एका बीच वरच्या वाळूत डिझाईन बनलं होतं. वाजपेयींनी नामकरण केलं, “तेजस”

या गोष्टीची सुरवात होते १९६४ साली. भारताने रशियाकडून लढाऊ मिग-२१ ही विमाने खरेदी केली होती. भारताचे ते पहिले सुपरसॉनिक जेट म्हणून ते प्रसिद्ध होते. संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे या विमानांची निर्मिती ओझरच्या HAL कारखान्यात सुरु झाली.

पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात या विमानांनी जोरदार कामगिरी करून दाखवली. रशियन मिग विमानांमुळे भारत हवाई युद्धात पाकिस्तानच्या एक पाऊल पुढेच राहिला. १९७१ च्या बांग्लादेश युद्धात आपण पाकिस्तानला गुडघ्यावर आणलं.

मात्र सत्तरचं दशक संपत आलं तस फक्त मिग विमानांवर अवलंबून राहणे भारताच्या सुरक्षिततेसाठी पुरेसं नव्हतं. त्यामुळेच ब्रिटन कडून जॅग्वार विमाने खरेदी करण्यात आली. अशातच बातमी कळली कि पाकिस्तानला अमेरिका अत्याधुनिक एफ-१६ हि विमाने पुरवणार आहे. त्यामुळे आपले वर्चस्व कमी होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

याला उत्तर म्हणून इंदिरा गांधींनी दोन पावले उचलली. एक म्हणजे फ्रांस कडून मिराज २००० हे विमान खरेदी करायचं आणि दुसरं म्हणजे संपूर्ण भारतीय बनावटीचं लढाऊ विमान बनवायचं, जेणे करून आपल्या हवाई दलाला इतर देशांवर कायम विसंबून राहावे लागणार नाही. 

इंदिरा गांधींचा ड्रीम प्रोजक्ट म्हणून याची सुरवात झाली. नाव देण्यात आलं  Light Combat Aircraft अर्थात LCA

बंगळूरु येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. (एचएएल) कडे १९८३ साली एलसीएच्या रचनेची जबाबदारी सोपवण्यात आली. १९८४ साली त्यासाठी एरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सीची (एडीए) स्थापना करण्यात आली तसेच देशातील अन्य अनेक प्रयोगशाळा आणि संस्थांचे सहकार्य घेण्यात आले. एलसीएसाठी शक्तिशाली जेट इंजिन तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान होते. त्यासाठी स्वदेशी कावेरी नावाच्या इंजिनाचा प्रकल्प हाती घेण्यात आला. मात्र तो यशस्वी होऊ शकला नाही.

भारतातले सर्वोत्तम इंजिनियर या प्रोजेक्ट साठी नियुक्त करण्यात आले होते. यातच होते मानस बिहारी वर्मा.

LCA च्या डिझाईनिंगसाठी ज्या टीमची निवड झाली होती त्याचा ते भाग होते. एक विमान डिझाईन करायचे तर दहा दहा वर्षे खर्च होतात. भारतासारख्या विकसनशील देशाला इतका वेळ देणे परवडणार आहे का याची ओरड विरोधी पक्षांकडून होत होती.

एकदा मानस बिहारी वर्मा आणि आणखी त्यांच्या टीममधील चार पाच मित्र एकदा बेंगलोरवरून जवळच्या समुद्रकिनाऱ्यावर सुट्टी साठी गेले होते. मात्र तिथेही त्यांची चर्चा विमानाच्या डिझाईनबद्दलच चालू होती. गेले कित्येक दिवस ते एका कुठल्या तरी गोष्टीत अडकले होते. त्यांना मार्गच सुचत नव्हता.

तेव्हा त्या पाच जणांपैकी कोणाला तरी समुद्रात पोहताना एक कल्पना डोक्यात चमकून गेली. त्यांनी तिथेच समुदकिनाऱ्यावरच्या वाळूत काटक्यांनी विमानाचं डिझाईन तयार केलं. महिनोंमहिने तहान भूक विसरून ते ज्याचा विचार करत होते त्याला योगयोगाने मार्ग निघाला.

मधल्या काळात सरकारे बदलली. इंदिरा गांधींची हत्या, राजीव गांधींवरचे बोफोर्सचे आरोप, पुढे आलेलं व्ही पी सिंग, चरणसिंग यांचं सरकार, राजीव गांधींची हत्या, नरसिंह राव यांचे जागतिकीकरण या सगळ्या धडाक्यात मुंगीच्या गतीने लढाऊ विमानाचा प्रोजेक्ट सुरु होता.

नव्वदच्या दशकात एका धडाकेबाज संशोधकाची या प्रोजक्ट वर नियुक्ती झाली. त्याच नाव डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम 

कलाम त्याकाळात पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांचे विज्ञान विषयक सल्लागार होते. त्यांनी या विमानांच्या निर्मितीसाठी फ़ंड खुले केले. संशोधकांना सूट दिली. स्वतः रात्रंदिवस त्यांच्या सोबत राहून त्यांना मदत केली. विमान निर्मितीच्या प्रोजेक्टला खरा वेग दिला तो अब्दुल कलाम यांच्या प्रयत्नांनी. मध्यंतरी पोखरण चाचणीमुळे त्याला लागलेला ब्रेक देखील कलामांनी वाजपेयींच्याकडे विनंती करून या कडे दुर्लक्ष होऊ दिल नाही.

अखेर अनेक वर्षांच्या प्रयत्नांनी LCA च्या प्रोटोटाइपचं पहिले यशस्वी उड्डाण ४ जानेवारी २००१ रोजी झाले.  

इंदिरा गांधींचे स्वप्न म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विमानाचं नामकरण वाजपेयींनी केलं. DRDOच्या  संशोधकानी पंतप्रधानांना पाच नावे सुचवली होती. वाजपेयींनी त्यातलं तेजस हे नाव फायनल केलं.  म्हणणं होतं,

“तेजसचा उल्लेख भगवदगीतेत एकूण १४ वेळा आला आहे. हेच नाव विमानासाठी योग्य आहे.”

पहिल्या तेजसच उड्डाण यशस्वी झाले मात्र त्याच्या कमनशिबाचा फेरा संपला नव्हता. अनेक अडचणी तेजस विमानाभोवती सुरूच होत्या.

अखेर २००४ साली जनरल इलेक्ट्रिकशी एफ-४०४ जीई-आयएन २० ही इंजिनाची सुधारित आवृत्ती पुरवण्याचा करार झाला. अनेक बदल करत सुधारणा होत होतं राजकीय हस्तक्षेपायावर मात करत २०१६ साली तेजस मार्क वन भारतीय हवाई दलात सामील झाले.

एक छोटा स्वप्न पूर्ण होण्यास ३६ वर्षे लागली.

तेजसचा मूळ सांगाडा (एअरफ्रेम) अ‍ॅल्युमिनियम-लिथियम मिश्रधातू, कार्बन कॉम्पोझिट आणि टायटॅनियमचे मिश्रधातू यातून बनवला आहे. त्यामुळे तो हलका आणि मजबूत आहे. यासह एलसीएसाठी त्रिकोणी आकाराचे पंख (डेल्टा विंग्ज), ग्लास कॉकपिट (अ‍ॅनालॉगऐवजी डिजिटल डिस्प्ले असलेले कॉकपिट), इलेक्ट्रॉनिक फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, फ्लाय-बाय-वायर यंत्रणा, अत्याधुनिक रडार यंत्रणा आदी व्यवस्था विकसित करणे गरजेचे होते.

यातील बहुतांश यंत्रणा देशातच विकसित करण्यात आल्या. आता एलसीएचे साधारण ७० टक्के भाग स्वदेशी बनावटीचे आहेत.

तेजसच्या निर्मितीत सिंहाचा वाटा असणाऱ्या मानस बिहारी वर्मा यांना पदमश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.