तो सीन बघताच लक्षात आलं होतं फिल्मइंडस्ट्रीमध्ये नवा लंबी रेस का घोडा आला आहे.

मसान सिनेमातला सीन.

बनारसमधल्या गंगा किनाऱ्यावरचा घाट. रात्रीची कातर वेळ. काही दोस्त लोक शेकोटी पेटवून दारू प्यायला बसलेत. सिनेमाचा नायक(?) दीपक कुमार वर कोणत तरी आभाळा एवढ दुख्खः कोसळलंय. त्याचे मित्र त्याला धीर द्यायचा प्रयत्न करत आहेत. तो काहीच बोलत नाही आहे. मित्रांपैकी एक जण काही तरी बोल म्हणून मागे लागलाय तर त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणतोय,

“नही भाई तू टाईम ले.”

दीपकला दारू पूर्ण चढलीय. दारू पेक्षा त्याच दुख्खः जास्त चढलंय. त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडतात,

“हमको शायरी पसंत है”

मागे नदीवरच्या ब्रिजवरून रेल्वे पास होत आहे. तिच्याकडे हात दाखवून तो दुष्यंतकुमार यांच्या कवितेच्या त्या सुप्रसिध्द ओळी म्हणतो,

” तू किसी रेल सी गुजरती है. मै किसी पूल सा थरथराता हुं.”

निरव शांतता पसरली आहे. त्याच्या दोस्तांना ती कविता कळणे शक्यचं नाही आहे पण दीपकचं दर्द त्यांना जाणवतंय. अखंड पॉज आहे. दीपकचा स्वतःशीच संवाद चाललाय. वर आभाळाकडे पहात गूढ हसतो आणि विचार करत करत म्हणतो

” भाग के जाना होगा तो भाग भी लुं “

परत शब्दांनी त्याची साथ सोडलीय. पुढचं वाक्य हातातून निसटून गेलंय. त्याला काय नेमक म्हणायचंय कोणालाही कळत नाही आहे. परत मोठा पॉज,तेच गूढ हसू. आवाज फक्त शेकोटीचा. अचानक त्याला शब्द सापडतात,

“साला ये दुख काहे खतम नही होता बे?”

हाच त्याचा ब्रेकिंग पोईंट. पहिल्यांदाच तो रडतो. एवढा वेळ दाबून धरलेला बांध फुटतो. त्याचे दोस्त जवळ येतात. त्याचं ते रडू बघून आपणही आतून हलतो. त्याचा बेस्ट फ्रेंड म्हणत असतो,

“रो मत वरना बहुत मारेंगे!”

गेल्या काही वर्षात आलेल्या हिंदी सिनेमामधला हा सर्वात बेस्ट सीन असावा. तेव्हा कुणाला नाव ही माहित नसलेला विक्की कौशल हा दीपक कुमारचा रोल करत होता. त्याचा हा दुसराच सिनेमा होता.

खर तर हा सीन सिनेमाचा स्क्रिप्टरायटर वरूण ग्रोव्हरने वेगळाच लिहिला होता. त्याला त्या सीन मध्ये दीपक रडतोय असे दाखवायचेच नव्हते. सिनेमाच्या शेवटच्या सीन मध्ये दीपक पहिल्यांदा आणि शेवटच रडतोय असच त्याला दाखवायचं होतं. कधी दारू न पिणारा विक्की कौशल या सीनच्या शुटींगसाठी पहिल्यांदाच दारू प्यायला होता.

दुष्यंतकुमारची ती शायरी, तिथली शांतता, मागून जाणारी ट्रेन, दारूची नशा यामुळे काय झालं काय माहीत पण विक्की वेगळ्याच झोन मध्ये निघून गेला. त्याने तो पूर्ण सीन बदलून टाकला. त्याचे ते हृद्य पिळवटून टाकणारे रडणे स्क्रिप्ट मध्ये नव्हतेच. ते रडणे बघून सेटवर उपस्थित असणारा प्रत्येकजण रडला.

नीरज घेवाणने एडिटिंगच्या वेळी आहे तसा सीन ठेवायचं ठरवलं. वरुण ग्रोवरची सुद्धा याला ना नव्हती. उलट पूर्ण सिनेमा मधला हा त्याचाही सगळ्यात आवडता सीन होता. मसाण मधला तो सीन बघताच जाणकारांनी मत नोंदवल

“इंडस्ट्री मै लंबी रेस का घोडा आया है.”

मसाणच्या रोलमध्ये त्याला लोकांनी एवढ स्वीकारलं होत की विकी कौशल म्हणजे खरोखर बनारस का छोरा आहे असच सगळ्यांना वाटलेलं. तो पंजाबी आहे आणि लहानपणापासून मुंबईत वाढलाय, त्याने इंजिनियरिंग केलंय हे कोणालाही सांगूनही पटत नव्हते. त्याचे वडील बॉलीवूड मधले फेमस स्टंट डायरेक्टर आहेत. मसाण येण्यापूर्वी त्याने अनेक वर्ष नाटकात काम केलंय अनुराग कश्यपच्या गॅण्ग्ज ऑफ वासेपूरला असिस्टंट केलंय हे ही उशिरा बाहेर आलं.

मसाणने मात्र त्याच आयुष्य बदलून टाकलं. त्यानंतर अनुरागचा रमण राघव आला. रमण राघवमध्ये त्याला नवाजुद्दीनच्या समोर पाहिला तेव्हा सर्वात जास्त कौतुक कश्यपच झालं. अगोदरच रामू आणि कश्यप यांची तुलना होतच होती त्यात रामू जसा नवनव्या हिरोईन उचलून पुढे आणायचा तसा नवाझुद्दीन नंतर विकी त्याला सापडला.

आलीया भट्टसोबतचा राझी, करण जोहरचा लस्ट स्टोरीज, राजू हिरानीचा संजू प्रत्येक सिनेमामध्ये वेगवेगळ्या टाईपचे रोल आणि त्यातली त्याची नितांत सुंदर अॅक्टिंग याची चर्चा थांबतच नाही आहे. मुलींचा तो लाडका आहे. उरी द सर्जिकल स्ट्राईक च्या यशानंतर तर तो सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये गणला जातोय.

विक्की कौशलचा सध्याचा वेग बघता येत्या काही वर्षात भारतीय फिल्मइंडस्ट्रीमधले सगळे मापदंड तो बदलून टाकेल यात शंका नाही. पण मसाण सारखा प्युअर अभिनय करायची संधी त्याला परत मिळेल का याच उत्तर आपल्यालाही ठाऊक नाही.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.