तो टेरर अटॅक खरं तर सचिन, धोनी आणि द्रविडला किडनॅप करण्यासाठी आखण्यात आला होता.

गोष्ट आहे २००९ सालची.

लाहोरमध्ये पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका कसोटी सामना सुरु होता. समरावीराने मारलेली डबल सेंच्युरी आणि दिलशान संगकाराने ठोकलेली सेंच्युरी यामुळे लंकेने ६०६ धावांचा डोंगर उभा केलेला होता. याला उत्तर देताना पाकिस्तानने एक विकेट गमावून ११० धावा बनवल्या होत्या.

३ मार्च २००९. मॅचचा तिसरा दिवस.

नेहमीप्रमाणे सकाळी ८ वाजता लंकेच्या खेळाडूंना  घेऊन बस गद्दाफी स्टेडियमच्या दिशेने निघाली. काही अंतर गेली असेल नसेल तेव्हढ्यात लिबर्टी चौकात फटाके उडवल्या प्रमाणे आवाज आले. ड्रायव्हर खलील याला वाटलं खेळाडूंचं उत्साही प्रेक्षक स्वागत म्हणून फटाके उडवत असतील. त्याने गाडी तशीच पुढे आणली.

पण पुढच्याच सेकंदाला एक कुर्ता पायजमा घातलेला दाढीधारी  माणूस हातात एके४७ घेऊन बसच्या थेट समोर आला. त्याने जोरदार फायरिंग सुरु केली.

खलीलच्या लक्षात आले आपल्यावर अतिरेकी हल्ला झाला आहे.  काळ बनून १२ अतिरेकी आले होते. त्यांच्या जवळ हॅन्ड ग्रेनेड पासून ते रॉकेट लॉन्चर पर्यंत सगळं काही होतं.

ड्रायव्हरला कुठून सुबुद्धी सुचली ठाऊक नाही पण त्याने कुठल्याही परिस्थितीत गाडीचा स्पीड कमी केला नाही. गोळ्यांचा वर्षाव सुरूच होता पण खलीलने १२०च्या स्पीडने बस तिथून काढली ते थेट हॅन्डग्रेनेडवरून गाडी घालत तो थेट स्टेडियम मध्ये जाऊन घुसला.

त्यांच्या पाठोपाठ मॅचचे रेफ्री, अंपायर आणि इतर मॅनेजमेंटची देखील बस येत होती. खेळाडू आपल्या हातून सुटले या रागात  अतिरेक्यांनी त्यांच्यावर जोरदारच हल्ला चढवला. एव्हाना पोलिसांनी प्रत्युत्तर देण्यास सुरवात केली होती.

जयवर्धने, कुमार संघकारा पासून ते अनेक खेळाडू या अटॅकमध्ये जखमी झाले होते. स्टेडियममध्ये पोहचल्या पोहचल्या सगळ्या खेळाडूंनी खलीलला मिठी मारली.

पण संकट अजून टळलं नव्हतं.

कशीबशी दुसरी बस देखील गद्दाफी स्टेडियममध्ये आली मात्र अम्पायर्सच्या गाडीचे प्रचंड नुकसान झाले होते. फोर्थ अंपायर एहसान रझा यांच्या पोटात आणि खांद्याला गोळी लागली होती. सर्वचजण जखमी झाले होते. या बसचा ड्रायव्हर मात्र मारला गेला होता.

सुप्रसिद्ध अंपायर सायमन टफेल या अनुभवाबद्दल सांगतात की,

माझ्या काही अंधश्रद्धेमुळे मी नेहमी एकाच सीटवर बसायचो पण त्या दिवशी सिनियर असलेल्या रझा यांना जागा द्यायची म्हणून मी वेगळीकडे बसलो. ती अंधश्रद्धा मोडली नसती तर आज मी जिवंत नसतो.

थोडक्यात त्यांचा जीव वाचला. क्रिकेटच्या ग्राउंडवर उतरलेले पाकिस्तानी लष्कराचे हेलिकॉप्टर आणि त्यातून श्रीलंकेच्या जखमी खेळाडूंची सुरक्षित जागी तातडीनेे रवानगी करण्यात आली.

मॅच बघायला म्हणून टीव्ही लावलेल्या रसिकांना वेगळंच दृश्य पाहायला मिळत होत. संपूर्ण जग हे बघून हादरून गेलं.

उलटसुलट प्रतिक्रिया सुरू झाल्या. पाकिस्तानच्या मीडियाने हा भारतीय रॉचा हल्ला आहे असा कांगावा सुरू केला मग श्रीलंकेच्या लिट्टेचा हात असू शकतो अशी चर्चा केली. अखेर पाकिस्तानच्याच लष्कर ए जहाँगवीने हा हल्ला करवून आणला होता व त्याला अल कायदाची फूस होती हे स्पष्ट झाले.

पाकिस्तानची ढिसाळ सिक्युरिटी व्यवस्था, तेथील दहशतवादाचा खरा चेहरा जगाच्या समोर आला.पाकिस्तानी पोलिसांनी आंतरराष्ट्रीय मॅचमधल्या खेळाडूंच्या संरक्षणाचे किमान खबरदारी देखील घेतली नव्हती.

सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे या टेरर अटॅकचे खरे टार्गेट भारतीय टीमचे खेळाडू होते.

मुळात हा दौरा श्रीलंकेचा नव्हताच, त्यांच्या आधी भारतीय टीम पाकिस्तानला याच तारखेला येणार होती. गेली अनेक वर्षे पाकिस्तानमध्ये परदेशी टीमचा दौरा झाला नव्हता आणि भारताला पुळका येऊन आपण येणारच होतो.

इतक्यात २६/११ च्या मुंबई अटॅकची घटना घडली. पाक अतिरेक्यांनी शेकडो निरपराध भारतीयांना मारलं आणि कधी नव्हे ते मनमोहनसिंग सरकारने पाकिस्तानशी राजनैतिक संबंध तोडून टाकले.

यातून एक गोष्ट चांगली झाली की भारतीय क्रिकेट टीमचा पाक दौरा रद्द झाला.

पाकिस्तानमधल्या अतिरेक्यांनी अनेक महिन्याच्या आधीपासून तयारी केली होती. त्यांना भारताचा कप्तान धोनी, सचिन, द्रविड यांना लक्ष्य करायचं होतं.

या खेळाडूंची फक्त भारतातच नाही तर जगभरात असलेली अफाट प्रसिद्धि पाहता त्यांना किडनॅप करून आपल्या हव्या त्या मागण्या मान्य करून घेणं त्यांना अवघड नव्हतं. सुदैवाने तसं काही घडलं नाही.

भारताच्या ऐवजी दुसरी टीम यावी म्हणून पाकिस्तानी क्रिकेट बोर्डने जगभरात अनेकांचे पाय धरले.

पण कोणतीही टीम तयार झाली नाही. फक्त पैशाच आमिष मिळाल्यावर श्रीलंकेच्या क्रिकेट बोर्डचा अध्यक्ष अर्जुन रनतुंगा तयार झाला. ही त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक ठरली आणि पुढे हा सगळा इतिहास घडला.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.