यंदाच्या दसऱ्याला रावण जळताना दिसेल, पण कुंभकर्ण आणि मेघनाथ नाही…

दसरा म्हटल्यावर रावण दहन आलंच. देशभरात ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचं दहन केलं जातं. हल्लीच्या काळात रावणाच्या पुतळ्याला अनेक समस्या किंवा वाईट गोष्टींची जोड देऊन त्या पुतळ्यांना जाळण्यात येतं.

पण उत्तर भारतात परंपरा जरा वेगळी आहे. तिथे रावणाच्या पुतळ्यासोबतच त्याचा भाऊ कुंभकर्ण आणि त्याचा मुलगा मेघनाथ या दोघांचे सुद्धा पुतळे जाळण्याची परंपरा आहे. पूर्वीपासूनच पारंपरिक रीतीने या  तिघांचे पुतळे एकत्र जाळले जातात. 

मात्र उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ मध्ये असलेल्या ऐशबाग मैदानावर या परंपरेत आता बदल केला जाणार आहे.

ऐशबाग मैदानावर रावणासोबत जाळले जाणारे कुंभकर्ण आणि मेघनाथाचे पुतळे आता यापुढे जाळले जाणार नाहीत. कारण ऐशबाग दसरा आणि रामलीला समितीने २०२२ पासून हे दोन पुतळे न जाळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या ४०० वर्षांपासून साजऱ्या होणाऱ्या या परंपरेत आता बदल होणार आहे.

समितीचे अध्यक्ष हरिश्चंद्र अग्रवाल आणि सचिव आदित्य द्विवेदी हे गेल्या ५ वर्षांपासून या परंपरेत बदल करण्यासाठी प्रस्ताव मांडत आलेले आहेत. परंतु समितीमधील लोकांनी परंपरेत बदल करणे योग्य नाही असं कारण देऊन या प्रस्तावाला फेटाळलं होतं. मात्र अखेर यंदा या प्रयत्नांना यश आलं आणि कुंभकर्ण आणि मेघनाथाचे पुतळे दहन कारण्याची परंपरा बंद होणार आहे. 

पण एवढी वर्ष परंपरा चालू असताना या दोन पुतळ्यांना जाळावं आणि जाळू नये असा वाद का निर्माण झाला? 

तर याचं कारण आहे रामायणात… 

समितीचे अध्यक्ष हरिशचंद्र अग्रवाल यांनी रामचरितमानस आणि रामायणाच्या इतर प्रतींमधील  पुराव्यांचा आधार देऊन या परंपरेत बदल करण्याची मागणी केली होती. 

ते म्हणतात की, कुंभकर्ण आणि मेघदूताला प्रभू रामाच्या अवताराबद्दल माहिती होती. राम हे विष्णूचे अवतार आहेत अशी माहिती रावणाला दिली होती. तर सीता या लक्ष्मीचं रूप आहे हे कुंभकर्णाने रावणाला समजावून सांगितलं होतं. दोघांनी रावणाला रामाबरोबर युद्ध ना करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्यांचा यात दोष नव्हता” 

पुढे ते सांगतात की, 

“जरी कुंभकर्ण आणि मेघनाथाने युद्धात रावणाची साथ दिली होती. तरी त्यामागे केवळ त्यांचा धर्म होता. कुंभकर्ण मोठ्या भावाची आज्ञा मोडू शकत नव्हता तर मेघनाथ वडिलांची आज्ञा मोडू शकत नव्हता. त्यामुळे सत्य माहित असून सुद्धा त्यांनी युद्धात भाग घेतला होता. त्यामुळे रामायणाच्या युद्धात त्यांचा दोष नव्हता म्हणून त्यांच्या पुतळ्याचं दहन करणं योग्य नाही. असं हरिशचंद्र अग्रवाल यांनी सांगितलं. 

या पुराव्यांच्या आधारावरच अध्यक्ष हरिशचंद्र अग्रवाल आणि सचिव आदित्य द्विवेदी यांनी दोन पुतळ्याचं दहन थांबवण्यात यावं असा प्रस्ताव समितीत मांडला होता. 

मात्र समितीमधील इतर सदस्यांनी हा प्रस्ताव ५ वर्ष फेटाळून लावला होता.

का? तर याचं उत्तर आहे इतिहासात…

लखनऊच्या ऐशबाग मैदानावर साजरी होणारी रामलीला आणि या तीन पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा ४०० वर्ष जुनी आहे. १६ व्या शतकातील प्रसिद्ध संत संत गोस्वामी तुलसीदास यांनी या रावण दहनाची सुरुवात केली होती. तुलसीदासांनी ‘रामचरितमानास’ या प्रसिद्ध ग्रंथाची रचना केली होती. रामचंद्रांच्या जीवनावर महर्षी वाल्मिकी यांच्यानंतर सगळ्यात मोठं लेखन तुलसीदास यांनी केलं आहे.

त्यामुळे एवढ्या वर्षांपासून चालत आलेली परंपरा बदलणे योग्य नाही असं मत सदस्यांनी मांडलं होतं.

मात्र अध्यक्षांनी पुराव्यांच्या आधारे समितीमधील सदस्यांना त्यांचं मत समजावून सांगितलं आणि यंदा यावर निर्णय घेण्यात आला. यापूर्वी २०२० मध्ये लॉकडाऊनमुळे सुद्धा एकदा या परंपरेत बदल करण्यात आला होता. तेव्हा सुद्धा केवळ रावणाच्या पुतळ्याचच दहन करण्यात आलं होतं. मात्र आता ही परंपरा कायमस्वरूपी बंद होत आहे. 

यंदा या परंपरेत कायमस्वरूपी बदल होतोय त्याचप्रमाने या मैदानावरील रामलीलेचा इतिहास सुद्धा तसाच आगळावेगळा राहिलेला आहे. 

‘श्रीरामचरितमानस’ ग्रंथाचं लेखन पूर्ण झाल्यानंतर गोस्वामी तुलसीदास यांनी ऐशबाग मैदानावर रामलीलेची सुरुवात केली. यामागे उद्देश असा होता की, बहुसंख्य लोकं निरक्षर आहेत, त्यामुळे त्यांना या ग्रंथात लिहिलेल्या रामाच्या लीला कळणार नाहीत. म्हणून या लीला लोकांच्या समोर सादर करण्याची संकल्पना त्यांना सुचली. 

त्यांनी पावसाळ्याच्या चार महिन्यात ऐशबागेपर्यंत प्रवास केला. ऐशीबागेतच त्यांनी रामाच्या लीला अभिनयाच्या माध्यमातून लोकांच्या समोर सादर करण्याचा प्रण घेतला. तसेच दसऱ्याच्या दिवशी रावणदहन करण्याचा कार्यक्रम सुद्धा सुरु केला. त्यांनी ऐशबागेबरोबरच वाराणसी आणि चित्रकूटमध्ये  सुद्धा ही परंपरा सुरु केली.

हे काम एकट्याने होणारं नव्हतं. तसेच हे धार्मिक काम पार पाडण्यात आपणही मदत करावी या उद्देशाने अयोध्येच्या साधू संतांनी सुद्धा यात मदत करायला सुरुवात केली. गोस्वामी तुलसीदास यांच्या निधनानंतर साधू संतांनीच ही परंपरा समोर चालू ठेवली. 

परंपरा चालू होती पण या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने मोठं स्वरूप मिळालं अवधचे नवाब आसिफुद्दौला यांच्यामुळे. 

त्यांनी इथे ईदगाह आणि रामलीलेसाठी बरोबार ६.५ एकर जमीन आणि सरकारी मदत दिली. एवढंच नाही तर स्वतः रामलीलेतील पात्र साकारून त्यांनी रामलीला सुद्धा सादर केली. तसेच अवधचे तिसरे नवाब वाजिद अली शाह यांनी सुद्धा या कार्यक्रमासाठी शाही खजिन्यातून मदत केली होती. 

मात्र या परंपरेत १८५७ सालात मोठा बदल झाला.

१८५७ च्या उठावानंतर या रामलीला आणि रावणदहणाची जबाबदारी स्वातंत्र्य सैनिकांनी घेतली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकजागृतीचं काम करण्याची सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिशांनी या रामलीलेवर बंदी घातली. त्यामुळे १८५७ ते १८५९ या काळात हा कार्यक्रम बंद होता.

मात्र १८६० सालात ऐशबाग रामलीला समितीची स्थापना झाली. तेव्हापासून या कार्यक्रमाचं आयोजन याच समितीच्या माध्यमातून करण्यात येतंय. तेव्हापासून अखंडपणे रामलीला चालू आहे.

२०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा या कार्यक्रमात भाग घेतला होता. तसेच त्यांनी स्वतः तीर चालवून रावणाचं दहन केलं होतं. त्यामुळे या उत्सवाला आणखी महत्व प्राप्त झालंय. 

काळानुरूप या रामलीलेमध्ये  बदल झाले. गेल्या अनेक वर्षांपासून डिजिटल पद्धतीने रामलीलेचं सादरीकरण करण्यात येतं. मात्र आज समितीने ४०० वर्षांच्या परंपरेत बदल करण्याचा निर्णय हा ऐतिहासिक आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.