मंत्र्याची गाडी अडवली अन् त्यांच्या बॉडीगार्डने कस्टमच्या अधिकाऱ्याच्या थोबाडात लगावली

गल्लीतील भाईची गाडी पोलिसांनी अडविल्यावर किती गोंधळ होते हे आपल्याला माहीतच आहे. हे प्रकरण तर थेट मंत्र्यांशी निगडित होते. नाक्यावर गाडी थांबवली म्हणून हे प्रकरण सुरु झाले होते. विधानसभेत तर हे प्रकरणच गाजलेच होते. आणि अशा प्रकरणात सरकारला धारेवर धरणार नाहीत ते विरोधी पक्ष कसले.

तत्कालीन मुख्यमंत्र्यांना या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत करण्यात येईल अशी ग्वाही द्यावी लागली होती.

तर किस्सा असा होता…

कस्टम विभागाला एक टीप मिळाली होती. कर चुकवून काही जण त्या रस्त्याने जाणार असल्याची ती माहिती मिळाली होती. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील वडखळ नाका येथे कस्टमचे पथक थांबले होते. येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीचे चेकिंग करत होते. तेवढ्यात अलिबाग वरून मुंबईच्या दिशेने जाणारी एक गाडी टॉर्च दाखवून अडविण्यात आली. मंत्री गाडीत आहे म्हटल्यावर, त्यांची गाडी जाऊ दिली. मात्र तरीही मंत्री असतांना गाडी का अडवली? असं विचारत मंत्र्याच्या बॉडीगार्डने कस्टमच्या अधिकाऱ्याच्या   थोबाडीत मारली होती.

 त्यानंतर कस्टमच्य अधिकाऱ्यांनी सुद्धा बॉडीगार्डला मारहाण केली.  

तर हे प्रकरण आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांचे.   

घटना आहे ५ जून १९७३ ची.  त्यावेळी अंतुले हे वसंतराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. घटनेच्या आदल्या दिवशी म्हणजे ४ जून रोजी अंतुले यांची सरकारी गाडी बिघडली होती. दुसऱ्या दिवशी सुद्धा गाडी दुरुस्त नसल्याने त्यांनी रायगडच्या जिल्हा परिषदचे तत्कालीन अध्यक्ष बाळकृष्ण पाटील यांच्या अँबेसिटरने अलिबागवरून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला होता. 

वडखळ नाक्यावर अंतुले असणारी गाडी कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अडवली. कस्टमचे खास पथक एक टिप मिळाल्यामुळे तिथे थांबली होते. अंतुले यांची ओळख पटताच त्यांची गाडी जाऊ दिली. मात्र, गाडी अडविल्याचा राग मनात धरून अंतुले यांचे बॉडीगार्ड बी. घोसाळकर यांनी कस्टमचे अधिकारी जवळकर यांच्या थोबाडीत मारली. 

जवळकर यांनी सुद्धा काही एक विचार न करता घोसाळकर यांना मारहाण केली. कस्टमचे अधिकारी जवळकर यांच्याकडे ओळखपत्र नसल्याने हा वादअधिक चिघळला. घोसाळकर यांनी जवळील पोलीस ठाण्याशी संपर्क करून कारवाई करण्याची मागणी केली. जागेवर पोलीस आले आणि त्यांनी जवळकरांना ओळखले आणि घोसाळकरांना सुद्धा सांगितले की, ते कस्टमचे अधिकारी आहेत.  

घोणसाळकर ऐकायला तयार नव्हते. मग जवळकर यांना पेण पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि पहाटे ४ पर्यंत पोलीस ठाण्यात बसून ठेवण्यात आले. 

चोरट्या मालाची वाहतूक थांबविण्यासाठी कस्टमचे अधिकारी थांबले होते. मात्र मंत्र्याची गाडी अडविल्याच्या कारणाने त्यांना चोरासारखी वागणूक देण्यात आली होती. हे वडखळ प्रकरण तेव्हा चांगलेच गाजले. यावर विधानसभेत जोरदार चर्चा झाली होते. 

तेव्हा वसंतराव नाईक हे मुख्यमंत्री होते. या प्रकरणामुळे त्यांच्या सरकारविरोधात अविश्वासाचा ठराव विधानसभेत मांडण्यात आला. तर शेतकरी कामगार पक्षाचे नेते दि. बा. पाटील यांनी सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी करण्याचे मागणी केली. जर मुख्यमंत्र्यानी मागणी मान्य केली तर आम्ही अविश्वास ठराव मागे घेतो असे सुद्धा सांगितले होते. 

वसंतराव नाईक यांनी वडखळ प्रकरणात सीबीआय मार्फत चौकशी करण्यात येईल असे आश्वासन दिले. त्यामुळे त्यांच्या सरकार विरोधातील अविश्वास ठराव मागे घेण्यात आला. मात्र, हे प्रकरण काही सीबीआयकडे सोपविण्यात आले नाही. 

रा. सु. गवई यांच्या अध्यक्षतेखाली एक निमसरकारी समिती स्थापन करण्यात आली. त्याला सत्यशोधन समिती असे नाव देण्यात आले होते. या समितीने अंतुले यांना निर्दोष ठरविले होते. मात्र समितीने अंतुले यांना निर्दोष ठरविल्यानंतरही काही प्रश्नांचे कोडे मात्र शेवटपर्यंत सुटले नाही.     

बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा झाले. मात्र, ते राजकीय जीवनात असे पर्यंत त्यांच्या मानगुटीवर हे वडखळ नाक्याचे प्रकरण कायमचं राहिले.

 हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.