दसवी : मुख्यमंत्र्यांचा घोटाळा, अटक, जेलमधून १० वी पास..!!!

असं म्हणतात ना, माणूस आयुष्यभर विध्यार्थी असतो. कारण शिकण्याला काही वय नसतं. शाळा कॉलेज नंतर ही दुनियादारी बरंच काही शिकवते...सतत नविन शिकण्याची वृत्तीच माणसाला पुढे घेऊन जाते.  त्यामुळे माणसाला कोणत्याही वयात विद्यार्थी बनता आलं पाहिजे…

तुम्ही म्हणाल भिडू किती फिलॉसॉफी झाडतो…मुद्द्यावर ये पटकन..तर मित्रांनो मुद्दा आहे अभिनेता अभिषेक बच्चन च्या ‘दसवी’ पिक्चरचा.

‘दसवी’ चा ट्रेलर आलाय. अगदी ट्रेलरच्या सुरुवातीलाच बातमी ऐकायला मिळते कि, शिक्षक भरतीच्या घोटाळ्यात मुख्यमंत्री गंगाराम चौधरी यांना ज्युडिशल कस्टडीमध्ये ठेवण्यात येणार….गंगाराम चौधरी जेलमध्ये जातात.  तुरुंगवास भोगेपर्यंत आपल्या पत्नीला मुख्यमंत्री बनवतात. तुरुंगात असतांना त्यांना महिला पोलीस अधिकारी भेटते जी चौधरीचा ‘अनपढ-गवार’ म्हणून अपमान करते…

बस्स हाच अपमान जिव्हारी लागल्यावर ८ वी पर्यंत शिकलेले चौधरी १० च्या परीक्षेच्या तयारीला लागतात. चौधरी दहावीच्या परीक्षेची तयारी करतात..परीक्षा देतात. पण नापास होतात..

जरुरी नहीं कीं राजनीती कि समज रखनेवाला, दसवी पढनें कीं समज रखता हो 

राजकारणात मुरलेला माणूस काय अभ्यास करणार ? असं म्हणत त्यांना हिणवलं गेलं पण चौधरी पुन्हा एकदा १० विच्या तयारीला लागतात आणि शेवटी चांगल्या मार्कांनी पास होतात.

आता पिक्चर हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांच्या आयुष्यावर आधारित असल्याचं म्हणलं जातंय. कारण ओमप्रकाश चौटाला यांनीही तिहार तुरुंगात असतांना दहावीची परीक्षा दिली.  

पण ‘दसवी’चे दिग्दर्शक तुषार जलोटा आणि चित्रपटाचे लेखक संदीप लेझेल यांचं म्हणणं आहे कि, आमच्या पिक्चरच्या स्टोरीचा आणि माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचा काहीही संबंध नाही.

पण काहीही म्हणा पिक्चरमधील मुख्यमंत्र्यांची स्टोरी आणि ओमप्रकाश चौटाला यांची स्टोरी सेम टू सेमच आहे.

ओमप्रकाश चौटाला हे देखील शिक्षक भरती घोटाळ्यात अडकतात, तुरुंगात जातात अन तुरुंगातून दहावीची परीक्षा देतात.

कोण आहेत ओम प्रकाश चौटाला ?

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला हे भारतीय राष्ट्रीय लोक दलाचे अध्यक्ष आहेत. ते मूळचे हरियाणाचेच. त्यांचा जन्म १९३५ मध्ये हरियाणातील सिरसा येथील एका छोट्या गावात झाला. त्याच गावात त्यांचे ८ वी पर्यंतचे शिक्षण झाले.  त्यांचे वडील चौधरी देवी लाल हे देखील माजी उपमुख्यमंत्री होते. 

ओम प्रकाश चौटाला हे १९७०- १९९०- १९९३- १९९६ असे सलग पाच वेळा हरियाणा विधानसभेचे सदस्य राहिले आहेत. १९८९ मध्ये ते पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यानंतर १९९०, १९९१ आणि १९९९ मुख्यमंत्रीपदाची निवडणूक जिंकली होती

आता सत्य गोष्ट अशी आहे की,

१९९९- २००० साली १८ जिल्ह्यांत ३२०६ ज्युनियर बसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांची भरती करण्यात आली होती. यावेळी भरतीतील निकषांकडे दुर्लक्ष करून मनासारख्या उमेदवारांच्या भरती प्रकरणी  चौटाला यांच्याबरोबर ५५ जणांवर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश विनोद कुमार यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरलेल्या ५५ लोकांपैकी १० जणांना शिक्षा सुनावली होती.

यात १० वर्षांची शिक्षा सुनावणाऱ्यांमध्ये ओमप्रकाश चौटाला, त्यांचा मोठा मुलगा अजय चौटाला आणि आयएएस अधिकारी संजीव कुमार, चौटाला यांचे माजी विशेष अधिकारी विद्याधर आणि तत्कालीन आमदार शेरसिंह बादशमी  त्यांचा समावेश होता. तर बाकी आरोपींमधल्या एकाला ५ वर्षाची तर बाकीच्यांना ४-४ वर्षाची शिक्षा सुन्यावण्यात आली होती. चौटाला यांनी २०१३ ते जुलै २०२१ पर्यंत शिक्षा भोगली.

ज्यावेळी ते ८२ वर्षांचे होते….

चौटाला यांनी २०१७ मध्ये तिहार तुरुंगात कैद्यांसाठी स्थापन केलेल्या परीक्षा केंद्रामध्ये दहावीची परीक्षा दिली होती. निकाल लागला आणि त्यांनी ५३.४% मार्क मिळवले होते. एकूण ५०० मार्कांपैकी २६७ गुण मिळाले होते. सामाजिक विज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान, हिंदी, भारतीय संस्कृती आणि वारसा आणि व्यवसाय असे सगळे पेपर त्यांनी हिंदी माध्यमातून दिले होते. मात्र इंग्रजी विषयात ते नापास झाले होते.

इतकं करूनही ते थांबले नाहीत तर त्यांनी शिक्षा भोगून बाहेर आल्यानंतर बारावीच्या बोर्डाची परीक्षा दिली.  पण १० विच्या इंग्रजीमध्ये ते पास झाले नव्हते. म्हणून त्यांनी पुन्हा एकदा ऑगस्ट २०२१ मध्ये इंग्रजीचा पेपर दिला आणि त्यांनी ८८ मार्क घेत या परीक्षेत पास झाले. 

तेंव्हा ते ८६ वर्षांचे होते  

जसं की सुरुवातीला आपण बोललो त्याप्रमाणे माणूस आयुष्यभर विध्यार्थी असतो. शिकायला वय मॅटर करत नाही हे ओम प्रकाश चौटाला यांनी मात्र सिद्ध करून दाखवलंय.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.