अशीही मंदिर आहेत जिथं ‘पुरूषांना प्रवेश नाही’, तुम्ही कधी आंदोलन करणार ?

देशात सध्या केरळमधील सबरीमाला मंदिरात राजस्व स्त्रियांच्या प्रवेशाचा मुद्दा पेटलेला आहे. सुप्रीम कोर्टाने मंदिरातील महिलांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा केलेला असतानाही स्वामी आयाप्पांचे भक्त मंदिरात स्त्रियांना प्रवेश करू देत नाहीयेत. त्यामुळे वातावरण तापलं आहे.

भारतात अशी अनेक मंदीरं आहेत जिथे वेगवेगळ्या कारणाने महिलांना प्रवेश नाकारला जातो. पण तुम्हाला माहितीतेय का की भारतात अशी मंदिरं देखील आहेत ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नाही!

हो, खरंच ! भारतात अशी सहा मंदिरं आहेत  ज्या ठिकाणी पुरुषांना प्रवेश नाही. चला तर मग जाणून घेऊयात ही मंदिरं नेमकी कोणती..? ती आहेत तरी कुठे..?

१. अट्टूकल मंदिर 

ज्या केरळातील सबरीमाला मंदिरावरून सध्या वातावरण तापलेलं आहे त्याच केरळातील अट्टूकल मंदिर हे मंदिर. हे त्या मंदिरांपैकी एक आहे जिथे स्त्रियांचं प्रभुत्व आहे. या मंदिरात साजरा होणारा ‘पोंगला’ महोत्सव देखील जगप्रसिद्ध आहे. या महोत्सवात लाखो स्त्रिया सहभागी होतात. ह्या महोत्सवाच्या नावावर ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ देखील आहे.

या महोत्सवाला धार्मिक कारणांसाठीचं स्त्रियांच सर्वात मोठं एकत्रीकरण म्हटलं जातं. १० दिवस चालणारा ‘पोंगला महोत्सव’ साधारणतः फेब्रुवारी ते मार्च महिन्यांच्या दरम्यान भरविण्यात येतो. या महोत्सवावेळी स्त्रिया देवीला बांगड्या अर्पण करतात.

२. चक्कुलथूकावू मंदिर

हे दुसरं मंदिर देखील केरळातलंच.  हे मंदिर देवी भगवतीचं निवासस्थान मानलं जातं. या ठिकाणी दरवर्षी नारीपूजन करण्यात येतं. डिसेंबरच्या पहिल्या शुक्रवारी ‘धनु’ नावाचा पुरुष पुजारी दहा दिवस उपवास करणाऱ्या स्त्रियांचे चरण धुतो.

३. संतोषी माता मंदिर

संतोषी मातेच्या मंदिरात पुरुषांना प्रवेश असतो, पण संतोषी मातेचं व्रत हे फक्त महिलाच करत असल्याने  व्रताच्या काळात पुरुषांना या मंदिरांमध्ये प्रवेश नसतो.

४. ब्रम्हदेवाचं  मंदिर 

राजस्थानातील पुष्कर येथे ब्रम्हदेवाचं एकमेव मंदिर असल्याची कल्पना आपल्याला असेलच. पण तुम्हाला माहितेय का की चौदाव्या शतकातील या मंदिरात फक्त अविवाहित  पुरुषांनाच  प्रवेश दिला जातो. एकदा का तुमचं लग्न झालं की तुमच्यासाठी या मंदिराचे दरवाजे बंद.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी या मंदिरात उत्सव साजरा केला जातो. तेव्हा भिडू लोक्स तुम्ही जर ब्रम्हदेवाचे भक्त असाल आणि तुम्हालाही या उत्सवात सहभागी व्हायचं असेल तर एक तर लग्नाआधी हा कार्यक्रम उरकून घ्या, नाहीतर मग लग्न करण्यापूर्वी थोडा विचार करा.

५. कन्याकुमारी  मंदिर  

कन्याकुमारी येथील भगवती माता मंदिरात देखील आजही  पुरुषांच्या प्रवेशावर  बंदी आहे. कुमारिका असताना भगवान शंकराने आपल्याशी लग्न करावं यासाठी पार्वतीने तीन समुद्राच्या मधोमध या जागेवर तपश्चर्या केली होती, अशी या मंदिराविषयीची आख्यायिका प्रसिद्ध आहे. या मंदिराचा कारभार स्त्रियाच बघतात.

६. मुझफ्फरपूर येथील माता मंदिर 

बिहारमधील मुज्जफरपूर येथे देखील एक मातेचं मंदिर आहे जिथे फक्त महिला भाविकांना एका विशिष्ट कालावधीतच प्रवेश असतो. विशेष म्हणजे या कालावधीत पुरुष पुजाऱ्यांना देखील मंदिरात प्रवेश नसतो.

तर अशी ही देशातली सहा मंदिरं जिथे फक्त महिलांनाच प्रवेश आहे आणि पुरुषांच्या प्रवेशावर संपूर्णतः  किंवा अंशतः बंदी आहे. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहचवण्याचं काम तर आम्ही केलंय, आता हा सर्वस्वी पुरुषांचा निर्णय असेल  की त्यांना या मंदिरात प्रवेश हवा आहे का नाही आणि हवा असेल तर त्यासाठी कायदेशीर लढाई लढायला ते तयार आहेत का..?

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.