तेजस्वी यांना व्हॉट्सॲप नंबरवर तब्बल ४७ हजार लग्नाची स्थळं आली होती.

महाराष्ट्रात अनेक राजकीय नेत्यांच्या घरी लग्नाचे वारे वाहू लागलेय…आता बिहार मधून देखील बातमी आली कि, लालू कुटुंबात देखील आता शहनाई वाजणार आहे.

तेजस्वी यादव गुरुवारी दिल्लीत एंगेजमेंट करणार आहेत. लालू प्रसाद यांच्या धाकट्या मुलाच्या लग्नाचा हा सोहळा अगदी सिक्रेट ठेवण्यात आला असून, मिळालेल्या माहितीनुसार, त्यात फक्त कुटुंबीय आणि नातेवाईकच हजेरी लावणार आहेत.

बिहारच्या लालू कुटुंबातले सर्वात तरुण सदस्य तेजस्वी यादव लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत अशी बातमी आली आहे. लालूप्रसाद आणि राबडीदेवी यांच्या मुलाचे म्हणजे तेजस्वी यादव यांच्या लग्नाबाबतच्या सर्व चर्चांना त्यांची बहीण रोहिणी आचार्य यांनी दुजोरा दिला आहे. तेजस्वी यांची बहिण रोहिणी या सोशल मीडियावर बऱ्याच सक्रीय असतात त्यांनीच त्यांच्या भावाच्या लग्नाची बातमी देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. 

तेजस्वी यांच्या लग्नाची पुष्टी झाल्यामुळे तेजस्वी यांच्या होणाऱ्या नवरीचे नावही समोर आले आहे. राजश्री असे या तरुणीचे नाव असून ती हरियाणातील रेवाडी जिल्ह्यातील आहे. यासोबतच सोशल मीडियावर एक फोटोही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे….

आता लग्नाच्या चर्चा आत्ता रंगल्या असल्या तरीही या आधी देखील त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या होत्या जेंव्हा ते २०१५-१६ च्या दरम्यान बिहारचे उपमुख्यमंत्री होते. 

ते बिहारमधले द मोस्ट एलिजिबल बॅचलर म्हणून फेमस आहेत. म्हणजेच त्यांच्या सोबत लग्न करण्यासाठी पोरी अक्षरशः मरतात..आता तुम्ही म्हणाल मी काय टाईमपास बोलतेय पण हो खरंच याचा अनुभव संपूर्ण बिहारला आलेला. त्यांना अक्षरशः लग्नाचे हजारो प्रपोजल्स यायचे. विशेष म्हणजे हे सर्व प्रस्ताव तेजस्वी यांच्या मोबाईलवर व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून येत असायचे.

त्याचं झालं असं कि, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री बनले होते. तेंव्हा त्यांनी जनतेच्या सार्वजनिक कामांसाठी म्हणून त्यांनी जनतेसाठी त्यांचा नंबर सार्वजनिक केला होता. 

तेजस्वी हे बिहारच्या रस्ते बांधकाम विभागाचे मंत्री होते आणि त्यांनी बिहारच्या रस्त्यांच्या समस्येबाबत एक व्हॉट्सअॅप नंबर जारी केला होता. या क्रमांकावर कोणतीही व्यक्ती आपल्या भागातील रस्त्यांच्या समस्येबाबत फोटो पाठवू शकते आणि त्यानंतर विभाग त्या क्रमांकावर फोन करून कारवाई करत असे.

बिचाऱ्या तेजस्वी यांनी जनतेच्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी त्यांचा नंबर सार्वजनिक केला होता. पण बिहारच्या जनतेने त्यांना सार्वजनिक बांधकामाच्या तक्रारी आणि मागण्या करण्यासाठी नाही तर लग्नाच्या मागण्या घालण्यासाठी वापरला होता. 

तेजस्वी यादव यांना मुलींचे फोटोसहित बायोडाटा यायचे. त्यात मुलींची जाडी, रंग, उंची असे सगळे डीटेल्स यायचे.

या नंबरवर तेजस्वी यांना तब्बल ४७ हजार मेसेज आले होते, ज्यामध्ये ४४ हजार मेसेजस तर लग्नाच्या मागणीसाठी आले होते. 

०९४३००० १३४६  या क्रमांकावर मेसेज आल्याने मंत्र्यांपासून ते त्या विभागातील अधिकारी तसेच क्लर्क लोकं वैतागून गेले होते. तेंव्हा तेजस्वी यादव मात्र गंमतीने म्हणत असत कि, जर मी विवाहित असलो असतो तर मोठं संकट आलं असतं, माझी बायको मला भांडली असती. 

तेजस्वी यादव आणि त्यांचा मोठा भाऊ तेज प्रताप या दोन्ही नेत्यांचा नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. तेंव्हा तेजस्वी यादव यांचे वय फक्त २६ वर्षे होते. तेजस्वीचे लग्न योग्य वयात होईल आणि जात यात अडथळा ठरणार नाही, असेही लालू यादव तेव्हा म्हणाले होते.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.