यावेळचे काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे मुख्य दावेदार होते. टीम राहुलचे हे प्रमुख सेनापती या निवडणुकीत कमलनाथ यांच्यासोबत जुळवून घेताना दिसले. पण शेवटच्या क्षणी काँग्रेस स्पष्ट बहुमत न मिळू शकल्यामुळे आघाडी सरकार बनवण्यासाठी लागणाऱ्या अनुभवामुळे कमलनाथनी त्यांच्यापेक्षा बाजी मारली.

अखेर मध्यप्रदेशमध्ये भाजपा सरकार जाऊन कॉंग्रेसचे कमल (नाथ) फुलले.

इकडे राजस्थान मध्ये ही सेम हीच परिस्थिती होती.

अशोक गेहलोत हे एका सामान्य माळी कुटुंबाचे. वडील जादूगारीचा खेळ करत देशभर फिरायचे. अशोक गेहलोत याचं बालपण जादुगरीमध्ये गेले. कॉलेजमध्ये असताना त्यांना पुस्तक वाचताना गांधीविचाराशी ओळख झाली. गांधीवादाने त्यांना भारावून टाकले. सतरा अठरा वर्षांचा असताना खादीचे कपडे, शुद्ध आचरण आहार आणि गोरगरीबांची सेवा या आदर्शवादाने त्यांना झपाटले.

एकदा सेवा दल काँग्रेसच्या कार्यक्रमात पंतप्रधान इंदिरा गांधी त्याच्या कामावर खुश झाल्या आणि सक्रीय राजकारणात येण्याचं आवतण दिल.

अशोक गेहलोत काँग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआय मध्ये त्यांनी कामास सुरवात केली. तिथे संजय गांधीच्या वर्तुळात त्यांना प्रवेश मिळाला. संजय गांधीपेक्षा उलट शांत स्वभावाचे असूनही अशोक गेहलोतवर त्यांची मर्जी बसली.

अशोक गेहलोत यांना जेव्हा पहिल्यांदा संजय गांधीनी निवडणुकीचे तिकीट दिले तेव्हा त्यांच्या जवळ प्रचारासाठी सुद्धा पैसे नव्हते. एकुलती एक मोटारसायकल विकून त्यांनी प्रचार केला. त्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. पण लगेच पुढच्या लोकसभा निवडणुकीत अवघ्या २८व्या वर्षी त्यांनी बाजी मारली.

तिथून अशोक गेहलोत यांनी मागे वळून पाहिले नाही. दोनवेळा असे मिळून एकूण दहा वर्षे ते राजस्थानचे मुख्यमंत्री राहिले. त्यांनी अनेकदा केंद्रात मंत्रीपद भूषविले.

यावेळच्या राजस्थान निवडणुकीत त्यांच्यासोबत काँग्रेसचं नेतृत्व होत टीम राहुलच्या सचिन पायलट यांच्याकडे. मध्यप्रदेश प्रमाणे बहुमतापासून एक पाउल मागे राहिल्यामुळे अनुभवाने तारुण्यावर मात केली. अशोक गेहलोत यांचीच जादू राजस्थानवर राहणार हे स्पष्ट झाले. 

काँग्रेसच्या इतिहासात पिढ्यांचा वाद नवा नाही. संजय गांधीच्या वेळी ज्या तरुण नेत्यांनी तेव्हाच्या म्हाताऱ्या नेत्यांना मागे टाकून सत्ता मिळवली तेच नेते आज स्वतः म्हातारे झाले आहेत. मात्र सत्तेच्या स्पर्धेत या संजय गांधीच्या जुन्यापिढीनेच राहुल गांधीच्या नव्या पिढीवर विजय मिळवला आहे हे नक्की.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.