भारताला एकदम मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड अवॉर्ड मिळणे हा काय योगायोग नव्हताच
९० च दशक तुम्हाला आठवत नसेल तर आपल्या मोठ्या बहीण-भावांना आठवतच असणार…याच दरम्यान घरोघरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही जाऊन कलर टीव्ही आलेत. घरोघरी टू-व्हीलर दिसून लागल्या…पण आणखी एक बदल घडला तो म्हणजे आपल्या आया-बहिणी ब्युटी – प्रॉडक्ट्स वापरायला लागल्या होत्या. तुम्हाला घरच्या गप्पांमध्ये कित्येकदा आईचं असं वाक्य कानावर पडलं असणारे कि, आमच्या लग्नातला मेकअप म्हणजे पावडर लावणे !!!
पण अचानक मेकअप हा प्रचंड मोठ्ठा विषय नेमका सुरु कधी झाला?? यामागे खुप मोठं आर्थिकेतचं राजकारण आहे…तुम्ही म्हणाल आता मेकअप मधेही राजकारण कुठून आलं ? त्याचं उत्तर म्हणजे हा संपूर्ण लेख!
१९९० च्या दशकात भारतात आर्थिक उदारीकरण सुरु झालं याचा इतिहास साक्षिदार आहे. याच काळात आणखी एक महत्वाची घटना म्हणजे, भारताच्या सौंदर्य स्पर्धेत झालेला सहभाग…या दशकात सौंदर्यवतींनी ‘किताब जिंकण्याची एक मालिकाच सुरु केलेली.
भारताच्या सौंदर्यवतींनी ९० च्या दशकात सौंदर्य विश्वात जे वादळ निर्माण केले होते, त्याची सुरुवात प्रत्यक्षात १९६६ साली होती. मुंबईची रिटा फारिया ही वयाच्या २३ व्या वर्षी १९६६ मध्ये जागतिक सौंदर्याचा किताब जिंकणारी भारतीय आणि आशियाई वंशाची पहिली महिला ठरली होती. त्यानंतर १९९४ चं साल विशेष महत्वाचं ठरलं. या एकाच वर्षात ऐश्वर्या रायने मिस वर्ल्डची स्पर्धा जिंकली होती तर त्याच वर्षी सुष्मिता सेनने मिस युनिव्हर्सची स्पर्धा जिंकली होती. त्याच दशकात १९९७ मध्ये डायना हेडनने मिस वर्ल्डचा ‘किताब मिळवला. तर १९९९ मध्ये युक्ता मुखी हिच्यामुळे भारताला चौथ्यांदा मिस वर्ल्डचा किताब मिळाला होता. तर २००० साली प्रियांका चोप्राने मिस वर्ल्डचा किताब जिंकला होता, तर त्याच वर्षी लारा दत्ताने २००० या वर्षी मिस युनिव्हर्सचा ताज जिंकला होता.
पण याच दशकात झालेले आर्थिक उदारीकरण आणि आणि भारताने जिंकलेले दोन मिस युनिव्हर्स मुकुट आणि चार मिस वर्ल्ड मुकुट याचा खूप जवळचा संबंध आहे.
पण जेंव्हा सुष्मिता सेन आणि ऐश्वर्या राय यांना अनुक्रमे मिस युनिव्हर्स आणि मिस वर्ल्डचा मुकुट देण्यात आला होता. तेंव्हाच सगळ्या जगाचं लक्ष भारताकडे वळलं. पण असाही बोललं जातं कि, आधीच जागाच लक्ष भारताकडे लागून होतं म्हणून हे दोन्ही ‘किताब भारताला एकाच वर्षी मिळाले. असो हि थिअरी सोडली तर तत्कालीन परिस्थिती समजून घेणे महत्वाची आहे. सुष्मिता आणि ऐश्वर्याच्या आधीही रिटा फारियाने याची सुरुवात केलीच होती. त्यामुळे भारतामध्ये थोडंफार का होईना ह्या सौंदर्य स्पर्धा भारताला ओळख मिळवून दिली होती.
१९९१ मध्ये भारत देशाने आपली अर्थव्यवस्था परदेशी कंपन्यांसाठी खुली केल्यानंतर केवळ तीन वर्षांनी भारताने बिग फोर आंतरराष्ट्रीय सौंदर्य स्पर्धांमध्ये जंगी प्रवेश केला आणि आर्थिक वाढ वाढवण्याची क्षमता दाखवली होती.
आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारतीय सौंदर्यवतींनी मिळवलेल्या विजयामुळे भारतातील सौंदर्यप्रसाधनांची लोकप्रियता आणि विक्री वाढली, असे सर्वच मानतात. १९९६ मध्ये भारतात झालेल्या मिस वर्ल्ड स्पर्धेनंतर आणि गोदरेजने प्रायोजित केलेल्या या स्पर्धेनंतर भारतीय सौंदर्यप्रसाधने उद्योगाची भरभराट वाढ झाली.
आणि तेंव्हापासूनच, भारतीय सौंदर्यप्रसाधनांच्या उद्योगाने झेप घेतली आहे.
पण हे सगळं मार्केट सुरु झालं ते १९९४ पासूनच….जेंव्हा भारताला मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्डचे ‘किताब मिळाले तेंव्हा संपूर्ण जग आपले सौंदर्य उत्पादनं भारतामध्येविकण्याचा एक मोठा मार्केटिंग प्लॅन घेऊन मैदानात उतरले. त्यानंतर भारतात एक वास्तविक सौंदर्य उद्योग तयार झाला आहे. या सौंदर्य कारखान्याच्या आसपास पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि मार्केटिंगची काळजी घेणारा संपूर्ण उद्योगच उभा राहिला.
याच आर्थिक उदारीकरणाच्या धोरणानंतर अनेक आंतरराष्ट्रीय ब्युटी ब्रँड्स भारतात आले. सोबतच, भारतीय सौंदर्य प्रसाधनांचा बाजार विस्तारत गेला. १९९९ मध्ये, भारतीय सौंदर्य प्रसाधने बाजार १९९८ वर्षीच्या तुलनेत ८% वाढला. २००१ मध्ये सध्याच्या मूल्याच्या अटींमध्ये ८.७ % वाढ झाली, ज्याची किंमत रु.१ २६ अब्ज होती. १९९५ पासूनचे एकूण मूल्य सध्याच्या अटींमध्ये५४ % होते, स्थिर अटींमध्ये २५ % इतके आहे.
यामागे थोडक्यात अशी परिस्थिती अशी कारणीभूत होती कि, लोकांमध्ये दिसण्याबाबतची जागरूकता वाढली होती आणि फॅशन वेड देखील वाढलं होतं. त्यामुळे बाहेरील देशांमधले हर्बल आणि चांगल्या क्वालिटीची हमी असलेल्या कॉस्मेटिक उत्पादनांची मागणी वाढू लागली.
आणि याचाच परिणाम म्हणजे, भारतातील सौंदर्य प्रसाधन उद्योगात वाढ झाली.
२०१६ च्या नोव्हेंबर महिन्यात “इंडिया कॉस्मेटिक मार्केट ओव्हरव्ह्यू” रिसर्च अँड मार्केट्सच्या अहवालानुसार, पाच वर्षांच्या कालावधीत देशातील कॉस्मेटिक मार्केट कसं उलाढाल करत गेलं याची आकडेवारी दिली गेली. त्यानुसार, २००८ ते २०१६ या कालावधीत भारताच्या कॉस्मेटिक आणि ग्रूमिंग मार्केटने बिलियनच्या घरात उलाढाल केल्याचं स्पष्ट झालं होतं. तर २०१७-१८ मध्ये ८० हजार कोटींच्या घरात होती.
या सौंदर्यप्रसाधनांचा प्रभाव हा थोड्या बहुत फरकाने का होईना पुरुष गटांवर देखील पडला. मागे एका अहवालात असं ठळकपणे दिसून आले आहे की, किशोरवयीन मुलांमध्ये सौंदर्यप्रसाधनांच्या वापराचे प्रमाण २००५ ते २०१५ या दरम्यान बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढले होते.
“मुलींप्रमाणे आपणही चांगलं दिसावं” अशा इच्छेपोटी पुरुषांमध्ये सौंदर्यप्रसाधनांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
या अहवालानुसार ६८% पेक्षा जास्त तरुणांना असे वाटतं की, ग्रूमिंग उत्पादने वापरल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. मोठ्या शहरांमधील सुमारे६२ % तरुण ग्राहक ऑनलाइन सौंदर्य आणि ग्रूमिंग उत्पादने खरेदी करण्यास प्राधान्य देतात तर ४५% ग्राहक एकाच दुकानाऐवजी त्यांच्या सोयीच्या कोणत्याही दुकानातून सौंदर्यप्रसाधने आणि कपडे खरेदी करतात.
तसेच, भारतीय पुरुषांमध्ये चांगले दिसण्याची आकांक्षा वाढत आहे, ज्यामुळे भारतीय पुरुषांच्या ग्रूमिंग मार्केटमध्ये गेल्या पाच वर्षांत ४२ % पेक्षा जास्त वाढ झाली आहे. भारतातील एकूण, पर्सनल केअर प्रॉडक्ट्स आणि सौंदर्य उद्योगाच्या वाढीच्या दरापेक्षा ही वाढ अधिक वेगवान असल्याचे या अभ्यासातून पुढे आले आहे.
“गंमत म्हणजे, १८ ते २५ या वयोगटातील पुरुष भारतातील स्त्रियांपेक्षा ग्रूमिंग आणि पर्सनल केअर प्रॉडक्ट्सवर जास्त पैसे खर्च करतात,”
यामध्ये काही ग्राहक क्वालिटी पाहतात तर काही किंमतीचा विचार करून प्रॉडक्ट्स खरेदी करत असतात. मात्र अलीकडील काळात पुरुष आणि स्त्रिया दोन्ही गट ‘ब्रॅण्ड्स’ प्रायॉरिटी देतात.
यामध्ये अलीकडच्या काळात पुढे आलेले काही स्वदेशी ब्रॅण्ड्स जसे कि, हिंदुस्तान युनिलिव्हर, पतंजली, आयुष, खादी इत्यादी ब्रँड सोडले तर मार्केट मध्ये आजही परदेशी ब्रॅण्ड्सची मागणी तितकीच जास्त असते. परदेशी ब्रँडही नैसर्गिक उत्पादनांमध्ये उतरले आहेत. फ्रेंच कॉस्मेटिक्स ब्रँड L’Oreal असो इतर कोणताही परदेशी ब्रँड असो सर्वांनीच ब्रँड अंतर्गत आयुर्वेदिक साबण, शाम्पू, कंडिशनर, तेल आणि क्रीम आणि मेकअप प्रॉडक्ट्स देखील आणले आहेत.