ज्या प्रकरणात मोहम्मद झुबेरला अटक करण्यात आली आहे; ते प्रकरण नेमकं काय आहे ?

अल्ट न्यूजचा संस्थापक असणाऱ्या मोहम्मद झुबेरला धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. झुबेरला मंगळवारी मॅजिस्ट्रेस्ट कोर्टात हजर करण्यात आले असता एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

झुबेर विरोधात आयपीसीच्या १५३ (A) दंगल घडविण्याच्या उद्देशाने चिथावणी देणे, २९५ (A) कोणत्याही गटाच्या धार्मिक भावना भडकावणे या कलमा अंतर्गत कारवाई केल्याचे सांगण्यात आले आहे. 

झुबेरला अटक का करण्यात आली ?   

२०१८ मध्ये मोहम्मद झुबेर एक फोटो ट्विट केला होता. त्याचा आधार घेत हनुमान भक्त असे नाव असणाऱ्या @balajikijaiin या ट्विटर हॅण्डलने १९ जून रोजी दिल्ली पोलिसांना टॅग करत एक ट्विट केलं की, आमचे देव असणाऱ्या हनुमान यांचा हनिमूनशी संबंध जोडत हिंदूंचा अपमान केलायं. कारण हनुमान हे ब्रह्मचारी होते. यामुळे या माणसा विरोधात दिल्ली पोलिसांनी कारवाई करण्यात यावी असे ट्विट केले होते.    

२४ मार्च २०१८ रोजी झुबेरने १९८३ मधील एका हिंदी पिक्चरच्या सिनचा फोटो ट्विट केला होता. त्यात लिहले होते की, २०१४ आधी हनिमून हॉटेल होते ते २०१४ नंतर हनुमान हॉटेल झाले आहे. संस्कारी हॉटेल असे ट्विट केले होते.  

हनुमान भक्त या ट्विटर हॅण्डलने यावरच आक्षेप घेतला आहे. काल रात्री पर्यंत हनुमान भक्त या ट्विटर हॅण्डलचे ४०० फॉलोवर्स होते ते आता १ हजार ६०० पेक्षा जास्त झाले आहेत. 

झुबेर विरोधात करण्यात आलेल्या एफआयआर मध्ये लिहण्यात आलंय की, मोहम्मद झुबेर यांचे ट्विट केलेला फोटो एका विशेष धार्मिक समूहाची विरोधात वापरण्यात आला आहे. दोन समूहातील लोकांमध्ये द्वेष पसविण्यासाठी हे पुरेसं आहे.

एखाद्या समुदायाच्या धार्मिक भावनांचा अपमान करण्यासाठी ही पोस्ट जाणीवपूर्वक इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पसरविण्यात आली होती. त्यामुळे जुबेर विरोधात आयपीसीच्या १५३ (A) आणि २९५ (A) कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत दिल्ली पोलिसांच्या इंटेलिजन्स फ्यूजन आणि स्ट्रॅटेजिक ऑपरेशन्सचे डीसीपी के. पी. एस. मल्होत्रा यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले की, 

झुबेर विरोधात एका ट्विटर हॅण्डलने तक्रार केली होती. त्यात झुबेर याने ट्विट केलेला फोटो हा देवाचा अपमान करणार आहे.  हे ट्विट अनेकांनी रिट्विट केल्याचे दिसून येत आहेत. सोशल मीडियावर या गोष्टीचा वापर करून अपमान करण्यासाठी काही जण गुंतले आहेत. यामुळे दोन धर्मात, समूहात द्वेष पसरवला जात आहेत. यामुळे सार्वजनिक शांतता बिघडली जात आहे. 

झुबेरने जरी २०१८ मध्ये हे ट्विट केले असले तरीही काही लोकांनी हा मुद्दा आता उपस्थित केला आहे. त्यामुळे आम्ही ही कारवाई केली केल्याचे सांगितले.  

२०२० च्या एका प्रकरणात चौकशीला बोलावले आणि अटक केली

अल्ट न्यूजचे दुसरे संस्थापक असणाऱ्या प्रतीक सिन्हा यांनी ट्विट करून माहिती दिली की, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल २०२० मधील एक प्रकरणात चौकशीसाठी बोलावले होते. या प्रकरणात झुबेरला उच्च न्यायालायने संरक्षण दिले होते. 

सोमवारी संध्याकाळी ६ वाजून ४५ मिनिटांनी दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल आम्हाला सांगितलं की, झुबेर विरोधात एक एफआयआर दाखल झाली असून त्यात अटक करण्यात आली. तसेच आम्हाला एफआयआरची कॉपी देण्यात आली नसल्याचा आरोप केला.

मोहम्मद झुबेरला अटक केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर टिका केली आहे. 

२०२० मध्ये कुठलं प्रकरण झुबेर विरोधात दाखल आहे 

सप्टेंबर २०२० मध्ये दिल्ली पोलिसांच्या सायबर सेल आणि छत्तीसगडमधील रायपूर शहरातील पोलिसांनी झुबेरवर माहिती तंत्रज्ञान (IT) कायदा २००० आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (POCSO) कायदा २०१२ च्या कलमांतर्गत गुन्हे दाखल केले होते. एका अल्पवयीन मुलीचा तिच्या वडिलांसोबत तिचा चेहरा अस्पष्ट असलेला फोटो झुबेरने पोस्ट केला होता.

मुलीच्या वडिलांची झुबेरशी शाब्दिक चकमक झाली होती आणि त्यांनतर मग झुबेरने त्यांचा फोटो ट्विटरवर टाकला होता.

मे २०२२ मध्ये, दिल्ली पोलिसांनी एफआयआर रद्द करण्याच्या मागणीच्या सुनावणीदरम्यान दिल्ली उच्च न्यायालयाला सांगितले की ट्विट “कोणताही दखलपात्र गुन्हा ठरत नाही”. जुबेरला यापूर्वी दिल्ली तसेच रायपूर येथील खटल्यात अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. 

मोहम्मद झुबेर आणि प्रतीक सिन्हा हे दोघे अल्ट न्यूज या वेब पोर्टलचे संस्थापक आहेत.२०१७ मध्ये सोबत येत त्यांनी हे वेब साईट सुरु केली. यात  फॅक्टचेकिंगची कामं या पोर्टलकडून करण्यात येतं.  

मागच्या महिन्यात भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबरांविरोधात एका न्यूज डिबेट मध्ये बोलले होत्या. त्यानंतर झुबेरने ते वक्तव्य  ट्विट केलं होतं. त्यामुळे हे प्रकरण देशभर पोहचले होते. झुबेरने नुपूर शर्माचा वादग्रस्त  व्हिडिओ शेअर केल्यानंतर नुपूर शर्मा हिला बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमक्या येत होत्या. त्यांनतर या धमक्यांना झुबेर जबाबदार असल्याचा आरोप शर्माने केला होता. त्यानंतर देशभरातील अनेक भागात दंगे झाले होते. यानंतर झुबरे विशेषतः हिंदू राइट विंग अकाऊंट्स झुबेरच्या टार्गेटवर आला होता. 

झुबेर विरोधात चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप त्याचे निकटवर्तीय करत आहेत. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.