गद्दार कोण..? शिवसेनेत एखाद्याचा “श्रीधर खोपकर” होण्याची दहशत कशी निर्माण झाली होती..?

गद्दार कोण… राज्यसभेच्या जाळधूर काढणाऱ्या ड्राम्यानंतर रात्रीच्या साडेतीन चार वाजता निकाल आला. यात भाजपचा तिसरा उमेदवार विजयी झाला. धनंजय महाडिक विजयी झाली. निवडणूकीपुर्वी संजय राऊत तिसऱ्या जागेवर आमचाच उमेदवार निवडूण येणार याबद्दल ठाम होते.
पण निकाल लागला तेव्हा एकदमसे वक्त बदल गऐ.. हालात बदल गऐं..
त्यानंतर राऊतांनी त्यांच्या स्टाईलमध्ये माध्यमांना सांगितलं की आमचे सहा ते सात मतं फुटली. यात आमची म्हणजे पक्षाची नसून महाविकास आघाडीला पाठींबा देणाऱ्या अपक्ष आमदारांची मते फुटली अस राऊत म्हणाले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले,
ज्या कुणी शब्द देऊन दगाबाजी केली त्यांची यादी आमच्याकडे आहे. बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांची मते आम्हाला मिळाली नाहीत. लोह्याचे आमदार शामसुंदर शिंदे, स्वाभीमानीचे आमदार देवेंद्र भुयार आणि करमाळ्याचे आमदार संजय मामा शिंदे यांची मते देखील आम्हाला मिळाली नाही..
वास्तविक पहिल्या फेरीतली आकडेवारी पाहिली तर महाविकास आघाडीला समर्थन देणाऱ्या 9 ते 10 अपक्ष व इतर छोट्या पक्षांची मते फुटल्याचा अंदाज बांधता येतो. संजय राऊत यांनी सहा जणांची नावे घेतली आहेत. आत्ता यापैकी देवेंद्र भुयार आणि संजय मामा शिंदे यांनी थेट राउतांवर आक्षेप घेत स्पष्ट शब्दात नकार दिला आहे..
पण याच दरम्यान सेनेचे गद्दार या शब्दावरून पहिल्यांदा नाव निघतं ते श्रीधर खोपकर प्रकरणाचं. वास्तविक आत्ता ती दहशत राहिली नाही पण हे अरुण खोपकर प्रकरण काय होतं ते पाहणं देखील तितकच गरजेच आहे..
काय होतं श्रीधर खोपकर प्रकरण..?
काही दिवसांपूर्वी धर्मवीर सिनेमा रिलीज झाला. या सिनेमात धर्मवीर आनंद दिघे यांच्या तोंडी गद्दारांना माफी नाही हा डॉयलॉग देण्यात आला होता. आनंद दिघे, ठाणे महानगरपालिका आणि अरुण खोपकर अशी घटना घडली होती ते साल होतं,
1989 चं..
1989 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणूका झाल्या होत्या. या निवडणूकीत शिवसेनेचे 30 नगरसेवक निवडून आले होते. दूसरीकडे कॉंग्रेसने स्थानिक पातळीवर असणाऱ्या आगरी सेनेसोबत युती केली होती. बहुमत शिवसेनेकडेच होते त्यामुळे शिवसेनेचा महापौर ठाणे महानगरपालिकेत येणार अस स्पष्ट चित्र होतं..
बाळासाहेब ठाकरेंनी या महापौर पदासाठी होणाऱ्या निवडणूकीची जबाबदारी सतीश प्रधान आणि आनंद दिघेंकडे दिली होती. प्रकाश परांजपे हे शिवसेनेकडून महापौर पदासाठी उमेदवार होते.
मात्र महापौर पदासाठी निवडणूक झाली आणि अवघ्या एका मताने सेनेचं महापौर पद हुकलं. सेनेच्या एका नगरसेवकाने आपलं मत विरोधात टाकलं होतं. उपमहापौर पदासाठी देखील शिवसेनेला आपला उमेदवार विजयी करता आला नाही.
हातात असलेली सत्ता गेली. गुप्त मतदान पद्धती असल्याने नेमकं कोण फुटलं हे कळायला मार्ग नव्हता.
इकडे पुरेसे नगरसेवक असूनही शिवसेनेचा महापौर न झाल्याने बाळासाहेब ठाकरे प्रचंड चिडले. त्यांनी आनंद दिघेंना बोलावून विचारणा केली..
गद्दार कोण..?
यावर आनंद दिघेंच उत्तर होतं गद्दारांना माफी नाही..
दोन दिवसात जाहीररित्या आनंद दिघेंनी हे उद्गार काढले. आनंद दिघेंचा हाच डॉयलॉग घेवून ठाण्यात ठिकठिकाणी पोस्टर लावण्यात आले. गद्दाराला माफी नाही..
पण गद्दार कोण..? नेमकं कोणाचं मत फुटलं..? याचा अंदाज कोणालाच बांधता येत नव्हता. मात्र ठाणेकरांना यांचा संबंध दिसून आला तो काहीच दिवसात शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांच्या हत्येमुळे..
अत्यंत निर्घूणपणे खोपकर यांची हत्या करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी गद्दारांना माफी नाही या दिघेंच्या वाक्याचा संबंध थेट खोपकर यांच्या हत्येशी जोडण्यात आला. आणि प्रकरण चिघळत गेलं..
या प्रकरणात आनंद दिघे यांच्यासह 52 नगरसेवकांना अटक करण्यात आली. आनंद दिघेंना टाडा लावण्यात आला. त्यानंतर प्रकरण कोर्टात गेलं. मात्र ठाण्यासह महाराष्ट्रात या घटनेतून एक मॅसेज कायमचा गेला तो म्हणजे सेनेत गद्दारी केली तर खोपकर होवू शकतो..
पुढे कोर्टात काहीच सिद्ध होवू शकलं नाही. केस चालू असतानाच आनंद दिघे यांचा मृत्यू झाला. आणि प्रकरण इतिहासाच्या पानात हरवून गेलं..
मात्र आजही कधी मतांच्या फाटाफुटीचा विषय येतो तेव्हा खोपकरांचा विषय चर्चेत येत असतो.
हे ही वाच भिडू
- आनंद दिघेंच कुटूंब आज कुठे आहे…?
- संपुर्ण भारतातून राम मंदिरासाठी पहिली चांदीची वीट पाठवली होती ती आनंद दिघे यांनीच…
- फक्त आनंद दिघेंच्या सांगण्यावरून बाळासाहेब त्या आदिवासी खेड्यात प्रचाराला आले.