CBI हे सोन्याचं नाणं स्वित्झरलँडमध्ये शोधतंय पण त्या नाण्याचं हैद्राबाद कनेक्शन निघालं…

ए बंड्या सापडला का रं हंडा! आणखी चांगला खोद आज्यानं जायच्या आधी गाडून ठेवलं असलंच काहीतरी. अशी वाक्य गावामध्ये घराचा पाया किंवा विहिरीचं खोदकाम सुरु असलं कि हमखास कानावर पडतात. यावर मग बंड्या पण बोलतो कुठं बाबा आपलं एवढं नशीब. म्हाताऱ्यानं काही गाडून ठेवायला. 

आता बंड्याच्या आज्यानं काही गाडलं असेल नसेल मात्र हैद्राबादच्या शेवटच्या निजामाने मात्र आपल्या नातवाला एक सोन्याचं नाणं देऊन ठेवलं होतं. आता तुम्ही म्हणाल एवढ्या मोठ्या निजामाने आपल्या नातवाला सोन्याचं नाणं देण्यात कसलं आश्चर्य आलं बुवा.

तर त्यात आश्चर्य हे आहे कि हे नाणं साधंसुधं सोन्याचं नाणं नसून जगातलं सगळ्यात मोठं सोन्याचं नाणं आहे. तब्बल १२ किलो वजनाचं! 

पण निजामाच्या नातवाने हे नाणं लपून छपुन विकण्याचा प्रयत्न केला आणि भारत सरकारच्या तावडीत सापडला. नेमका किस्सा काय आहे ते सविस्तर बघुयात.

कुणीतरी स्विस बँकेतील नाणं गुप्तपणे विकत असल्याची माहिती मिळाली..

काही दिवसांपूर्वी एका व्यक्तीने स्विस बँकेतील आपल्या लॉकर मधून हे नाणं बाहेर काढून चुपचाप विकण्याचा बेत आखला होता. परंतु नाणं विकणाऱ्याने  २० लाख डॉलर अधिकचे मागितल्याने हा करार होऊ शकला नाही. याचदरम्यान या खरेदी विक्रीची माहिती स्वित्झरलँडमधील इंडियन अँबेसीला मिळाली. मग लागलीच भारत सरकारने त्यात हस्तक्षेप केला आणि हा विक्री करार थांबवला. 

आता आपल्याला माहीतच आहे कि स्विस बँकेचा कारभार भलताच गोपनीय असतो. या गोपनीय कारभारामुळे बँकेत कोणाचे अकाउंट आहे आणि कोणाच्या अकाउंट मध्ये काय सामान आहे हे काही सहजासहजी कळत नाही.

यामुळे या नाण्याचं मालक कोण आहे? हे नेमकं कुणालाच माहित नव्हतं पण सीबीआयने मात्र या नाण्याचा इतिहास शोधून काढला आणि याचे मालक निजामाचे नातू मुक्करम जहाँ असल्याचं सांगितलंय. 

सीबीआयने इतिहासाच्या आधाराने मालकाचा छडा लावला..

तर हे इतकं मौल्यवान नाणं तब्बल ४०९ वर्ष जुनं आहे. इ.स. १६१३ मध्ये मुघल बादशाह जहांगीरने आपल्या लष्करी अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी काही बहूमुल्य नाणे काढले होते. या नाण्यांचं प्रत्येकी वजन तब्बल १२ किलो होतं. यामुळे या नाण्यांची आजची किंमत जवळपास १००० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. 

जहांगीरानंतर हे नाणं त्याचा नातू औरंगजेबाकडे आलं. त्यानंतर औरंगजेबाने हे नाणं त्याचा विश्वासू सरदार नवाब गाझीउद्दीन खानला दिलं होतं.

याच गाझीउद्दीन खानचा मुलगा म्हणजेच निजाम-उल-मुल्क-आसफजहाने हैद्राबादच्या निजामशाहीची स्थापना केली होती. यांनतर निजामशाहीत हे नाणं पुढल्या पिढीला देण्याची परंपरा राहिली. यामुळे हैदराबादचे शेवटचे निजाम मीर उस्मान अली खानानंतर त्याचा मोठा मुलगा अजमेत जहाँ आणि त्यानंतर नातू मुक्करम जहाँ यांना हे नाणं मिळालं होतं.

मग आता मुक्करम जहाँना हैद्राबादमध्ये मिळालेलं हे नाणं एवढ्या दूर सातासमुद्रापार स्वित्झरलँडला कसं काय भटकतंय..

तर नाण्याचा स्वित्झरलँड दौरासुद्धा नाण्याच्या इतिहासा इतकाच रंजक आहे..

जेष्ठ पत्रकार शंतनू गुहा रे यांनी मनीकंट्रोल साठी एक लेख लिहिला होता. त्यात त्यांनी सांगितलंय कि, १९७० मध्ये या नाण्याची भारतातून तस्करी झाली होती. व्ही व्ही आयपी लोकांच्या सामानाची सामान्य लोकांच्या सामानाप्रमाणे चेकिंग केली जात नाही. त्यामुळे एका बड्या राजकीय नेत्याच्या माध्यमातून हे नाणं भारताच्या बाहेर पाठवण्यात आलं होतं. असं त्यांनी म्हटलंय.

सीबीआयने या नाण्यासाठी ‘द अँटिक्स अँड ट्रेजर्स ऍक्ट १९७२’ नुसार कारवाई सुरु केली..

त्यांनतर १९८० च्या दशकात नॅशनल आर्ट गॅलरीचे महासंचालक एल पी सिहारे यांनी या नाण्याचा स्वित्झरलँडमध्ये खाजगी लिलाव होत असल्याची शंका व्यक्त केली होती. सिहारे यांच्या संशयावरून  १९८७ मध्ये सीबीआयने या नाण्यासाठी ‘द अँटिक्स अँड ट्रेजर्स ऍक्ट १९७२’ नुसार एफआयआर नोंदवला. त्यांनतर सीबीआयने या प्रकरणाची चौकशी करण्यास सुरुवात केली होती. 

सिहारे यांच्याच प्रयत्नातून १९९५ मध्ये निजामाच्या वस्तूंचा सार्वजनिक लिलाव होण्यापासून वाचला होता. ज्यामध्ये ‘जेकब डायमंड’ या जगातील पाचव्या क्रमांकाच्या न कापलेल्या हिऱ्याचा समावेश होता.

त्यांनतर आता स्वित्झरलँडच्या बर्न येथील राजदूत कार्यालय आणि सीबीआय च्या माध्यमातून या मौल्यवान नाण्याचा लिलाव थांबवण्यात यश आलंय. यामुळे राष्ट्रीय संपत्ती असलेलं हे बहुमूल्य नाणं परदेशी लोकांच्या हातात जाण्यापासून वाचलं आहे. 

निव्वळ या नाण्याचंच नाही तर भारतातील अनेक बहुमूल्य पुरातन वस्तू भारताच्या बाहेर चोरट्या मार्गाने तस्करी केल्या जातात. यात मंदिरांच्या प्राचीन मुर्त्या, जुनी नाणी, राजेशाही आणि पुरात्त्वीक वस्तू यांचा समावेश असतो. या वस्तूंना परदेशात प्रचंड किंमत मिळत असल्याने या वस्तूंची तस्करी केली जाते. 

परंतु भारताने आपल्या राष्ट्रीय संपत्तीला वाचवण्यासाठी प्रयत्न करून या यातील बऱ्याच वस्तू भारतात आणल्या आहेत. तसेच बऱ्याच वस्तू आणण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.

हे ही वाच भिडू 

  

 

 

 

 

 

 

 

 

  

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.