पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे मोहेंजोदडोचं अस्तित्व धोक्यात आलंय…

सिंधू संस्कृती सगळ्यांना माहीत आहे. ही संस्कृती भारतातील असल्यामुळे आपल्याला या संस्कृतीबद्दल शाळेतही शिकवण्यात आलंय. याच संस्कृतीमुळे भारतातील नागरी समाजाची सुरुवात झाली असे इतिहासकार सांगतात. 

मात्र काही दिवसांपूर्वी पाकिस्तानात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाकिस्तानच्या सिंध प्रांतात मोठ्या प्रमाणावर पूर आलाय. पुराच्या पाण्यामुळे मोहेंजोदाडोतील अनेक साईट्स कोसळण्याच्या मार्गावर येऊन ठेपल्या आहेत. 

अतिवृष्टीमुळे सिंध प्रांतातील अनेक महत्वाच्या साईट्स ध्वस्त झाल्या आहेत. त्यात बाकी साईट्सप्रमाणे मोहेंजोदाडो शहराच्या साईट्सची सुद्धा अवस्था बिकट झालेली आहे. मोहेंजोदाडो शहरातील विटांच्या भिंती, महान स्नानगृह आणि मृतकांच्या स्तूपात पाणी शिरल्यामुळे या वास्तू कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. 

तब्बल इ. स. पूर्व २५०० ते १७०० वर्ष जुने असलेलं मोहेंजोदाडो शहर या एका अतिवृष्टीमुळे धोक्यात आलंय.    

सध्या सिंधू नदीचा बारमाही प्रवाह जिथून वाहतो त्या प्रवाहाच्या १ ते १.५ किमीच्या अंतरात मोहेंजोदाडो शहराच्या साईट्स आहेत. शहराच्या साईट्स नदीपात्रापेक्षा उंचवट्यावर असल्यामुळे नदीच्या पाण्याचा या साईट्सना धोका नाही. पण अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे या साईट्समधील अनेक बांधकामांमध्ये पावसाचं पाणी शिरलंय.

नेमकी या मोहेंजोदाडो शहराची रचना कशी आहे?

Mohenjo-daro: An Amazingly Developed City | 2010 | JAXA Earth Observation Research Center (EORC)

तर सिंधू नदीच्या मुख्य प्रवाहाला लागून एक उंचवट भाग आहे ज्यावर या शहराची रचना करण्यात आली होती. हे शहर एकच असले तरी तीन वेगवेगळ्या भागात या शहराचे उत्खनन करण्यात आले आहे. या तीनही उत्खनन झालेल्या साईट्स एकमेकांच्या जवळच आहेत. 

१९२२ मध्ये या शहराचा शोध लागला होता. तर १९८० मध्ये या साईटला वर्ल्ड हेरिटेज म्हणून घोषित करण्यात आलं होतं. 

मोहेंजोदाडोत करण्यात आलेलं पहिलं उत्खनन नदीपासून सर्वात दूर आहे. त्या साईटलाच मूळ मोहेंजोदाडो शहर म्हणतात. मूळ साईटच्या जवळच दुसरं उत्खनन आहे जी सगळ्यात महत्वपूर्ण साईट मानली जाते. कारण दुसऱ्या साईटमध्येच महान स्नानगृह आणि मृतकांचा स्तूप आहे. तर तिसरं उत्खनन हे नदीच्या सर्वात जवळ म्हणजे १ किमी अंतरावर आहे. या तिसऱ्या साईटमध्ये केवळ घरांचे, नाल्यांचे आणि रस्त्यांचे अवशेष आहेत.   

मोहेंजोदाडो शहराचं बांधकाम इ. स. पूर्व २५०० ते १७०० वर्षांपूर्वी करण्यात आलं होतं. त्यामुळे ही साईट आजच्या घडीला तब्बल ३.७ ते ४.५ हजार वर्ष जुनी आहे. 

या शहरातील बांधकाम पूर्णपणे विटांचे आहे. तसेच हे बांधकाम करतांना विटा आणि नदीच्या पात्रातील चिकन मातीचा वापर करण्यात आलाय. या बांधकामात वापरलेल्या विटा भाजलेल्या असल्यामुळे त्या मजबूत आहेत. मात्र बांधकाम करतांना विटांना जोडण्यासाठी वापरलेली माती ही कच्चीच आहे. ही कच्ची माती पावसाच्या पाण्यामुळे विरघळून जाते. त्यामुळे साईट्सला धोका निर्माण होतो. 

या पावसामध्ये नेमके तसेच घडले…

अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे महान स्नानगृह आणि घरांच्या भिंती मध्ये असलेली माती बाहेर निघून गेली. भिंतींमधील माती बाहेर निघून गेल्यामुळे विटांचा आधारच निघून गेलाय त्यामुळे अनेक भिंती एका बाजूला झुकल्या आहेत. एका बाजूला झुकत चाललेल्या भिंती आणखी झुकल्यास त्या खाली कोसळण्याची शक्यता आहे. तसेच बऱ्याच ठिकाणी भिंतींच्या विटा निखळलेल्या सुद्धा आहेत. 

शहरातील भिंतींसोबतच स्नानगृहाच्या जवळ जो मृतकांचा स्तूप आहे त्या स्तुपातसुद्धा पाणी शिरलंय. स्तूप आणि स्तूपाला आधार देणाऱ्या भिंतीत पाणी शिरल्यामुळे पाणी बांधकामाच्या कमजोर भागातून आत खोलवर झिरपलंय. त्यामुळे स्तूपाच्या अंतर्गत भागाला नुकसान झालं असल्याचं सांगण्यात येतंय. 

मोहेंजोदाडो शहरात उत्खनन झालेल्या भागात नुकसान तर झालंच. त्यासोबतच ज्या भागात उत्खनन करायचं आहे त्या भागात सुद्धा अतिवृष्टीने माती खरडलेली आहे. तसेच या भागात मुरलेलं पाणी उत्खनन झालेल्या भागात झिरपलं आणि उत्खनन झालेल्या भागात आणखी जास्त नुकसान झालंय. 

पाऊस सुरु झाल्यांनतर साईट्समध्ये जमा होणारं पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचाऱ्यांनी बरेच प्रयत्न केले. त्यासाठी नाल्या खोदल्या मात्र वेळेवर पाणी बाहेर न काढता आल्यामुळे या साईट्सला व्हायचं ते नुकसान झालंच. 

मोहेंजोदडो शहराच्या साईट्सबरोबरच सिंध प्रांतातील अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक साईट्चे भाग सुद्धा  कोसळले आहेत. 

त्या साईट्समध्ये मोहेंजोदाडो प्रमाणेच वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या मक्ली येथील स्मारकाच्या भागाची सुद्धा पडझड झालीय. तसेच कोट दिजी आणि रानीकोटच्या किल्ल्याची एक भिंत कोसळून गेलीय. तर थूल मीर रुकान येथील बौद्ध स्तूपाच्या भागाची सुद्धा पडझड झालीय. या अतिवृष्टीमुळे सिंधमध्ये असलेल्या दोन वर्ल्ड हेरिटेज साईट्सचं नुकसान झालंय. 

मोहेंजोदाडो आणि मक्ली स्मारकासारखी जागतिक वारसास्थळं मुळात अनेक वर्षांपासून निधीच्या कमतरतेमुळे उपेक्षित आहेत. त्यातही आता झालेल्या मुसळधार पावसामुळे या स्थळांना मोठं नुकसान झालंय. पाकिस्तान सरकार आणि जागतिक समुदायाने या साइट्सकडे वेळीच लक्ष न दिल्यास या अवशेषांना नष्ट व्हायला वेळ लागणार नाही.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.