शिवसेनेला गरज असलेला आक्रमक चेहरा म्हणून तेजस ठाकरे राजकारणात येणार?

शिवसेना आणि ठाकरेंचा आक्रमक पवित्रा हे समीकरण राजकारणात नवं नाही. मात्र, सध्याची सेनेतली परिस्थिती पाहिली तर, उद्धव आणि आदित्य ठाकरे हे अतिशय संयमी आणि शांत स्वभावाचे म्हणून ओळखले जातात. पण शिवसैनिकांसाठी शिवसेना ही मवाळ, शांत विचारांची कधीच नव्हती.

त्यामुळे, शिवसेनेला आक्रमक राजकारणाकडे वळणं गरजेचं आहे असं बोललं जातंय.

आणि तोच आक्रमक चेहरा म्हणून तेजस ठाकरेंकडे पाहिलं जातंय.

तेजस ठाकरेंकडे आशावादी नजरेनं बघण्याचं कारणही तसंच आहे. खुद्द बाळासाहेबांनी एकदा भाषणात म्हटलं होतं की,

“आदित्य हा उद्धव सारखा संयमी आणि मवाळ आहे. पण, तेजस माझ्यासारखा आहे.”

आता ज्या ज्या शिवसैनिकांना बाळासाहेबांचे हे शब्द लक्षात आहेत त्या सगळ्या शिवसैनिकांना तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या एंट्रीची आस लागली असणार.

तेजस ठाकरेंच्या राजकीय पदार्पणाची चर्चा आजपर्यंत बऱ्याचदा झाली.

तेजस यांच्या वाढदिवसादिवशी जाहिरातही आली होती.

७ ऑगस्ट २०२१ ला सामना या वर्तमानपत्रात तेजस ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त जाहिरात देण्यात आली होती. त्या दिवशी सर्व माध्यमांमधून तेजस ठाकरे या नावाची चर्चा झाली. कारण देखील तसच होतं..

ही फक्त जाहीरात असती तर ठिक होतं, पण ही जाहिरात देणारा माणूस देखील खास होता. जाहिरात देणाऱ्या माणसाचं नाव होतं मिलिंद नार्वेकर…

उद्धव ठाकरेंचे एकदम खास, उद्धव यांच्या सहमतीशिवाय नार्वेकरांनी ही जाहिरात दिली नसती. अशा प्रकारची जाहिरात थेट वर्तमानपत्रात दिल्यामुळे चर्चा सुरू झाली ती तेजस ठाकरेंच्या राजकीय प्रवेशाची. पण तेव्हा फक्त ही चर्चाच होती.

तात्काळ या चर्चांना ब्रेक देखील लावण्यात आला. त्याचं कारण होतं शिवसेनेला घराणेशाहीचा आरोप अजून गडद करायचा नव्हता. अस म्हणलं जातं की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, आदित्य ठाकरे पर्यावरण मंत्री. वडिल आणि मुलाकडे अगोदरच दोन मंत्रीपदं. त्यातही कुठेतरी तेजस सक्रिय होत चालले आहेत हा मॅसेज गेला तर शिवसेनेत अंतर्गत विरोध वाढेल..

त्यानंतर चर्चा रंगली ती एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी.

शिवसेनेतून एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत आमदार, खासदार यांचा एक गट बाहेर पडला… सत्तेत आला आणि शिवसेना संपल्याचे दावे केले जाऊ लागले. त्यावेळी शिवसेनेला आक्रमक चेहरा हवा आहे असं एक मत मीडियामधून दाखवलं गेलं.

आणि चर्चा सुरू झाल्या त्या तेजस ठाकरेंच्या राजकारणातल्या एंट्रीच्या.

पण, त्यावेळीही तसं झालंच नाही. तेजस ठाकरे काही अजूनतरी राजकारणात आलेले नाहीत. तेजस यांच्या राजकारणातल्या एन्ट्री बाबत विचारल्यावर आदित्य ठाकरे म्हणाले होते,

“तो त्याच्या वाईल्ड लाईफमध्ये खूष आहे आणि आम्ही आमच्या वाईल्ड लाईफमध्ये”

आता पुन्हा एकदा तेजस ठाकरे यांच्या राजकीय आखाड्यात उतरण्याच्या शक्यता वर्तवल्या जातायत कारण, आता मुंबईतल्या गिरगाव भागात तेजस ठाकरेंचे फोटो लावून बॅनरबाजी करण्यात आलीये.

या बॅनरवरचा मजकूरही इंटरेस्टींग आहे. तो मजकूर आहे,

“आजची शांतता, उद्याचं वादळ… नाव लक्षात ठेवा तेजस उद्धव ठाकरे”

तेजस ठाकरे आत्ता राजकारणाच्या आखाड्यात उतरू शकतात याची काही प्रमुख कारणं आहेत तीच कारणं बघुयात.

पहिलं कारण म्हणजे उद्धव ठाकरेंच सहानभुतीचं वारं..

उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर अन्याय झाल्याची भूमिका मांडली. लोकांमध्ये उद्धव ठाकरेंबाबत सहानभुतीचं वातावरण निर्माण झालं आणि ते वारं अजूनही कायम आहे. पण शिवसैनिक म्हणून असणाऱ्या आणि मुळ शिवसेनेच्या मतदारांचा पिंडच सहानभुतीचा नाही. भुजबळांनी जेव्हा शिवसेना सोडली होती तेव्हा भुजबळांना चार वर्ष संरक्षण घेवून रहावं लागलं होतं. त्यांच्या घरावर हल्ले करण्यात आले होते तसेच मुंबईच्या निवडणूकीत त्यांना पराभव सहन करावा लागला होता. त्यानंतर मुंबईतून उभा राहण्याचं धाडस भुजबळांनी दाखवलं नाही.

मुळचा शिवसैनिक हा बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक वृत्तीने तयार झालेला आहे. अशा वेळी तात्काळ प्रतिक्रिया म्हणून तो सहानभुती दाखवू शकतो पण कायमचा मतदार म्हणून शिवसेनेकडून आक्रमक राजकारणाचीच तो अपेक्षा करतो. अशा वेळी उद्धव ठाकरेंकडे सहानभुती, अन्याय झालेले नेते म्हणून पाहणं व त्यांच्यामागे उभा राहणं हे लॉन्गटर्म राजकारण ठरणार नाही हे स्पष्टचं होतं..

आदित्य ठाकरेंची देखील झालेली मवाळ राजकारण्याची इमेज

उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरेंची इमेज देखील मवाळ राजकारणी म्हणूनच झालेली आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये रोजचा सामना रंगवता येईल, खटके उडवता येतील, लोकांमध्ये मिसळता येईल अस खातं न घेता आदित्य ठाकरेंनी पर्यावरण मंत्रालयाला पसंती दिली.

पर्यावरण खात्यासोबत लोकांची दैनंदिन कामे यावीत हा प्रश्नच उद्धभव्त नव्हता. दूसरीकडे या खात्यामुळे आदित्य ठाकरे आंतरराष्ट्रीय बैठका, परिसंवाद अशा गोष्टीमध्ये रमत गेले. आदित्य ठाकरेंची युथ ची नस पकडून एक हूशार, अभ्यासू राजकारणी म्हणून प्रतिमा तयार करण्याची तयारी जरी करण्यात आली असली तरी मुळच्या शिवसैनिकांची नस पकडून ठेवणारी ती इमेज बिल्डिंग ठरली नाही. पर्यायाने आदित्य ठाकरेंची इमेज देखील मवाळच झाली.

बाळासाहेब ठाकरे, भुजबळ, नारायण राणे, राज ठाकरे, एकनाथ शिंदे यांना पर्याय..

शिवसेनेला फक्त बाळासाहेब ठाकरेंच्या आक्रमक नेतृत्त्वालाच पर्याय शोधायचा नाही तर बाळासाहेब, भुजबळ, राणे, राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्व नेत्यांच्या वृत्तीचा आणि कृतीचा माणूस तयार करावा लागणार आहे. कारण हीच शिवसेनेची खरी ओळख होती. बाळासाहेबांच्या हयातीत भुजबळ, राणे, राज ठाकरे बाहेर पडल्याने पक्षाला आक्रमक भाषेची गरज पडली नाही पण बाळासाहेबांच्या नंतर मात्र पक्षात एकनाथ शिंदे यांच्यासारखे निवडक लोक होते जे प्रत्यक्ष कृतीतून आक्रमक नेतृत्त्व रेटत होते. एकनाथ शिंदे यांच्यासोबतच गुलाबराव पाटील यांच्यासारखे लोक आज पक्षाच्या बाहेर गेले आहे.

संजय राऊत यांच्यासारखी भाषाशैली बऱ्याचदा पक्षाला अडचणीतच आणणारी ठरत आहे. शिवाय संजय राऊत हे फक्त भाषाशैलीसाठीच मर्यादित असलेले दिसून येतात. आज उद्धव यांच्यासोबत अनिल परब, सुभाष देसाई, संजय राऊत, मिलिंद नार्वेकर असे निवडक लोक आहेत यातून कोणतच नेतृत्त्व आक्रमक भाषा आणि आक्रमक कृती करणारं ठरू शकणार नाही अशा वेळी पर्याय उरतो तो फक्त तेजस ठाकरे यांचाच..

आणखी एक कारण म्हणजे मुंबईची सत्ता.

मुंबई हा शिवसेनेसाठी अतिशय जवळचा आणि महत्त्वाचा विषय आहे. यंदा मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका होणार आहेत. बंडखोरीमुळे सध्या शिवसेनेची ताकद कमी झाली आहे. असं असलं तरी मुंबईला हातून जाऊ देण्याची शिवसेनेची अजिबात इच्छा नसणार हे स्पष्ट आहे.

त्यातच, भाजपकडून योगी आदित्यनाथ यांनी मुंबईत रोड शो केल्यानंतर भाजप मुंबई महानगर पालिकेसाठी पूर्ण ताकद लावणार हे नक्की. त्यामुळे, शिवसेनेला नवा डाव खेळणं गरजेचं असेल. हाच नवा डाव म्हणजे, ‘तेजस ठाकरे.’

शेवटचं कारण म्हणजे, घरचा माणूस…

बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन व्यक्ती सोडले तर सेनेतून ठाकरे आडनावाचं आक्रमक नेतृत्व तयार झालं नाही. या दोघांपैकी राज ठाकरेंना पक्ष सोडावा लागला. त्यानंतर शिवसेनेत जे आक्रमक नेते होते ते सर्व नेते ठाकरे कुटूंबाच्या बाहेरचे लोक होते. बाहेरील व्यक्तीला मोठ्ठं करण्याचा फटका ठाकरे कुटूंबाला सध्या बसलेला दिसूनच येतोय अशा वेळी घरचाच माणूस म्हणून तेजस ठाकरे आक्रमकपणे राजकारणात उतरतील यात शंका नाही…

पण, सध्याची बॅनरबाजी ही त्यांच्या राजकीय आखाड्यातल्या एंट्रीपुर्वी आखाड्यातल्या मातीची मशागत केली जातेय का? अशा चर्चा सुरू आहेत.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.