मंदिरातला कचरा विकून गुजरातचा माणूस करोडपती बनलाय!

तुम्ही म्हणाल, असं कसं भिडू. कचरा विकून कोण करोडपती होतं व्हंय, ते पण मंदिरातला कचरा विकून.  आम्ही पण मंदिरात जातो की, देवासमोर भक्तीभावानं हात जोडतो, फुलांचा हार घालतो, नारळ फोडतो. अंबाबाईचं मंदिर असेल तर खन नारळांनी वटी पण भरतो. पण मंदिरात एवढा कुठं कचरा असतो. अन् असला तरी त्या कचऱ्यात करोडपती होण्यासारखं काय आहे.

तर भिडू मॅटर असाय,

गुजरातमध्ये बनासकांठा नावाचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात अंबाबाईचं प्रसिद्ध असं मंदिर आहे. या मंदिरात दरवर्षी लाखो- भाविकभक्त येत असतात. त्यामुळे या मंदिरातून वर्षाला कितीतरी टन कचरा बाहेर पडतो. त्या कचऱ्यात नारळाची साल, फुलं आणि ओटी भरायला घेऊन घेणारे सामान असतं, निर्माल्य असत, भाविकांनी टाकून दिलेलं समान, त्यांनी प्रसाद खाऊन टाकून दिलेली खरकटी, उदबत्तीची पाकीटं, प्लास्टिक कॅरीबॅग्ज

याच कचऱ्यातून गुजरातचे हितेंद्र रामी लाखो रूपये कमवतोय.

हितेंद्र रामी याचं मंदिराच्या बाहेर सध्या नंदनवन नावाचं दुकान आहे. या दुकानामधल्या सगळ्या वस्तू मंदिरातून निघालेल्या कचऱ्यापासून बनवलेल्या आहेत. हितेंद्र रामी हे याच भागातले. ते नेहमी या मंदिरात यायचे. तेव्हा त्यांना दिसायचं की,  इथं हजारो भक्त येतात नारळ फोडतात, देवाला वेग वेगळ्या फुलांचा हार चढवतात, देवीची ओटी भरतात. या सगळ्या वस्तू दुसऱ्या दिवशी कचऱ्यात फेकून दिल्या जातात.

या फेकून दिलेल्या कचऱ्यापासून आपण काही करू शकतो का, याचा ते विचार करायला लागले.

त्यांना याबाबत कल्पना सुचली. मंदिर प्रशासनाला याबाबत त्यांनी सांगितलं. आणि त्याच्याकडून मंदिरातून निघणारा कचरा घ्यायला सुरूवात केली.

या घेतलेल्या कचऱ्यापासून हितेंद्र सुरूवातीला छोट्या छोट्या वस्तू बनवायला शिकले. त्यांनी नारळाच्या काढलेल्या सालीपासून मुर्ती, दाराला बांधणारे तोरण, टोपली, चप्पल. महिलांच्या पर्स वस्तु बनवल्या. तर कचऱ्यातून मिळणाऱ्या फुलांपासून सुंगधी अगरबत्ती, साबण, जेल, आणि चेहऱ्यासाठी स्क्रिम बनवल्या.

हे विकण्यासाठी मंदिराच्या बाहेर एक दुकान टाकलं. आणि त्या दुकानाला नंदनवन असं नाव दिलं. हळु-हळु या वस्तुला मागणी वाढत गेली. ग्राहक पसंती द्यायला लागले. त्यामुळे सध्या आजूबाजूच्या भागातील 300 लोक या व्यवसायात जोडले गेलेले आहेत.

सध्या त्याच्या दुकानात 15 रूपयांपासून ते 5000 रूपयांपर्यंतची वस्तू आहे. ग्राहकांची या वस्तुला मोठी मागणी मिळतेय.

त्यामुळे या कचऱ्यांच्या वस्तूपासून हिंतेंद्र रामी यांना महिन्याकाठी 2 लाख रूपयांचा नफा मिळतोय. हा व्यवसाय करण्यासाठी त्यांनी अनेंकांना प्रेरीत केलंय. वेगवेगळ्या भागात जाऊन ते सध्या मार्गदर्शन करत आहेत.

मंदिराच्या कचऱ्यापासून व्यवसाय उभा राहू शकतो, हे हितेंद्र रामी यांनी जगाला दाखवून दिलंय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.