पंतप्रधान, लष्करप्रमुख व शेवटी पंजाबचे मुख्यमंत्री एवढ्या साऱ्यांना खलिस्तान चळवळीने खाऊन टाकलं.
ऐंशीच्या दशकात गव्हाच्या शेतीने संपन्न असलेला पंजाब पेटला होता. विषय होता खलिस्तान चळवळ. पाकिस्तानने लावलेल्या फुसामुळे पंजाबमधले शीख ‘खलिस्तान’ नावाचा वेगळा देश मागत होते. या आंदोलनामागे होता शीख धर्मगुरु जर्नेलसिंग भिंद्रणवले. एकेकाळी पंजाबमध्ये अकाली दलाच वाढत महत्व कमी करण्यासाठी इंदिरा गांधीनी मोठा केलेला हा माणूस अतिरेकी कारवाया करून त्यांच्याच डोक्यावर मिऱ्या वाटत होता.
पाकिस्तानकडून मिळालेलं प्रचंड शस्त्रास्त्र अमृतसरच्या सुवर्णमंदिरात गोळा करण्यात आलं होतं. भिंद्र्णवाले आणि त्याचे साथीदार अतिरेकी या पवित्र सुवर्ण मंदिरात लपून बसले होते. शेवटी इंदिरा गांधीनी तिथे लष्करी कारवाई करण्याचा अवघड पण गरजेचा निर्णय घेतला. भिंद्र्णवालेसकट सगळ्या अतिरेक्यांना ऑपरेशन ब्ल्यू स्टार अंतर्गत कंठस्नान घालण्यात आलं.
पण याघटनेमुळे पंजाबमधील तरुणांच्यातील असंतोष वाढून खलिस्तानवादी चळवळीला आणखी बळ मिळालं. भिंद्र्णवालेच्या मृत्यूचा बदला म्हणून इंदिरा गांधींची त्यांच्या दोन शीख अंगरक्षकांनी गोळ्या झाडून हत्या केली. खलिस्तान चळवळीने वनव्याचं रूप घेतलं होत. पंजाब, दिल्ली येथे शीखविरोधी दंगली पेटल्या. कॉंग्रेस कार्यकर्ते यात सामील होते. दुष्टचक्र सुरु झाले होते खलिस्तानवादी प्रकरण जास्तचं चिघळल होतं.
शीख तरुण पेटून उठले. त्यांच्यासाठी जर्णेलसिंग व त्याचे साथीदार धर्मासाठी शहीद झालेले नेते. ज्यांनी ज्यांनी शीख दंगलीत भाग घेतला होता, ज्यांचा ऑपरेशन ब्ल्यू स्टार मध्ये सहभाग होता त्यांना संपवण्याचा विडा उचलला. यातूनच भारताचे माजी लष्करप्रमुख जर्नल अरुणकुमार वैद्य यांची पुण्यात हत्या करण्यात आली. मुंबईमध्ये लेफ्टनंट जनरल कुलदीप ब्रार यांच्यावरही प्राणघातक हल्ले झाले. विशेषतः कॉंग्रेसवर शिख अतिरेक्यांचा राग होता.
या अतिरेक्यांनी पंजाबची घडी विस्कटली. तिथे बराच काळ राष्ट्रपती राजवट होती. काही काळापुरते सुरजित सिंग बर्नाला मुख्यमंत्री झाले पण स्थितीत सुधारणा झाली नाही. परत राष्ट्रपती राजवट.
यानंतर पंजाबमध्ये निवडणुका झाल्या १९९२ला. त्यात आश्चर्यकारकरित्या कॉंग्रेसने विजय मिळवला. शीख समाजाचे बियंतसिंग मुख्यमंत्री बनले. या बियंतसिंग यांनी तत्कालीन पोलीस महासंचालक केपीएस गिल(हे सुद्धा शीख होते) यांना घेऊन पंजाबमधील दहशतवाद समूळ खोदुन काढला. जे काही थोडेफार अतिरेकी शिल्लक राहिले होते त्यांच्या हिटलिस्टवर ही दोन नवे होती.
३० ऑगस्ट १९९५ ची पहाट. गाव मोहाली. एका हॉटेलमध्ये विशीतले तीन तरुण थांबलेले होते. त्यांनी हॉटेलच्या आपल्या रूमच्या दारावर एक पोस्टर लावलेलं होता. त्यावर लिहिलेलं होतं,
Bachelor’s cave: enter at your own risk.
आत थांबलेली मुलं पुढच्या काही तासात पंजाबच्या इतिहासातील सर्वात क्रूर दहशतवादी कट करणार आहेत याची तिथल्या कुणाला कल्पनाही नव्हती. त्या तिघांपैकी दोघांनी एकाला धरलं आणि त्याच्या पँटच्या खिशातील काल्पनिक बटन दाबण्याचा प्रयत्न करू लागले आणि असे करत असतानाच जोरजोरात ओरडू लागले, ‘मी मानवी बॉम्ब आहे, असेल हिंमत तर अडवून दाखवा.’ असे त्यांनी तीनदा केला. बॉम्बस्फोटाची रंगीत तालीम चालली होती. त्यातला जो तरुण मानवी बॉम्ब बनणार होता तो म्हणाला,
“आज मी जाटांना अभिमान वाटेल असे करणार आहे. ” आणि थोड्याच ते सगळे रुबाबात दाढीवरून हात फिरवत, गॉगल घालून चंडीगडकडे रवाना झाले.
हा कट होता पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री बियंत सिंग यांच्या हत्येचा.
३१ ऑगस्ट दिवस उजाडला. दुपारची वेळ होती. मानवी बॉम्ब बनणाऱ्या तरुणाने पोलिसांचा पोशाख घातला आणि कमरेभोवतीच्या बेल्टमध्ये तब्बल १.५ किलोचे स्फोटक ठेवले. आणि दिल्लीची पासिंग असलेल्या कोऱ्या चकचकीत अॅम्बेसेडोर मधून आपल्या मित्रासोबत पंजाब सिविल सचिवालयाच्या दिशेने निघाला. सचिवालयाजवळ पोहचल्यावर गाडी आत न नेता VIP गेट पासून काही अंतरावर पार्क केली जिथून आतील दृश्य स्पष्ट दिसत होतं.
तेवढ्यात त्याचा मित्र तिथून निघून गेला तेव्हा त्याने एका कागदाच्या तुकड्यावर गुरमुखी भाषेत दोन ओळी लिहिल्या,
“जो शहिदांचे गीत गाणार नाही त्याला जगण्याचा कोणताही अधिकार नाही”
थोड्याच वेळात VIP गेट मधून तीन अॅम्बेसेडोर बाहेर आल्या तसा तो त्या दिशेने चालत निघाला. काही मिनिटातच अंगरक्षक आणि पर्सनल असिस्टंटनी घेरलेले मुख्यमंत्री बियंत सिंग आपल्या दुसऱ्या मजल्यावरील ऑफिस मधून खाली येत लॉबीच्या दिशेने निघाले. सोबत काही NSG चे जवान ही होते. बियंत सिंग कारमध्ये बसणार तोच मानवी बॉम्ब बनून आलेला तरुण त्याच्या जवळ आणि स्फोट केला.
तो स्फोट इतका शक्तिशाली होता की, तिथं उभ्या जवळपास १७ जणांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या होत्या. सगळे देह छिन्नविछिन्न अवस्थेत पडले होते. हा आत्मघाती हल्ला करणारा दिलवार सिंग बाब्बर पंजाब पोलीस मध्ये होता नंतर तो बाब्बर खालसा इंटरनॅशनल मध्ये सहभागी होऊन मानवी बॉम्बर बनला होता.
खलिस्तानवादी चळवळीने भारताचे पंतप्रधान, लष्करप्रमुख, पंजाबचे मुख्यमंत्री अशा अनेक अतिमहत्वाच्या व्यक्तींचा घास घेतला होता. यानंतर मात्र पंजाबच्या जनतेतूनही या चळवळीबद्दल सहानुभूती नष्ट होत गेली आणि तिथला दहशतवाद शांत झाला.
हे ही वाच भिडू.
- पुण्यात येऊन जनरल अरुण वैद्य यांची हत्या करणारे क्रूर अतिरेकी जिंदा आणि सुखा
- महाराष्ट्राचा पहिला मुस्लीम मुख्यमंत्री करण्यासाठी, इंदिरा गांधीनी असाही एक डाव खेळला.
- १९८४च्या दंगलीत अख्खा देश जळत होता पण बाळासाहेबांच्यामुळे मुंबई शांत होती.
Unity + Technology =progress