महाराष्ट्रातून गुजरातला गेलेली फॉक्सकॅान कंपनी सासूच्या मदतीने उभी राहिलीये

फॉक्सकॉन, गेले दोन दिवस राज्यात या कंपनीवरून मोठा वाद रंगला आहे. वेदांच्या माध्यमातून फॉक्सकॉन कंपनी १ लाख ५८ हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. अगोदर फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प पुण्याजवळील तळेगाव येथे होणार होते. मात्र आता हा प्रकल्प गुजरात येथे नेण्यात आला आहे. यामुळे महाराष्ट्र – गुजरात वाद पेटण्याची चिन्हे आहेत. हे झालं गुतंवणुकीचं.   

या सगळ्या वादाची केंद्रबिंदू फॉक्सकॉन कंपनी ठरली आहे. फॉक्सकॉनचा इतिहासही तेवढाच भारी आहे. रबराच्या फॅक्टरीत काम करणाऱ्या एका तरुणाने सासूकडून उसने पैसे घेऊन ही कंपनी सुरु केली. पुढे जगातील सर्वाधिक रोजगार देणारी खासगी कंपनी म्हणून फॉक्सकॉन ओळखली जाते. फॉक्सकॉनची ओळख म्हणजे आयफोन बनवणारी कंपनी.

फॉक्सकॉनची स्थापना ही टेरी गोउ यांनी १९७४ मध्ये केली. 

टेरी गोउ यांचे वडील सुद्धा तेवढेच जिगरबाज होते. त्यांनी चीन मध्ये येऊ घातलेल्या कम्युनिष्ट सरकार विरोधात लढले होते. १९४९ साली चीन मध्ये गृह युद्ध झाले. त्यात कम्युनिष्ट सरकार विरोधातील युद्धात त्यांनी भाग घेतला होता. त्यामुळे त्यांना चीन सोडून तैवानला जावं लागलं होतं. 

गोउ यांच्या वडिलांना तीन मुलं होती. त्यातील सगळ्यात लहान टेरी गोउ होते. १८ ऑक्टोबर १९५० मध्ये टेरी गोउ यांचा जन्म तैवान मधील ताइपे येथे झाला. चीन सोडल्याने गोउ यांच्या कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे टेरी गोउ यांना अमेरिकेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या मिशनरी मध्ये राहावं लागलं होत. त्यांचं लहानपण हा मिशनरी मध्येच गेलं. ११ वर्ष त्यांना एकाच रूम मध्ये राहावं लागलं. 

त्यानंतर टेरी हे रबराच्या कंपनीत कामाला जाऊ लागले. त्यानंतर एका प्लस्टिकच्या कंपनीत ते कामाला लागले. वयाच्या २३ वर्षी त्यांनी स्वतःची कंपनी सुरु करावी असे त्यांच्या डोक्यात कल्पना आली. त्यावेळी तैवान मध्ये रबर, प्लास्टिक पासून तयार करण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होऊ लागल्या होत्या. 

१९७४ मध्ये टेरी यांनी आपल्या सासू पासून साडे सात हजार उसने घेतले आणि कंपनी स्थापन केली.

ते पूर्वी ज्या कंपनीत काम करत होते तिथे टीव्हीसाठी लागणारे चॅनेल नॉब बनवले जात होते.  तीच मशीन टेरी यांनी विकत घेत १० कामगारांना सोबत घेऊन फॉक्सकॉन कंपनीची सुरुवात केली. १९८० मध्ये टेरी यांना अटारी या कंपनीने टिव्हीसाठी लागणारे जॉयस्टिकची ऑर्डर दिली. 

तेव्हा तैवान मधून इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात निर्यात होत होत्या. कमी पैशात आणि चांगल्या वस्तू मिळत असल्याने अमेरिका, युरोप मधून या वस्तुंना मोठी मागणी होती. त्यानंतर टेरी यांनी अमेरिकेत जाण्याचा निर्णय घेतला. १९८० मध्ये टेरी ११ महिन्यासाठी अमेरिकेत गेले. 

ज्या प्रकारे आपल्याकडे सेल्समन प्रत्येक घरी जाऊन वस्तू बद्दल माहिती सांगतो आणि विकत घ्यायला लावतो तशाच प्रकारे टेरी यांनी अमेरिकेतील कंपन्यांना भेटी द्यायला सुरुवात केली. अनेक कंपन्यातील सुरक्षा रक्षक त्यांना अडवत. टेरी हे काहीही करून कंपनीत जात आणि तिथल्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटत. 

आयबीएम कंपनीचे काम कसे मिळवायचे हा टेरी यांच्या समोरील सर्वात मोठा प्रश्न होता. 

एक आयबीएम कंपनीचे काम मिळाले तर किती मोठं काम होईल हे टेरी यांना पक्क माहित होत. त्यामुळे टेरी यांनी आयबीएम कंपनी जवळचे हॉटेल निवडले. पहिले दोन दिवस त्यांना कंपनीतील अधिकाऱ्यांना भेटता आले नाही. तिसऱ्या दिवशी हार न मानता टेरी हे आयबीएमच्या ऑफिस मध्ये गेले आणि आनंदाने बाहेर पडले. त्यांना माहित होते आयबीएम सारख्या कंपनीकडून जर काम मिळाले तर मागे वळून पाहण्याची कधीच गरज पडणार नाही. झालेही तसेच टेरी यांना आयबीएम कंपनीकडून काम मिळाले होते. 

टेरी यांना माहित होते अमेरिकन कंपन्यांनी काम दिल तर ते परवडणारे असेल. तर दुसरीकडे टेरी यांना चीनची भूमी खुणवू लागली होती. तैवान मधील इतर कंपन्या चीन मध्ये जायला तयार नव्हते. इकडे चीन च्या सरकारने तैवान मधून येणाऱ्या कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करणार नाही अशी हमी सुद्धा दिली होती. 

१९८८ मध्ये टेरी यांनी चीन मधील शेन्झेनमध्ये प्रकल्प उभा केला. 

चीन मधील सगळ्यात मोठी फॅक्टरी असल्याची सांगितलं जात. या फॅक्टरीत त्यांनी इलेक्ट्रॉनिक वस्तूसाठी लागणाऱ्या पार्ट बनवायला सुरुवात केली होती. त्यांनी फॅक्टरी कॅम्पस मध्ये कन्व्हर्ट केले. तिथेच कामगारांना राहण्याची, जेवण्याची, हॉस्पिटलची सोय करण्यात आली. 

टेरी यांच्या फॅक्टरीत डेस्कस्टॉपचे बॉडी १९९६ साली बनवायला सुरुवात केली. ही गोष्ट फॉक्सकॉनला जगभरात घेऊन गेली. यानंतर एचपी, ॲप्पल सारख्या मोठ्या कंपन्यांचे काम मिळायाला सुरुवात. यानंतर ब्लॅकबेरी, इंटेल, मोटोरोला सारख्या इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना सुट्टे पार्ट पुरवत होती. 

लॅपटॉप आणि मोबाईल बनवणाऱ्या जगातील सगळ्या मोठ्या कंपन्या मागे फॉक्सकॉन आहे. मात्र टेरी यांनी कधी प्रसिद्धीच्या मागे लागले आपले काम करत राहिले.  टेरी यांच्या कार्यकाळातच फॉक्सकॉनने नोकिया कंपनी कंपनी विकत घेतली. 

जून २०१९ मध्ये टेरी गोउ यांनी फॉक्सकॉनचा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. याच वर्षी टेरी यांनी राजकारणात उडी घेतली होती. अध्यक्ष पदाची निवडणूक लढवणार असल्याचे घोषित केले होते. मात्र टेरी यांनी अचानकपणे या निवडणुकीतून माघार घेतली. 

सासूकडून उसने पैसे घेऊन सुरु फॉक्सकॉन कंपनीचे मालक टेरी गोउ यांनी कंपनी सुरु केली होती. आता त्यांची एकूण संपत्ती ५१ हजार कोटींची असल्याचे सांगितलं जातं.

हे ही वाच भिडू 

 

     

 

      

Leave A Reply

Your email address will not be published.