अवघ्या २७ महिन्यांची ‘अरीहा’ २० महिन्यांपासून जर्मनीत अडकलीये…

तुम्हाला सागरिका चक्रवर्ती केस आठवतेय? हो तीच सागरिका चक्रवर्ती केस ज्यावर नंतर राणी मुखर्जीचा ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ हा सिनेमा आला. कोलकात्याच्या सागरिका चक्रवर्ती आपल्या नवऱ्यासोबत २००७ मध्ये भारतातून नॉर्वेला गेल्या. वर्षाभरानंतर त्यांना अभिज्ञान नावाचा मुलगा झाला. काही काळानंतर अभिज्ञानमध्ये ऑटिझमची लक्षण दिसू लागली.

२०१० मध्ये सागरिकाने ऐश्वर्या नावाच्या मुलीला जन्म दिला. सागरिका आणि अनुरूप चांगलं आयुष्य जगत होते. पण २०११ मध्ये नॉर्वेच्या चाइल्ड वेल्फेअर सर्व्हिसेसचे अधिकारी अभिज्ञान आणि ऐश्वर्याला सोबत घेऊन गेले. अधिका-यांनी सांगितलं की, या जोडप्यावर बराच काळापासून नजर ठेवली जात होती. हे दोघेही आपल्या मुलांची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत. ते त्यांच्या मुलांना त्यांच्यासोबत झोपवतात, त्यांना हाताने खाऊ घालतात आणि त्यांच्याकडून चूक झाली तर त्यांना मारतात. यामुळे, मुलं १८ वर्षांची होईपर्यंत ती पाळणाघरात राहतील. यानंतर सागरिका चक्रवर्तींनी आपल्या मुलांना परत मिळवण्यासाठी वर्षभराहून अधिक काळ लढा दिला.

हे सगळं सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या वीस महिन्यांपासून जर्मनीत अशाच एका भारतीय मुलीला आपल्या आईबाबांपासून लांब फाॅस्टर होममध्ये ठेवलं गेलंय. आई बाबा हयात असूनही या लहान मुलीला अनाथ होऊन जगावं लागतंय.

जर्मनीत अडकलेली ही मुलगी कोण आहे? हे संपूर्ण प्रकरण काय आहे? या मुलीच्या पालकांचं म्हणणं काय आहे आणि भारत सरकार या संपूर्ण प्रकरणावर काय ऍक्शन घेतय हे सगळं समजून घेऊ

भावेश शाह, धारा शाह आणि या जोडप्याची मुलगी अरिहा शाह. अरीहा शाहचं वयवर्ष अवघं २७ महिने. अरीहाचे वडील वर्किंग विझावर जर्मनीत काम करतात. २०१८ साली सोफ्टवेअर डेव्हलपर म्हणून भावेश शाह जर्मनीत काम करू लागले आणि फेब्रुवारी २०२१ साली जर्मनीतल्या बर्लिनमध्ये अरीहाचा जन्म झाला.

अरीहा ७ महिन्यांची असल्यापासून म्हणजेच सप्टेंबर २०२१ पासून तिच्या आईबाबांपासून लांब आहे. अरीहा जेव्हा फक्त ७ महिन्यांची होती तेव्हा तिच्या पालकांना तिच्या डायपरमधून रक्त येताना दिसलं. खरतर जखम किरकोळ होती पण रिस्क नको म्हणून ते तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. सुरवातीला सगळी प्रोसीजर वैगरे व्यवस्थित पार पडली पण जेव्हा ट्रीटमेंटचा फॉलो अप घेण्याची वेळ आली तेव्हा त्या हॉस्पिटलने चाइल्ड सर्व्हिसेसना अरीहाविषयीची माहिती दिली आणि जर्मन अधिकाऱ्यांनी अरीहाला कस्टडीत घेतलं. कारण काय सांगितलं? तर अरीहाच्या पालकांकडून आणि आजोबांकडून तिचं लैंगिक शोषण करण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर लावण्यात आला असं अरीहाची आई धारा शाह यांनी सांगितलं.

यानंतर अरिहा गेल्या २० महिन्यांपासून जर्मनीतल्या फोस्टर होममध्येच आहे आणि तिच्या पालकांना तिला दर १५ ते २० दिवसांनी भेटण्याची मुभा आहे असं रिपोर्टनुसार सांगण्यात येतंय. आता फोस्टर होममध्ये अशाच बाळांना ठेवलं जातं ज्यांचे आई बाबा हयात नाहीयेत किंवा आपल्या बाळाची काळजी घ्यायला, जबाबदारी घ्यायला असमर्थ आहेत.

हे प्रकरण एवढ्यावरच थांबलेलं नाही तर धारा शाह म्हणजेच अरीहाच्या आईने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार आता अरीहाची रवानगी मती मंद मुलांच्या केंद्रात करण्यात आलीये.

तपासानंतर, अरीहाच्या पालकांवर जे प्राणघातक हल्ल्याचे आरोप झाले होते ते वगळण्यात आले मात्र त्यांच्यावर निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला. पण त्यानंतर ही केस कोणत्याही आरोपाशिवाय बंदही करण्यात आली. तरीही अजूनही अरीहाच्या पालकांना तिचा ताबा मिळू शकलेला नाहीये असं धारा शहा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलय. शिवाय, बर्लिन चाइल्ड सर्व्हिसेसने बाळावरचा पालकांचा हक्क संपुष्टात आणण्यासाठी सिव्हील कस्टडी केस सुद्धा फाईल केलीये आणि यावर कार्यवाही सुरू झालीये

अरीहाचे पालक भावेश आणि धारा शाह आता भारतात परतलेत आणि भारतीय प्रशासनाला मदतीचं आवाहन करतायत. या सगळ्यात महत्वाचा प्रोब्लेम असाय कि त्यांचा वर्क विझा आता 2 महिन्यात एक्सपायर होणारे त्यामुळे अरीहाची कस्टडी कायमची गमावण्याची भीती तिच्या आई वडिलांना अधिक वाटतेय.

अरिहा शाहची आई धारा शाह म्हणाली की, माझा भारत सरकारवर विश्वास आहे, मी विनंती करते की या प्रकरणात पंतप्रधानानी तातडीने हस्तक्षेप करावा.

यावर भारत सरकारचं काय म्हणणं आहे ?

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आम्ही जर्मनीला अरीहाची कस्टडी भारतात आणण्याची विनंती करत आहोत. अरिहाला लवकरात लवकर भारतात पाठवण्यासाठी आम्ही जर्मन अधिकाऱ्यांना विनंती करत आहोत. या बाळाचं भारतात परतण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही बांधील आहोत. गुजरात सरकारने एक पत्र दिलं ज्यात म्हटल की, ती मुलगी भारतीय नागरिक आहे. आम्हाला तिला भारत सरकारच्या देखरेखीखाली ठेवायचय. यासंदर्भात जर्मन न्यायालयाच्या आदेशाची आम्ही वाट पाहतोय.

या केस संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा आता महत्वाचं पाउल उचललं आहे.

गेल्या २१ महिन्यांपासून जर्मनीच्या बर्लिनमधल्या फोस्टर केअर फॅसिलिटीमध्ये अडकून पडलेल्या बेबी अरिहा शहा हिला लवकरच भारतात आणण्यात येईल, असं आश्वासन परराष्ट्र मंत्रालयानं दिलंय आणि यासंदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना पत्र लिहून या प्रकरणी लक्ष घालण्याची विनंती केलीये. त्यामुळे आता यावर काय कारवाई केली जाणारे आणि किती लवकर कारवाई होणारे हे पाहणं महत्वाचं ठरतंय.

 

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.