देशाच्या पहिल्या पंतप्रधान निवासावरून देखील मोठे वाद झाले होते..

देशात कोरोनाची दूसरी लाट सुरू आहे. ऑक्सिजन, रेमडीसीवीर या गोष्टी लोक अक्षरशः धावपळ करुन स्वतःच्या रुग्णांसाठी तरतूद करत आहेत. दुसऱ्या बाजूला ज्या वेगाने बाधितांची संख्या वाढत आहे, त्याच वेगाने मृत्यु देखील वाढत आहेत.

मात्र अशा परिस्थितीत देखील दिल्लीत पंतप्रधान निवासाचे काम जोरात सुरू आहे. ज्यासाठी १३ हजार कोटी रुपये खर्च येणार आहे. सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचा भाग असणाऱ्या या पंतप्रधान निवासस्थानाचे काम डिसेंबर २०२२ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे समजते.

त्यावरून सोशल मीडियावरुन सरकारवर टीका देखील होत आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी दोन दिवसांपूर्वीच ट्विट करत म्हंटले की, केंद्र सरकारने पंतप्रधान भवन बनवण्यासाठी १३,००० कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, आपली सर्व ताकद लोकांचे जीव वाचवण्यासाठी वापरायला हवी’.

हे सगळं असलं तरी दुसऱ्या बाजूला देशात एक पंतप्रधान निवास आज ही आपल्या सगळ्या इतिहासाची साक्ष देत उभं आहे. सध्याच्या पंतप्रधानांचे भविष्यातील घर जेवढं ऐतिहासिक असणार आहे, कदाचित त्याहून जास्त ऐतिहासिक हे पंतप्रधान निवासस्थान आहे. 

हे घर भारतात तीन मूर्ती भवन परिसर या नावानं ओळखलं जात. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी देखील काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे संग्रहालय आणि ग्रंथालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या तीन मूर्ती भवन परिसराच्या स्वरूपाशी छेडछाड न करण्यातचे आवाहन केले.

डॉ.मनमोहन सिंग यांच्या म्हणण्यानुसार, पंडित नेहरूंना केवळ कॉंग्रेस पक्षाशी जोडलेले पाहिले जाऊ नये, त्यांचा संपूर्ण देशाशी संबंध होता.

पंडित नेहरूंना स्वतंत्र भारताचे शिल्पकार असे वर्णन करताना मनमोहन सिंग यांनी असेही लिहिले की, देशातील त्यांचे योगदान विसरले जाऊ शकत नाही, म्हणून तीन मुर्ती भवन त्यांच्या नावाने समर्पित असू द्या. यामध्ये कोणताही बदल करू नये. असे केल्याने आपण आपला इतिहास व वारसा या दोन्ही गोष्टींचा सन्मान करू.’

नेमकं काय आहे तीन मूर्ती भवन?

१९११ साली पाचव्या जॉर्जच्या राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांनी आपली राजधानी कलकत्त्याहून दिल्लीला हलवली. राजधानीच्या निर्माणासाठी ल्यूटन्स सारख्या दिग्गज आर्किटेक्टची नेमणूक केली. त्याने नवी दिल्ली हे जवळपास नवे शहरच वसवले. यात देशाची संसद, व्हाइसरॉयचा बंगला जो पुढे जाऊन राष्ट्रपती भवन बनला. अशा अनेक इमारतींचे निर्माण केले होते.

याच काळात तीन मूर्ति भवन ब्रिटीश इंडियाचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ यांच्या निवासस्थानासाठी बांधले गेले होते. त्यानंतर त्याला ‘फ्लॅगस्टॅफ हाऊस’ असे म्हटले गेले. याची रचना ब्रिटीश आर्किटेक्ट रॉबर्ट टोर रसेल यांनी केली. १९३० साली तीन मूर्ती भवन भारताची नवीन शाही राजधानी नवी दिल्लीचा भाग म्हणून बांधून तयार झाले.

या इमारतीमध्ये तीन सैनिकांच्या पुतळ्यांचा समावेश आहे. फ्लॅगस्टाफ़ हाऊस हा ब्रिटिश सेनापतीचा बंगला होता आणि त्यांची इच्छा म्हणून पहिल्या महायुद्धात पराक्रम केलेल्या तीन भारतीय तुकड्यांच्या स्मरणार्थ हे स्मारक तयार करण्यात आले होते.

यात जोधपूर राज्य, हैदराबाद राज्य आणि म्हैसूर स्टेट अशा तीन रेजिमेंटचे सैनिक होते, ज्यांनी इस्रायल युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली. जोधपूर आणि म्हैसूरच्या सैनिकांनी प्रत्यक्ष युद्धामध्ये भाग घेतला, तर हैदराबादमधील सैनिक संचार वाहिन्या राखण्यात आणि जखमींची सेवा करण्यात कार्यरत होते.

मेजर दलपतसिंग शेखावत यांच्या नेतृत्वात जोधपूर सैनिक आघाडीवर होते आणि म्हैसूर आणि हैदराबाद सैन्याच्या मदतीने हाइफा युद्ध जिंकले. मेजर शेखावत हाइफा येथे लढताना मरण पावला. त्याला हायफाचा हिरो म्हणून ओळखले जाते.

या तीन रेजिमेंटच्या सैनिकांची आठवण म्हणून या इमारतीला तीन मूर्ती भवन म्हणून ओळखले जाऊ लागले.

स्वातंत्र्यानंतरच या तीन मूर्ती भवना संदर्भात वाद सुरू झाला होता

देशातील शेवटचे व्हाईसरॉय आणि पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन यांना गांधींनी व्हायसरॉय इमारतीऐवजी इतरत्र रहाण्याचा सल्ला दिला. जेबी कृपलानी यांच्या ‘पॉलिटिकल थिंकर्स ऑफ मॉडर्न इंडिया’ या पुस्तकात गांधींच्या सल्ल्याचा विचार करता माउंटबेटन यांनी नेहरूंना सुचवले की ते फ्लॅगस्टॅफ हाऊस (म्हणजेच तीन मूर्ति भवन) ला आपले निवासस्थान बनवण्याचा विचार करीत आहेत.

यावर आपण (माउंटबॅटन) काहीच महिने देशातच राहणार आहात आणि इतक्या कमी काळासाठी निवासस्थान बदलणे हा चांगला पर्याय नसल्याचे सांगत नेहरूंनी नकार दिला.

माउंटबॅटन त्यात राहण्यासाठी गेले नाहीत, परंतु, नेहरूंनी त्याला आपले निवासस्थान बनवले आणि इंदिरा गांधीसुद्धा त्यांच्याबरोबर राहायला लागल्या. ही इमारत पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी उपयुक्त असल्याचे स्पष्ट झाले कारण व्हायसराय हाऊसनंतर फ्लॅगस्टॅफ हाऊस ही दुसरी सर्वात शक्तिशाली इमारत होती.

भारताचे पहिले पंतप्रधान या इमारतीत सुमारे १६ वर्षे वास्तव्य करीत होते आणि त्यामुळे तीन मुर्ती भवन पंतप्रधानांचे निवासस्थान बनले किंवा नकळत सांगायचे तर ते एकपॉवर हाऊस बनले.

मे १९६४ मध्ये त्यांच्या निधनानंतर मात्र या बंगल्यावरून राजकीय उलथापालथ सुरू झाली.

जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर त्यांचे राजकीय वारसदार समजले जाणारे लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान बनले. सहाजिकच पंतप्रधान निवास असलेल्या तीन मूर्ती भवनला राहणाया जाण्याची त्यांनी तयारी केली. पण याच वरून त्यांच्यात व नेहरूंच्या सुपुत्री इंदिरा गांधी यांच्यात ठिणगी पडली.

इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू होते तेव्हापासूनच तीन मूर्ती भवन मध्येच राहत होत्या.

रामचंद्र गुहा यांनी ‘इंडिया आफ्टर गांधी’ मध्ये लिहिले की, लालबहादूर शास्त्री यांच्या पंतप्रधान कार्यालयाने इंदिरा गांधींना तीन मूर्ती  रिकामे करण्याचा आदेश देण्याची तयारी सुरु केली. जेव्हा ही  बातमी इंदिराजींना मिळाली तेव्हा त्यांनी आपल्या हितचिंतकांसह हे स्मारक एक राष्ट्रीय स्मारक बनविण्याचा प्रस्ताव दिला.

खरं तर तीन मूर्ती भवन हे पंतप्रधान निवास होते पण इंदिरा गांधींना ते निवासस्थान यापुढच्या कोणत्याच पंतप्रधानांना मिळू द्यायचे नव्हते. याच साठी त्यांनी नेहरूंचे स्मारक तिथे करावे अशी टूम काढली.

शास्त्रीजी इच्छा असूनही या प्रस्तावाविरूद्ध जाऊ शकले नाहीत. कॉंग्रेसने ऑगस्ट १९६४ मध्ये नेहरू मेमोरियल फंडची स्थापना केली. अध्यक्ष आणि सचिव म्हणून इंदिरा गांधी यांची नियुक्ती करण्यात आली आणि शास्त्री यांना आणखी एक निवासस्थान निवडण्यास भाग पाडले गेले.

त्याच वर्षी, तीन मुर्ती भवनात नेहरू स्मृती आणि संग्रहालय येथे बांधले गेले जे सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवस्थापित केले गेले.

या तीन मुर्ती भवनात अनेक संस्था आहेत, ज्यात नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी (एनएमएमएल) आहे, जे सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत आहेत आणि डॉ. करण सिंग कार्यकारी परिषदेचे अध्यक्ष आहेत. तसेच १९६४ साली तत्कालीन अध्यक्ष डॉ. एस. राधाकृष्णन यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना झालेल्या जवाहरलाल नेहरू मेमोरियल फंडाची कार्यालये देखील या संकुलात आहेत.

यासोबतच या भवनात अनेक राष्ट्रांची स्मृतिचिन्हे आहेत, ज्यात इंग्लंड, नेपाळ, सोमालिया, चीन इत्यादींचा सामावेश आहे. प्रत्येक स्मृतिचिन्ह प्रत्येक देशाचा उल्लेखनीय स्रोत दर्शवितो.

१९६४ मध्ये स्थापन झालेल्या ‘जवाहरलाल नेहरू मेमोरियल फेलोशिप’ या फाऊंडेशनला पुरस्कारही देण्यात आला आहे. या संकुलामध्ये ‘सेंटर फॉर कंटेमप्ररी स्टडीज’ आणि १९८४ मध्ये उघडलेले नेहरू तारांगण देखील आहे.

कॉंग्रेसच्या सरकारनंतर आलेल्या जनता पक्षाच्या सरकारने देखील त्यांच्या व्यवस्थापनात हस्तक्षेप केला नाही. म्हणजेच, त्यानंतरही गांधी-नेहरू कुटुंब त्याचे सर्वेसर्वा होते. १९९१ मध्ये पंतप्रधान नरसिंह राव यांच्या कार्यकाळात सोनिया गांधी यांना नेहरू मेमोरियल मेमोरियल अँड म्युझियम (एनएमएमएल) चे अध्यक्ष म्हणून नियुक्त केले होते. अशा प्रकारे गांधी-नेहरू परिवाराने या इमारतीचा एकप्रकारे ताबा घेतला.

त्यानंतर २०१८ मध्ये भाजप सरकारच्या काळात इथं आज पर्यंतच्या सर्व पंतप्रधानाच्या स्मरणार्थ भव्य म्युझियम बनवण्याचा निर्णय झाला. त्यानुसार इथला भूमिपूजन समारंभ देखील पार पडला. 

पण त्यावेळी काँग्रेसकडून त्याला तीव्र विरोध करण्यात आला होता. त्यावेळी पंडित नेहरूंच्या संपन्न वारश्याला आणि त्यांच्या बलिदानाला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यानंतर देखील सरकारकडून तब्बल २७१ कोटींच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला होता.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.