पप्पा दिलदार होते म्हणून ओसामा बिन लादेन अब्जाधीश झाला…

ओसामा बिन लादेन, नुसतं नाव ऐकलं की आपल्या डोळ्यांसमोर टेरर येतो. त्याचं पूर्व आयुष्य, त्यानं वर्ल्ड ट्रेड सेंटरवर केलेला हल्ला आणि अमेरिकेने घरात घुसून केलेला हल्ला यातलं काहीच आता रहस्य राहिलेलं नाही. त्याच्याबद्दल मोठ्या प्रमाणात लिहिलं जातं आणि बोललंही जातं. लादेनचा एन्डगेम तसा लय खुंखार झाला. पण मरताना एक गोष्ट मात्र होती, की लादेनकडं लय पैसा होता. लय म्हणजे खरंच लय.

आता हा पैसा कुठून आला? दहशतवादी हल्ल्यांमधून थोडाफार आला. लादेननी कुठं काय गुंतवणूक असेल त्यातून थोडेफार आला. पण लादेन दहशतवादाचा किंग बनला तो त्याच्या पप्पांच्या जीवावर. लादेनचे फादर लय पैसेवाले होते. पण नुसता पैसा असून चालत नाय, त्यांच्याकडे पॉवरही होती. आधी पैसा कसा मिळाला हे सांगतो आणि त्यानंतर पॉवरबद्दल बोलू…

झिरो ते हिरो…

लादेन नाही, लादेनचे पप्पा. लादेनच्या पप्पांचं नाव मुहम्मद बिन लादेन. त्यांची स्टोरी एकदम भारीये. स्टेटसला टाकली तर शंभर लाईक नक्की. तर झालं असं, की मोहम्मद बिन लादेन हे मूळचे येमेनचे. आता येमेनमध्ये काय आरामातलं आयुष्य नव्हतं, ना रोजगाराच्या संधी होत्या त्यामुळं ते नोकरीच्या शोधात सौदी अरेबियाला आले. तिकडं एक मजूर म्हणून काम करण्यापासून त्यांचा प्रवास सुरू झाला. पण त्यांनी थेट स्वतःची कन्स्ट्रक्शन कंपनी सुरू करण्यापर्यंत मजल मारली. सौदीच्या राजानं त्यांना मदतही केली. साहजिकच त्यांच्याकडे पैसा येऊ लागला… आता गोष्ट पॉवरची.

जेव्हा मोहम्मद बिन लादेन आपली कंपनी उभी करत होते, त्याचवेळी सौदी अरेबियाच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत होती. सौदी राजपुत्रच राजा असला, तरी कारभाराची सूत्र होती, राजे फैझल यांच्याकडे. फैझल यांच्यापुढं सगळ्यात मोठं आव्हान होतं, ते म्हणजे सौदी अरेबियाची आर्थिक घडी बसवणं. ऐन रमजानच्या काळात सौदीतल्या कर्मचाऱ्यांना पगार आणि बोनस देण्यासाठी तिजोरीत पैसे नव्हते. त्यांनी घरातले दागिने मोडले, आपल्या ठेवी मोडल्या पण लोकांचे पगार दिले. वातावरण टेन्शनचं होतं आणि या टेन्शनच्या वेळी सौदी राजघराण्याच्या पाठीशी एकच माणूस उभा राहिला…

मोहम्मद बिन लादेन.

आपल्याला केलेली मदत लादेन विसरले नाहीत आणि त्यांनी त्याची परतफेड अगदी योग्यवेळी केली. राजे फैझल ही संकटकाळची मदत विसरले नाहीत, त्यांनी शाही आदेश काढला, ‘यापुढं सौदीमधल्या सगळ्या मशिदींचं बांधकाम लादेन यांच्या कंपनीकडूनच केलं जाईल.’ साहजिकच आता पैशासोबत पॉवरही वाढली.

१९६७ मध्ये मोहम्मद बिन लादेन यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. ओसामा हा त्यांच्या हमिदा या दहाव्या पत्नीपासून झालेला मुलगा. ज्याचा नंबर मोहम्मद यांच्या ५४ मुलांमध्ये सतरावा लागतो.

ओसामाचं बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये शिक्षण झालेलं, पण भावानं मार्ग निवडला दहशतवादाचा. अल-कायदाच्या माध्यमातून तो कुख्यात बनला, कित्येक निरपराध्यांचे जीव घेतले, पण मरतानाही त्याच्या नावावर जवळपास ३०० मिलियन डॉलर्सची संपत्ती होती. पुढं ओसामाचा एन्डगेम झाला आणि सौदीमध्ये सत्तांतरही झालं. प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी बिन लादेन यांच्या कन्स्ट्रक्शन कंपनीवर चौकशा लावल्या, भ्रष्टाचाराचे प्रकार उघडकीस आले  आणि त्यांचा डाऊनफॉल सुरू झाला…

पण जे काही ऐश्वर्य लादेन आणि त्याच्या भावडांनी भोगलं, त्याच्या मागचं कारण त्यांचे दर्यादिल पप्पा होते हे नक्की.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.