तेलंगणा सचिवालयानंतर नव्या संसदभवनाला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी होतीये

भारताच्या संसद भवन परिसराचं नव्यानं बांधकाम होतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं ड्रीम प्रोजेक्ट असणाऱ्या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाअंतर्गत नवीन संसद, राजपथ (ज्याचं नाव कर्तव्यपथ करण्यात आलं आहे), सचिवालय, पंतप्रधानांचं कार्यालय आणि पंतप्रधानांचं निवासस्थान यांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. नरेंद्र मोदींनी राजपथाचं नाव कर्तव्यपथ करण्यावरुनही राजकारण तापलं होतंच, एवढंच नाही तर नव्या संसद भवनावर लावण्यात आलेल्या भारताच्या राष्ट्रचिन्हाच्या प्रतिमेवरुनही बरीच खडाजंगी झाली होती.

आता हा सेंट्रल व्हिस्टाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय आणि विषय आहे नव्या संसद भवनाचं नाव…

तेलंगणा सरकारनं नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करणारा ठरावही दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर केला आहे. सोबतच तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपण स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून ही मागणी करणार असल्याचं सांगितलंय.

थोडक्यात काय तर केसीआर नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याचा मुद्दा लाऊन धरणार हे नक्की.

पण केसीआर नुसती मागणी करण्यावरच थांबले नाहीयेत, तर त्यांनी तेलंगणात नव्यानं बांधल्या जात असलेल्या सचिवालयला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दिलं आहे आणि या मुद्द्यावरून तेलंगणात आरोप-प्रत्यारोपांचं राजकारणही केलं जातंय.

त्याचं झालं असं की, तेलंगणात ६५० कोटी रुपये खर्च करुन ७ मजली सचिवालय बांधण्यात येतंय. या नव्या इमारतीचं ९० टक्के बांधकाम पूर्ण झालं असून, दसऱ्याच्या दिवशी या इमारतीचं उदघाटन करण्याचं नियोजन आहे. काँग्रेस नेते भट्टी विक्रमार्का मल्लू यांनी केलेल्या मागणीनुसार केसीआर यांनी नव्या सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची घोषणा केली.

केसीआर यांच्या या घोषणेनंतर सत्ताधारी तेलंगणा राष्ट्र समितीच्या नेत्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि केसीआर यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेकही केला.

केसीआर यांनी तेलंगणाच्या सचिवालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यामागचं कारणही सांगितलं आहे…

ते म्हणाले, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमधल्या कलम ३ मध्ये असलेल्या तरतुदींमुळेच प्रदीर्घ लढ्यानंतर तेलंगणा हे स्वतंत्र राज्य बनू शकलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आखून दिलेल्या तत्त्वांवरच राज्य वाटचाल करत आहे. त्यामुळेच राज्यातल्या सगळ्या घटकांना आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये समान संधी उपलब्ध करुन देता आली आहे.’

हा मुद्दा राष्ट्रीय चर्चेचा झाला तो आरोप प्रत्यारोपांमुळं…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्यावर दुग्धाभिषेक करणारे तेलंगणाचे परिवहन मंत्री पुव्वदा अजय कुमार यांनी केसीआर यांचं कौतुक करण्यासोबतच भाजपलाही लक्ष्य केलं. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी घेतलेला निर्णय हा ऐतिहासिक आहे. भाजपशासित राज्यांमध्ये असलेल्या दलितांमध्ये दहशतीचं वातावरण आहे, दुसऱ्या बाजूला तेलंगणा सरकार दलित बंधू योजनेद्वारे दलितांना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी प्रयत्न करत आहे. या चांगल्या निर्णयावरुन भाजप राजकारण करण्याचा आणि विषय भरकटवण्याचा दुर्दैवी प्रयत्न करत आहे.’

अजय कुमार यांनी अशी टीका करण्यामागचं कारण म्हणजे तेलंगणा भाजपचे अध्यक्ष आणि खासदार बांदी संजय यांनी केसीआर यांच्यावर केलेली टीका…

बांदी संजय म्हणाले की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव सचिवालयाला देणं हा निश्चितच चांगला निर्णय आहे. मात्र जर सरकारचं खरंच दलितांवर प्रेम असेल, तर जोपर्यंत तेलंगणा राष्ट्र समिती सत्तेत आहे, तोवर एखादा दलित बांधव मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायला हवा.’

विषय फक्त एवढ्यापुरताच मर्यादित नाहीये, तर जेव्हा तेलंगणाच्या विधानसभेत देशाच्या नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची मागणी करण्याचा ठराव मंजूर झाला तेव्हा भाजपचा एकही आमदार सभागृहात उपस्थित नव्हता. साहजिकच तेलंगणा राष्ट्र समितीसोबतच काँग्रेस आणि एमआयएमनं या मुद्द्यावरुन भाजपवर टीका केली.

नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी करणारे केसीआर एकटेच नाहीयेत…

अखिल भारतीय एससी/एसटी महासंघानंही भारतीय संविधानाचे शिल्पकार असणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव नव्या संसद भवनाला देण्यात यावं अशी मागणी केली आहे. या महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी लोकसभा खासदार उदित राज यांनी, ‘डिसेंबर २०२० मध्येच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे याबाबत मागणी केली होती, आता पुन्हा एकदा त्यांना याची आठवण करुन देणार आहोत. आणखी काही खासदारही एकत्रितपणे याबाबतचं निवेदन देण्याच्या विचारात आहेत.’ अशी माहिती दिली.

तर एमआयएम पक्षाचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनीही नव्यानं बांधण्यात येत असलेल्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी केली आहे. ‘संसद ही संविधानावर चालते, त्यामुळे संसद भवनाचं नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावरुन ठेवायला हवं.’ असं वक्तव्य त्यांनी केलं होतं.

त्यामुळे आगामी काळात तेलंगणासोबतच इतर राज्यांतून आणि पक्षांकडून नव्या संसद भवनाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्यात यावं अशी मागणी होऊ शकते, साहजिकच भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.