तालिबानमुळे तरी अफगाणिस्तानातील ‘बच्चा बाजी’ परंपरा थांबणार का?

‘द डान्सिंग बॉयज ऑफ अफगाणिस्तान’ या नावाने एक डॉक्यूमेंट्री आहे. प्रत्येकाने बघावी अशीच आहे ती.

आज जगाच्या हरएक कोपऱ्यात फक्त तालिबान अफगाणिस्तान अशीच चर्चा आहे. तालिबान्यांच्या येण्यामुळं अफगाणिस्तान कसं वाईटाच्या गर्तेत लोटलं जाणार आहे याची ती चर्चा. पण तालिबानी येण्याच्या आधीपासून ही, काही वाईट प्रथा अफगाणिस्तानात अस्तित्वात होत्या. त्यातलीच एक ‘बच्चाबाजी’ अर्थात ‘बच्चा बेरीश’ प्रथा.

वर वाचलेली डॉक्युमेंट्री पण या प्रथेवरच आधारित आहे.

ज्या देशात महिला बुरख्या आड आहेत त्या देशात नाचणाऱ्या महिलांची जागा या लहान मुलांना घ्यावी लागली आहे. थोडक्यात हे लहान मुलांचं लैंगिक शोषण आहे. अफगाणिस्तानातल्या कॅरोल स्ट्रीटवर या बच्चाबाजीच्या तुम्हाला खूप साऱ्या DVD मिळतील.

अफगाणिस्तानातली ही प्रथा लहान मुलांच्या वेश्याव्यवसायाशी जोडलेली आहे.

ही लहान मुलं तथाकथित उच्चवर्गीयांच्या पार्ट्यांमध्ये सुद्धा नाचवली जात होती. खोटे स्तन लावून, तोंडावर महिलांसारखा रंग फासून, हातापायात घुंगरू बांधून ही मुलं नाचतात. या मुलांचं अफगाणिस्तानातील सरदार आणि कमांडरनी अपहरण केललं असतं.
पुढं या मुलांना लैंगिक गुलाम म्हणून विकलं जात. ज्या पुरुषांना स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये जास्त इंटरेस्ट असतो असे पुरुष या मैफिलीला जातात. काही अंशी अफगाणिस्तान सरकार सुद्धा या प्रथेला जबाबदार होते. त्यांनी असे कोणत्याही पद्धतीचे कायदे केले नाहीत ज्यामुळे या प्रथेला बंद करता येईल. उलट पोलिसांकडूनच अशा प्रकारच्या प्रथेला जोपासलं जायचं.

काही वर्षांपूर्वी  या प्रथेचा बळी गेलेल्या मुलाने एक इंटरव्ह्यू दिला होता. तो म्हंटला,

मी या वाईट लोकांच्या तावडीतून कसबसं बाहेर पडलो. मी संरक्षणासाठी पोलिसांकडे गेलो पण पोलिसांनी परत मला त्या लोकांच्या हवाली केले. त्या लोकांच्या अत्याचाराने मी बेजार झालो होतो. त्या लोकांनी माझ्यावर लैंगिक अत्याचार करून अक्षरशः माझी गुद्दद्वाराला इजा केली होती. डॉक्टरांनी ऑपरेशन केलं. पण जखम भरून यायला वेळ लागला.

मला माझ्या घरच्या लोकांनीही नाकारलं. उलट तेच घर सोडून गेले. कारण मी पळून गेल्यावर तो कमांडर माझ्या घरी जाऊन तमाशा करायचा. त्याच्या जाचाला कंटाळून माझे घरचे वैतागले. आता मी परत या दलदलीत फसलोय. यातून सुटका मरणानंतर मिळेल असं वाटत.

ही शतकानुशतके जुनी परंपरा आहे. १९९६ मध्ये तालिबान सत्तेवर आल्यानंतर, या प्रथेवर  समलैंगिकतेला विरोध म्हणून बंदी घालण्यात आली. समलैंगिकतेचं आचरण हे तालिबान्यांनी शरिया कायद्याशी विसंगत मानले. मुलांच्या सट्टेबाजी आणि समलैंगिकतेला आचरणात आणणाऱ्यांना फाशीची शिक्षा होती. पण या शिक्षेअंतर्गत गुन्हेगारांऐवजी या प्रथेला बळी पडलेल्या मुलांवरच गुन्हे दाखल झाले.
क्लोव्हर फिल्म्स आणि अफगाणिस्तानचे पत्रकार नजीबुल्ला कुरेशी यांनी ‘द डान्सिंग बॉयज ऑफ अफगाणिस्तान’ डॉक्युमेंटरी फिल्म बनवली. जी यूकेमध्ये मार्च २०१० मध्ये दाखवली गेली आणि पुढच्याच महिन्यात अमेरिकेत प्रसारित झाली. द हफिंग्टन पोस्टचे पत्रकार निकोलस ग्राहम यांनी या माहितीपटाचे “आकर्षक आणि भयावह दोन्ही” अशा भाषेत कौतुक केले. ‘बच्चा बाजी’ या प्रथेला जगभरातून विरोध केला जातो. अफगाणिस्तानबरोबरच पाकिस्तानमध्येही मुलांची सट्टेबाजी सुरू असते. पाकिस्तानातूनही याविषयी बातम्या येत राहतात.

अशा परिस्थितीत, आता अफगाणिस्तानात तालिबान सत्तेवर आलंय. ही प्रथा बंद झाली तर ते  स्वागतार्हच आहे, पण तालिबान जर त्या मुलांवरच गुन्हे नोंद करणार असेल तर प्रथा कशी बंद  होणार ? असा प्रश्न पडतो. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.