प्रमोद महाजनांनी खूप आकांडतांडव केला मात्र या मालिकेचं प्रक्षेपण काही थांबलं नाही.

तमस….

८०-९० च्या दशकात गाजलेली सिरीयल. भारतीय इतिहासातील अगदी महत्वाचा मुद्दा राहिला तो भारताची फाळणीचा आणि याच फाळणीच्या वास्तवाबद्दल यात अगदी परखडपणे मांडलंय.

थोडक्यात या सिरीयल मध्ये फाळणीच्या काळातील स्थलांतरित शीख आणि हिंदू कुटुंबांची भारतातील झालेली दुर्दशा मांडली आहे. या फाळणीच्या  निर्णयामुळे लोकं मोठ्या भावनिक अस्वस्थतेतून गेले आहेत हे त्यातून दिसून आलं.

हि सिरीयल भीष्म साहनी लिखित ‘तमस’ नावाच्या हिंदी कादंबरीवर आधारित आहे.

या कादंबरीला १९७५चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता.

१९८८ मध्ये दूरदर्शनवर हि मालिका प्रदर्शित व्हायची. या मालिकेत पाकिस्तानमधील विभाजनामुळे शीख आणि हिंदू समुदायावर होणारे दुष्परिणाम दाखवले गेले आहेत. सुरुवातीला ही छोटी मालिका म्हणून दूरदर्शनवर आली. या मालिकेच्या मुख्य कलाकारांपैकी एक म्हणजे द लीजेंड “ओम पुरी यांचा मुख्य रोल आहे. दीपा साही, अमरीश पुरी, ए.के. बक्षी जी, मनोहर सिंग, इ. पट्टीचे कलाकार आहेत, ज्यांनी यात ताकदीचा अभिनय केला.

ही मालिका पाहणे हे येणाऱ्या प्रत्येक पिढीसाठी महत्वाचे आहे.

या मालिकेच्या कथानकावरून असे दिसून येते की, पाकिस्तानमध्ये झालेल्या हिंसाचार आणि अशांतते मुळे विविध समुदायांची दिशाभूल होते आणि त्याचा मोठा परिणाम समाजावर होतो. या मालिकेचे लेखक आणि दिग्दर्शक गोविंद निहलानी यांनी पंजाबमध्ये चित्रीकरणाचा विचार केला होता मात्र त्या दरम्यान झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळेच त्यांनी मुंबईमध्ये याचे शूट केले.

परंतु गोविंद निहलानी यांना तमस वर मालिका बनविण्याचे कसे सुचले याबाबतीत झालं असं कि,  जेंव्हा दिल्लीत गांधी चित्रपटाचे शूटिंग चालू होते. शुटींग आटपून संध्याकाळी गोविंद निहलानी सहजच फिरायला निघाले होते तेंव्हा त्यांना रस्त्यातल्या एका बुकशॉपमध्ये ‘तमस’ नावाचे पुस्तक दिसले. त्यांनी लगेच पुस्तक विकत घेतले ते यावर आधारित मालिका बनवणारच या उद्देशाने !

तेंव्हा त्यांना काय कल्पना कि त्यांच्या याच मालिकेवरून मोठा वादंग होणार होता.

झालं ! हि सिरीयल आली ती सोबत मोठा वाद घेऊनच…या कलाकृतीला वाईट ठरवून तिचं प्रक्षेपण च बंद करण्यात आलं होतं. या मालिकेचे फक्त सहा भाग होते. ही कथा फाळणीच्या काळात लाहोरमध्ये घडलेली होती.

१९८८ च्या जानेवारी मध्ये याचे पहिले दोन भाग रदर्शनवर रिलीज केले गेले. आणि दुसऱ्याच दिवशी भाजपच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या मालिकेविरोधात मोर्चे, निदर्शने झाली.

आणि या मोर्चाचे नेते होते भाजपच्या युवा मोर्चाचे तरुण अध्यक्ष प्रमोद महाजन !

भाजप पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष असणारे प्रमोद महाजन यांनी हि मालिका बंद करूनच दाखवणार असा चंगच बांधला होता. त्यांनी त्यासाठी नाही -नाही ते प्रयत्न केले होते. पत्रकार परिषदा घेऊन  ‘तमस मालिका रद्द करा’ अशी मागणी लावून धरली.

त्यांनी दूरदर्शन ला मागणी केली कि, या मालिकेत काही प्रक्षोभक दृश्यं आहेत, ज्या दृश्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होईल. शांतता व सुव्यवस्था बिघडेल इत्यादी इत्यादी. त्यात एक असा प्रसंग दाखवला होता कि, एक हिंदू मुलगा एका मुस्लीम अत्तर विक्रेतेची हत्या करतो आणि म्हणतो कि, त्याला हि हत्या त्याच्या ‘गुरुजीं’नी करायला सांगितली होती.

पण त्यांच्या विरोधाचं खरं कारण असं होतं कि,

या मालिकेच्या पहिल्याच २ भागात असं दाखवलं होतं कि, भारताची फाळणी हिंदू समाजामुळे झाली आहे. परंतु या तर्काला निहलानी यांनी हे अर्धवट खोटं असल्याचं ठरवलं.  तरीही याचा विरोध म्हणून, पंजाबमध्ये तमस च्या विरोधात ‘तमस’च्या लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिमेची भरचौकात होळी केली.

प्रकरण न्यायालयात पोहचलं

पण न्यायालयाला सुट्टी असल्यामुळे न्यायाधीशांनी एका छोटेखानी थिएटरमध्ये न्या. लेंटिन आणि न्या. मनोहर यांनी सकाळपासून सायंकाळपर्यंत ‘तमस’ मालिकेचे सर्व भाग पहिले.

त्यानंतर न्या. लेंटिन यांनी जाहिरीत्या सांगितलं, “यात हिंसात्मक प्रसंग दाखवलेत मात्र दुर्दैवाने तो आपला इतिहास आहे आणि ते आपण लपवू शकत नाही. त्यामुळे या मालिकेला इतिहास म्हणूनच पहा. वास्तव स्वीकारा”.

त्यानंतर ‘तमस’चा तिसरा भागही दाखवला.

वाद मिटला नव्हताच. निहलानी यांना जिवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. या वादात शिवसेना देखील उतरली. भाजपने दूरदर्शनच्या केंद्राबाहेर मोर्चे काढले. पोलिसांना दूरदर्शन केंद्राबाहेर  हिंसक होत असलेल्या निदर्शकांवर लाठीमार केला. तिकडे हैदराबादला तर पोलिसांनी निदर्शकांवर गोळीबार केला.

तरीही ‘तमस’चा शेवटचा भाग १३ फेब्रुवारी १९८८ रोजी दाखवला गेलाच !

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.