चिमुरच्या लोकांनी इंग्रजांशी लढा दिला आणि देश स्वतंत्र होण्याच्या आधीच गावाला स्वतंत्र केलं

देशभरात सगळीकडे स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जातोय. हर घर तिरंगा अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरावर तिरंगा झळकतोय. ही झाली देशाला स्वातंत्र्य मिळाल्याच्या ७५ वर्षांनंतरची गोष्ट. परंतु देश स्वतंत्र होण्याच्या आधीच महाराष्ट्रातील एका गावाने ब्रिटिशांचं राज्य झुगारून लावलं  होतं. 

महाराष्ट्रातील एका गावातल्या लोकांनी ब्रिटिशांच्या विरोधात लढा दिला आणि गावात फडकणारा युनियन जॅक खाली उतरवून त्याजागी तिरंगा झेंडा फडकावला होता. तिरंगा फडकावून गावकऱ्यांनी गावाला ब्रिटिशांच्या पारतंत्र्यातून मुक्त केलं आणि भारतातील पहिलं स्वतंत्र गाव म्हणून इतिहासात नोंद केली होती. 

ते ऐतिहासिक गावं म्हणजेच चंद्रपूर जिल्ह्यातलं चिमूर..!!

चंद्रपूर जिल्ह्यातील १५-२० हजार लोकसंख्या असलेल्या चिमूर शहराला महाराष्ट्रात फारसं ओळखलं जात नाही किंवा चिमुरचा इतिहास सुद्धा कुणाला माहित नाही. परंतु स्वातंत्र्यपूर्व काळात चिमूर गावातले गावकरी स्वातंत्र्यासाठी प्राणपणाने झुंजले होते.

देशाला स्वातंत्र्य मिळण्याच्या ५ वर्षाआधीच १६ ऑगस्ट १९४२ मध्ये चिमुरकरांनी गावाला स्वतंत्र केलं होतं आणि सलग तीन दिवस ब्रिटिशांच्या राज्याला त्यागून स्वातंत्र्य अनुभवलं होतं.

परंतु चिमुरसारख्या एका छोट्याशा गावातील लोकांनी ब्रिटिशांच्या सर्वशक्तिमान साम्राज्याला ललकरण्याचं धाडस केलं होतं ते तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारी भजनांमुळे…..

तुकडोजी महाराजांची खंजिरी वाजली आणि त्यांची भजनं वाऱ्यासारखी पसरत गेली….

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्या समाजप्रबोधनपर भजनांसाठी ओळखले जातात. महाराजांनी समाजसुधारणे सोबतच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सुद्धा लढा दिला होता. तुकडोजी महाराजांनी आपल्या प्रतिभेने अनेक क्रांतिकारी भजनांची रचना केली.

महाराज फक्त भजनांची रचना करून थांबणारे नव्हते. त्यांनी आपल्या खंजीऱ्या हातात घेतल्या आणि आपल्या भजनांना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली.

“झाड झडुले शस्त्र बनेंगे, भक्त बनेगी सेना…. पत्थर सारे बॉम्ब बनेंगे, नाव लगेगी किनारे….”

“जाग उठो बालविरो अब तुम्हारी बारी है….”

तुकडोजी महाराजांच्या या भजनांमुळे अमरावती जिल्ह्यातील आष्टी, वर्धा जिल्ह्यातील आष्टी आणि चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर या तीनही गावांमधील लोकं स्वातंत्र्यासाठी पेटून उठले. लोकांनी स्वातंत्र्य लढा देण्यासाठी पूर्ण तयारी केली.

तुकडोजी महाराजांच्या भजनांनी स्फुरण चढले आणि महात्मा गांधींनी चले जावचा नारा दिला.

आधीच तुकडोजी महाराजांच्या क्रांतिकारी भजनांनी लोकं स्वातंत्र्यासाठी पेटून उठले होते. त्यात भरीस भर पडली ती महात्मा गांधींच्या चाले जाव आंदोलनाची. ८ ऑगस्ट १९४२ मध्ये महात्मा गांधी यांनी चले जाव आंदोलनाला सुरुवात केली.

शांततेच्या मार्गाने लढणाऱ्या महात्मा गांधींनी आता करा किंवा मराचा नारा दिला होता. महात्मा गांधी आणि तुकडोजी महाराजांमुळे प्रेरित झालेल्या चिमुरकरांनी १२ ऑगस्टपासून स्वातंत्र्यलढ्याची तयारी करण्याची सुरुवात केली. क्रांतिकारकांच्या गुप्त बैठका व्हायला लागल्या. 

 अन मुहूर्त ठरला नागपंचमीचा…

गुप्त बैठकांमध्ये १६ ऑगस्ट १९४२ ला नागपंचमीचा मुहूर्त ठरवण्यात आला. नागपंचमीच्या दिवशी चिमुरमध्ये मोठी प्रभातफेरी काढण्यात आली. गोपाळराव कोरेकार यांच्या नेतृत्वात जुन्या बस स्टॉप पासून प्रभात फेरीला सुरुवात झाली आणि फेरी नागमंदिराकडे जायला लागली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिश राजवटीच्या विरोधात घोषणा देत देत प्रभात फेरी निघाली. प्रभात फेरीत सखाराम माट्टेवार, दादाजी किरीमर, श्रीराम बिगेवार, बाबुलाल झिरे, गणपत खेडकर, मारुती खोबरे ही क्रांतिकारक मंडळी प्रभात फेरीत किरहीरीने सहभागी झाली होती.

हातात तिरंगा घेऊन घोषणा देत निघालेली प्रभात फेरी चिमूरच्या अभ्यंकर मैदानात पोहोचली. प्रभात फेरी मैदानात पोहोचल्यानांतर सैनिक सतर्क झाले. सैनिकांनी क्रांतिकारकांच्या हातातील तिरंगी झेंडे हिसकावून घेतले. तसेच त्यातील १२ क्रांतीकारकांना अटक केली.

सैनिकांनी क्रांतीकारकांना अटक केली अन् क्रांतीची ठिणगी पडली. 

अभ्यंकर मैदानात क्रांतीकारकांना अटक केल्यांनतर सगळे आंदोलनकर्ते पेटून उठले. पेटून उठलेल्या आंदोलनकर्त्यांनी चार ब्रिटिश अधिकाऱ्यांना डाक बंगल्यात कोंडलं आणि डाक बंगल्याला आग लावली.  तर बाकी सैनिकांना पिटाळुन लावलं.

डाक बंगल्याच्या आगीत अधिकारी ठार झाले आणि बाकी सैनिकांना पळवून लावल्यामुळे गावात ब्रिटिश सैनिक उरलेच नाही. गावात सैनिक नसल्यामुळे गावकऱ्यांनी चिमूरच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

स्वातंत्र्याची घोषणा केली मात्र हे स्वातंत्र्य केवळ तीनच दिवस टिकले.

१६ ऑगस्ट १९४२ ला चिमूर ब्रिटिशांच्या राज्यातून मुक्त झाले असे घोषित केले. समोरचे तीन दिवस चिमुरमध्ये ब्रिटिश सैनिकांचा मागमूस नव्हता. मात्र जेव्हा ही बातमी चांद्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना कळली तेव्हा त्यांनी चांद्यासह नागपूरमधून ब्रिटिश सैनिकांना चिमुरला पाठवण्याची योजना बनवली.

स्वतः चांद्याचे जिल्हाधिकारी सुब्रमण्यम हे ४२ गाड्यांमध्ये ब्रिटिश सैनिक घेऊन चिमुरात दाखल झाले. त्यांनी आंदोलनकर्त्यांनी जाळून खाक केलेला डाक बंगला, दवाखाना आणि पोलीस स्टेशनची पाहणी केली. 

त्यांनंतर आंदोलनकर्त्यांच्या ताब्यात असलेले चिमूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामशंकर शर्मा आणि ठाण्याचे प्रधान प्रसाद यांना मुक्त केलं. त्यानंतर चिमुरमध्ये कलम १४४ लागू करून जमावबंदी लागू केली.

ब्रिटिश सैनिकांनी गावावर अत्याचार केले आणि १.५ लाखाचा दंड ठोठावला

जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी लागू केल्यांनतर सैनिकांनी आंदोलन करणाऱ्या अख्ख्या गावावर अत्याचार करण्यास सुरुवात केली. त्यात सैनिकांनी अनेक महिलांवर बलात्कार केले. संपूर्ण गावाला ताब्यात घेतलं आणि या उठावाची शिक्षा म्हणून गावकऱ्यांवर दिड लाखाचा दंड ठोठावला.

आंदोलनादरम्यान ब्रिटिश सैनिकांनी केलेल्या गोळीबारात चिमूर शहरातील ९ क्रांतिकारक शाहिद झाले आणि क्रांती दडपल्यानंतर क्रांतीचे प्रेरणास्थान असलेल्या तुकडोजी महाराजांना अटक करण्यात आली.

महाराजांना झालेल्या अटकेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी बोल भिडूने गुरुकुंज मोझरी येथील अभ्यासक आणि पत्रकार अमोल उमप यांच्याशी संपर्क साधला.

बोल भिडूशी बोलतांना अमोल उमप यांनी सांगितलं.

“चिमुरची क्रांती ही ऐतिहासिक क्रांती होती. अमरावती जिल्ह्यातील आष्टी मधून सुरु झालेली ही क्रांती वर्धा जिल्ह्यातील आष्टी मार्गे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमुरला पोहोचली. चिमूर क्रांतीने स्वातंत्र्य मिळवले मात्र जेव्हा ही क्रांती दडपण्यात आली तेव्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्यावर दोष टाकण्यात आला. त्यामुळे महाराजांना अटक करण्यात आली होती.” असे अमोल उमप यांनी सांगितलं.

पुढे उमप सांगतात की, “राष्ट्रसंतांना अटक केल्यांनतर चार महिने तुरुंगात ठेवण्यात आले. त्यांना पहिल्यांदा नागपूर तुरुंगात ठेवले गेले मात्र तिथे उठाव होण्याची शक्यता असल्यामुळे त्यांना रायपूरच्या तुरुंगात पाठवण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या क्रांतिकारी भजनांवर बंदी सुद्धा घालण्यात आली होती.” असे अमोल उमप यांनी सांगितलं.

जेलमधून बाहेर पडल्यावर सुद्धा तुकडोजी महाराजांना २ वर्ष ९ महिन्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. सगळ्यांना अटक झाली, अनेक जण शाहिद झाले, अत्याचार सोसले, दिड लाखाचा दंड सोसला आणि चिमूरच्या लोकांनी स्वातंत्र्यलढा इतिहासात अमर केला.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.