जया जेटली स्टिंग ऑपरेशन मध्ये सापडल्या आणि संरक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला.

१३ मार्च २००१, एक बातमी आली आणि संपूर्ण भारतीय राजकीय क्षेत्रात भूकंप झाला. अटलबिहारी सरकार संपूर्ण हादरले. भारतात पहिल्यांदाच राजकीय नेते, लष्करातील अधिकारी खुलेआम पैसे खाताना दिसत होते.

ती बातमी होती तहेलका मासिकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशनची.

नवं सहस्त्रक सुरु झालं तेव्हा पासून स्टिंग ऑपरेशनची एक नवी लाट निर्माण झाली होती. गुप्त कॅमेरे घेऊन स्टिंग ऑपरेशन हा शोध पत्रकारितेचा मोठा पाया झाला होता. क्रिकेट मधल्या मॅच फिक्सिंग पासून बॉलिवूड मधल्या कास्टिंग काऊच पर्यंत सगळी गटार उघडी झाली होती.

पण त्यावेळचं स्टिंग ऑपरेशन खास होतं कारण यात भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वतः पैसे घेताना व्हिडीओ मध्ये दिसत होते.

तहेलकाने या स्टिंगला नाव दिले होते ऑपरेश वेस्ट एन्ड.

या स्टिंग साठी तहेलकाने आपल्या पत्रकारांना लंडन मधील वेस्ट एन्ड नावाच्या काल्पनिक कंपनीचे प्रतिनिधी आहे असं दाखवून एक लष्करी डील करण्यासाठी पाठवून दिलं. या छुप्या पत्रकारांनी थर्मल कॅमेरे आणि इतर उपकरणे लष्कराला विकायचे आहेत असं दाखवून वेगवेगळया अधिकाऱ्यांची आणि पुढाऱ्यांची भेट घेतली. त्यांच्याशी झालेलं बोलणं, पैशांची देवाणघेवाण रेकॉर्ड केली. त्याच्या सीडीज रिलीज केल्या.

यात सर्वात महत्वाचं नाव होतं भाजपचे अध्यक्ष बंगारू लक्ष्मण. त्यांच्या खालोखाल सापडलेलं दुसरं मोठं नाव म्हणजे जया जेटली.

जया जेटली या समता पक्षाच्या अध्यक्षा होत्या. फक्त एवढीच त्यांची ओळख नव्हती. त्या संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या सोबती होत्या. हे दोघे एकाच घरात राहायचे. जया जेटली यांचे स्टिंग ऑपरेशन संरक्षण मंत्र्यांच्या घरातच झाले होते.

त्यांनी दोन लाख रुपये स्वीकारले असल्या बद्दलच सांगितलं जात होतं.

जया जेटली म्हणजे भारताचे जपानमधले पहिले राजदूत के के चेट्टर यांची मुलगी. त्यांचं लहानपण जपान आणि ब्रम्हदेश येथे गेलं. त्या १३ वर्षांच्या असतानाच वडिलांचे निधन झाले. जया जेटली आईच्या सोबत भारतात परतल्या. त्यांचं पुढील शिक्षण दिल्ली येथे झालं. मिरांडा कॉलेज येथे शिकत असताना आयुष्यात अशोक जेटली नावाचा मुलगा आला. विचार जुळले, घट्ट मैत्री झाली.

अशोक आणि जया दोघेही हुशार होते, त्यांना परदेशी शिक्षणासाठी  स्कॉलरशिप मिळाली. अशोक जेटली केंब्रिजला गेले तर ज्या अमेरिकेच्या स्मिथ कॉलेजला. तिथंच पत्रांमधून दोघांचं प्रेम फुलल. भारतात परतल्यावर दोघांनी लग्न देखील केलं. त्यांना अक्षय आणि अदिती नावाची दोन मुलं झाली.

अशोक जेटली हे आयएएस अधिकारी बनले. दोघेही विचारांनी डावीकडे झुकले होते. पुढे जेव्हा आणीबाणी नंतर जनता पक्षाचं सरकार आलं अशोक जेटली यांची नियुक्ती उद्योग मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांच्या सेक्रेटरी पदी झाली. या काळात जया जेटली फर्नांडिस यांच्या संपर्कात आल्या. त्यांच्यामुळेच या नवरा बायकोची समाजवादी विचारांशी, समता चळवळीशी ओळख झाली.

पुढे १९८४ सालच्या दिल्ली दंगलीनंतर तर जया जेटली यांनी सक्रिय राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला.

जया जेटली या महत्वाकांक्षी होत्या. हुशार होत्या. राजकारणातील डावपेच त्यांनी चटकन समजावून घेतले. जॉर्ज फर्नांडिस यांच्या पक्षात त्यांनी अगदी कार्यकर्तेपदपासून काम सुरु केलं. त्यांची कार्यक्षमता, कामाची उरक बघून त्या यशाची पायरी चढत गेल्या.

१९९१ साली भारताच्या लोकसभा निवडणुका होत होत्या, जॉर्ज फर्नांडिस तेव्हा रेल्वे मंत्री होते. त्यांच्या बंगल्यावर एकदा हअचानक काही म्यानमारचे तरुण आले. ते अंग सांग स्यू कि यांचे समर्थक होते, त्यांच्या देशात लोकशाहीची गळचेपी होत असल्यामुळे त्यांनी भारतात पळून येण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यांना भीती होती कि इथले पोलीस त्यांना पुन्हा म्यानमारला पाठवून देतील.

जॉर्ज फर्नांडिस यांनी त्या तरुणांना निशंकपणे माझ्या घरात रहा असे आश्वासन दिले.

ते आपल्या दौऱ्यामुळे दिल्लीतून बाहेर जाणार होते आणि जया जेटली आपल्या लहानपणी म्यानमारला राहिल्या असल्यामुळे त्या तरुणांच्या पाहुणचाराची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली. जेटली यांनी ती व्यवस्थितपणे पार पाडली.

याच काळात निवडणुकीचा निकाल लागला आणि जनता पक्षाचे सरकार पडून काँग्रेसचे सरकार निवडून आले.

जॉर्ज फर्नांडिस हे दिल्लीच्या बाहेर असूनही त्या तरुणांच्या काळजीने जेटली यांच्या संपर्कात होते. त्यावेळी ते छोट्या छोट्या सूचना चिठ्ठीच्या रूपातून जया जेटलींना पाठवत होते, यातूनच दोघांची जवळीक वाढत गेली.

जॉर्ज यांच्या पत्नी लैला कबीर या जया जेटली यांच्या देखील चांगल्या मैत्रीण होत्या. त्या बहुतांशवेळा अमेरिका व लंडन येथेच असायच्या. जया जेटली यांचे आपल्या पतीसोबतचे संबंधदेखील बिघडले होते. त्या दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

जया जेटली आणि जॉर्ज फर्नांडिस हे  एकत्र राहू लागले. दोघांचे नाते गुरु शिष्याच्या पुढे जाऊन पोहचलं होतं. जॉर्ज फर्नांडिस यांना छोट्या मोठ्या गोष्टीत जया जेटली यांची गरज होती. ते हळूहळू जोडीदारात रूपांतर झालं.

त्या काळी राष्ट्रीय राजकारणातले दोन नेते एकेमेकांसोबत लिव्ह इन रिलेशन शिप मध्ये राहतात ही  गोष्ट होती. पण जॉर्ज फर्नांडिस यांनी हे आपलं नातं कधी कोणापासून लपवलं नाही. याची राजकीय किंमत देखील चुकवावी लागली तरी त्यासाठी ते तयार होते.

आणि ती वेळ लवकरच आली.

जनता दलातून बाहेर पडल्यावर फर्नांडिस यांनी आपला समता दल स्थापन केला होता आणि त्याचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जया जेटली याना जबाबदारी दिलेली होती. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान बनल्यावर जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे संरक्षण दलाचे मंत्रालय देण्यात आलं. १९९९ च्या कारगिल युद्धासारख्या प्रसंगात त्यांनी आपल्या खंबीर नेतृत्वाचं दर्शन घडवलं. वाजपेयी यांच्या विश्वासातल्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होत होता.

जॉर्ज फर्नांडिस यांच्या मंत्रालयात जया जेटली हे स्वतंत्र शक्तीकेंद्र निर्माण झालं. त्यांचं राजकीय महत्व पक्ष पातळीवरच नाही तर राष्ट्रीय पातळीवर देखील प्रचंड वाढलं.

अशातच वर उल्लेख झालेलं स्टिंग ऑपरेशन झालं आणि देशभरात खळबळ उडाली.  मोठमोठे आर्मी ऑफिसर, भाजपचे अध्यक्ष सापडले यापेक्षाही  खुद्द संरक्षण मंत्र्याच्या घरात त्यांची सहचारणी या घोटाळ्यात अडकते हि मोठी गोष्ट होती. सर्व बाजूने कनेक्शन जॉर्ज फर्नांडिस यांच्याकडे संशयाची सुई रोखण्यास कारणीभूत ठरत होते.

वाजपेयी यांच्या एनडीए सरकारवर आजपर्यंत एवढे गंभीर आरोप कधी झाले नव्हते. त्यांच्या स्वच्छ कारभारावर या निमित्ताने पहिल्यांदाच डाग पडले होते आणि त्यात हा संरक्षण खात्यात झालेला घोटाळा असल्यामुळे जनतेच्या संवेदना त्याच्याशी जोडल्या गेलेल्या होत्या.

अखेर वाजपेयींनी जॉर्ज फर्नांडिस यांना राजीनामा द्यायला लावला.

एकेकाळी कामगारांचा तडफदार नेता, आपल्या एका इशाऱ्यावर मुंबई बंद पडणारा बंद सम्राट, भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा चेहरा जॉर्ज फर्नांडिस यांच्या राजकीय कारकिर्दीचा शेवट जया जेटलींनी घेतलेल्या दोन लाख रुपयांच्या लाचेमुळे झाला.

 गेली अनेक वर्षे हि केस चालली. दरम्यानच्या काळात पैसे स्वीकारताना कॅमेऱ्यावर झळकलेले बंगारू लक्ष्मण निर्दोष सुटले. त्यांचं निधन देखील झालं, अटलबिहारी वाजपेयी देखील आता नाहीत. जॉर्ज फर्नांडिस यांचं देखील निधन झालंय. आपला शेवटचा काळ त्यांनी जया जेटली यांच्यासोबत नाही तर आपली पत्नी लैला कबीर यांच्या सोबत व्यतीत केला. जया यांना त्यांच्या भेटीसाठी थेट सर्वोच्च न्यायालयाचे दार खटखटावे लागले.

मागच्याच वर्षी ऑपरेशन वेस्ट एन्डचा निकाल लागला आणि जया जेटली यात दोषी आढळल्या असून त्यांना जेल देखील झाली आहे.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.