आजच्या टेडी डे ला मला तात्या विंचू आठवला, हे माझ्या सिंगल असण्याचं कारण आहे का ? 

सकाळ सकाळी रुममधला एक फंडर आरशात बघुन आवरत होता. आज रविवार होता. MPSC करणाऱ्या पोरांसाठी आजचा दिवस म्हणजे नुसत पेपर वाचत बसायचा दिवस. पण परिक्षा जवळ आल्यात म्हणून सगळे सकाळीच आपआपल्या अड्यावर गेले होते. हा पण रोज सकाळी सात वाजता हिंदू नाचवत लायब्रेरीत शिरतो. त्याचं कारण वेगळं आहे. गेल्या काही महिन्यात हा एका पेपरमध्ये चांगलेच मार्क पाडलेत. आत्ता तो पेपर ऑउट ऑफ द बॉक्स असला म्हणून काय झालं.

शेवटी तो विषय पण आयुष्याच्या जगण्यामरण्याचा आहेच की, 

तर मुख्य मुद्यावर येतो आपल्या भावाचं MPSC करणाऱ्या पोरीसोबत जुळलय. जास्त नाही पण गेल्या चार महिन्यापासून एकत्र पोहे खावून ते प्रेमाचा महोत्सव साजरा करतेत. आम्हा सिंगल भिडू लोकांना पण त्याच जाम कौतुक वाटतं. पण मुळात हा फंटर आहे शामळू. त्याचं कस जुळलं हा आमच्यापुढे सर्वात मोठ्ठा प्रश्न होता. कारण कस विचारावं, काय बोलावं हे सल्ले तर तो आमच्याकडूनच घ्यायचा.

मी उठल्यालं त्याने बघितलं आणि तो लागलीच माझ्या शेजारी बसला. आजचा दिवस कुठला अस त्यानं विचारताच मी सांगितलं आज जेआरडी टाटा यांना विमान चालवण्याच लायसन्स मिळालं. आज भारतातला पहिला वैमानिक तयार झाला. माझ्या तोंडाकडं बघून तो हसला. याहून अधिक अस काहीच होवू शकत नव्हतं. त्यानंतर तो म्हणला, अरे ### आज टेडी डे आहे टेडी डे. आज टेडी घेवून द्यायची आहे. क्षणार्धात टेडी म्हणल्यानंतर बाहूली आणि बाहूली म्हणल्यानंतर तात्या विंचू आपल्या डोळ्यापुढे आला. आत्ता आपली पिढीच सह्रयाद्री बघत मोठ्ठी झाली त्याला आपण तर काय करणार. 

तर हा फंडर म्हणे मला बाहूली सुचवं, आत्ता मेन बाहुली निवडताना त्यानं आम्हाला विचारलं नाही. सुत जुळवताना टेन्शन आलं म्हणून चार दोन प्रश्न विचारले इतकच. आणि हा आत्ता बाहुली सुचव म्हणतोय. 

त्याला म्हणलं बस, बाहूली सुचव पेक्षा बाहूलीबद्दल सांगतो… 

आणि सुरू केलं इतिहासाचा तास. त्याला म्हणालो, बाहुलीचा इतिहास माणसाच्या इतिहासाइतकाच जुना आहे.  एखाद्या लहान मुलीला पहिल्यांदा आई होण्याचा मन हि बाहुलीच देते. आती प्राचीन काळात आदिमानवाने आपल्या बाहुल्या हाडे, लाकूड, दगड, माती अशा साध्या माध्यमांपासून तयार केल्या असतील. इ.स.पू. सुमारे ३००० – २००० च्या दरम्यान सपाट लाकडामध्ये कोरलेल्या जुन्यात जुन्या बाहुल्या प्राचीन ईजिप्शियनांच्या थडग्यांतून सापडलेल्या आहेत. ईजिप्त, ग्रीस, रोम येथील मुलांच्या थडग्यांत बाहुल्या पुरण्याची प्रथा होती, असे काही इतिहास तज्ञांना आढळून आले आहे.

या बाहुलीला धार्मिक कार्य कर्मांमध्ये देखील महत्व अाहे. म्हणजेच सुफलता विधी, विद्या व अन्य धार्मिक विधी यांतील एक सांकेतिक उपकरण म्हणून विशिष्ट प्रकारच्या बाहुल्या वापरल्या जात होत्या. तसेच जादूटोणा आणि मंत्र उपचार यावर विश्वास ठेवाणारे त्या काळातले लोक शत्रूला शिक्षा व्हावी, या इच्छेने मेणाची बाहुली करून शत्रूच्या शरीरावर जेथे त्रास व्हावा असे वाटत असे, तेथे टाचण्या टोचावयाची पद्धती काही समाजांत रूढ होती. जपानी आणि चीनी लोक देखील आपल्या कुटुंबियांच्या नावाने बाहुल्या तयार करीत असत. प्राचीन ग्रीसमध्ये देखील हातापायांची हालचाल करणाऱ्या बाहुल्या ज्ञात होत्या असे आढळून आले आहे.

सोळाव्या शतकाच्या मध्यादरम्यान मॉडेल म्हणून बाहुल्यांचा उपयोग करण्यास सुरुवात झाली. पॅरिस हे नवनव्या वेशभूषांचे केंद्र असल्याने नवनव्या वेशभूषांनी सजवलेल्या बाहुल्या निर्यात करण्यात येत.

त्याकाळात निर्माण होणाऱ्या लाकडी बाहुल्या खेळण्यासाठी गैरसोईच्या आणि ओबडधोबड असल्यामुळे सतराव्या शतकात चिंध्या, भुस्सा यांपासून बाहुल्या तयार करण्यास प्रारंभ झाला. नंतर मेणाच्या आणि खरे केस लावलेल्या बाहुल्या देखील आल्या. त्यानंतर पोकळ शरीर, हलणारे अवयव आणि डोळ्यांची उघडझाप करणाऱ्या बाहुल्या आल्या. एकोणिसाव्या शतकात इंग्लंडमध्ये ज्या सुंदर बाहुल्या तयार होऊ लागल्या, त्यांना मेणाचे मुखवटे लावलेले होते. जगातील एकूण उत्पादनापैकी निम्म्यापेक्षा जास्त बाहुल्या पहिल्या महायुद्धापर्यंत जर्मनीतच तयार झाल्या होत्या. तेथूनच चिनी मातीचे मुखवटे आणि मिनेकारी केलेले डोळे निर्यात होत असत. सगळ्यात आधी फ्रान्सने बाहुल्यांची तोंडे चिनी मातीची बनविण्यात यश मिळविले.

फ्रांसने तर जरा जास्तच क्रांती करून लिहू शकणाऱ्या व बासरी वाजविणाऱ्या बाहुल्याही यांत्रिक कलेचा उपयोग करून तयार केल्या होत्या.

आई असे म्हणारी बाहुली देखील तयार करण्यात आली होती. मेल्ट्सेल या जर्मन कारागिराने हि बाहुली तयार केली होती. एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी कागदलगद्यापासून बाहुल्या तयार करण्यास प्रारंभ झाला व तेव्हापासून बाहुली-उत्पादनास मोठ्या प्रमाणात चालना मिळाली.

भारतातही बाहुल्यांचे शेकडो प्रकार लोकप्रिय आहेत. भारतीय वैशिष्ट्ये दर्शविणाऱ्या बाहुल्या परदेशातही निर्यात होतात. भारतात पूर्वी बालविवाह रूढ होते, तेव्हा वधूला बाहुली भेट देण्याची प्रथा होती. जपानमध्ये दरवर्षी तीन मार्चला तेथील मुली ‘हिना-मात्सुरी’ नामक बाहुल्यांचा उत्सव साजरा करतात, तेव्हा बाहुल्यांचे कुटुंब परस्परांना भेटीदाखल देण्याची पद्धती दिसून येते.

भारतात दिल्ली येथे ‘शंकर्स इंटरनॅशनल डॉल्स म्यूझीयम’ प्रसिद्ध आहे. त्यात भारतीय आणि परदेशी नमुन्याच्या सु. २,००० बाहुल्या आहेत.

इतकं सगळ सांगून, शेवटी आपल्या तात्या विंचूकडे आलो. म्हणलो हे सगळं असलं तरी दोन्ही भूवयांच्या मध्ये गोळी मारल्यावरच मरणारा आणि माझा आत्मा तुझ्यात तुझा आत्मा माझ्यात करणारा एकमेव बाहुला जगाच्या पाठीवर होवुन गेला. निदान आजच्या या पवित्र दिवशी त्याच तर स्मरण कर. बाकी तुला काय घ्यायचं ते घे. अगदी दारावर अडकवायला घेतात तशी काळी बाहुली घेतली तरी चालेलं. मित्र खूष झाला. काळीच बाहूली देणार म्हणून अगदी आनंदात निघून गेला.

तासाभरापुर्वी तो रुमवर आला त्याला विचारलं मग कुठली बाहूली दिली. त्याने छान मस्त असा टेडी बियर दाखवलां. त्याला विचारलं अस का तर म्हणला,

तुम्ही जे सल्ले देता त्याच्या बरोबर उलटं मी करतो तू तात्या विंचू बोललास तेव्हाच कळालं तूझ्या सिंगल असण्याच कारण. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.