पुण्याच्या त्या घरात मेलेली कुत्री, घाण वास व सोबत २ वर्ष कोंडून ठेवलेला तो मुलगा..

पुण्याच्या कोंढवा भागातली कृष्णाई बिल्डिंग. पुण्याच्या कोणत्याही चौकात, कोणत्याही पेठेत असती तशीच ही बिल्डींग. बिल्डींगमध्ये असणारे प्लॅट आणि बिल्डींगच्या खाली असणारी काही दुकान..

सरळ साधं वाटणार दृश्य. तस पाहिलं तर कोणाला शंका येण्याचं किंवा काही विचित्र वाटण्याचं काहीच कारण नव्हतं. 

पण या सगळ्या वातावरणात एका माणसाला एक गोष्ट खटकत होती. तो होता इथला दुकानदार. या दुकानदाराला बिल्डिंगमधल्या एका खिडकीत एक मुलगा कुत्र्यांसोबत बसलेला दिसायचा.

११ वर्षांचा तो पोरगा कधी बिल्डिंगमधल्या मुलांसोबत खेळताना दिसला नाही की कधी गोळ्या बिस्किट घेण्यासाठी दुकानात जाताना दिसला नाही. कधी दिसलाच तर तो फक्त खिडकीत. काहीतरी खटकत होतं. या दुकानदाराने धाडस करुन १ मे रोजी पुण्याच्या क्षेत्रीय कार्यालयात तोंडी तक्रार दिली. मात्र इथे काहीच झालं नाही. शेवटी माहिती घेवून त्याने चाईल्ड लाईफ संबधित एका संस्थेला माहिती दिली..

४ मे रोजी चाईल्ड लाईफचं काही लोक या बिल्डिंगमध्ये दाखल झाले.

आजूबाजूला चौकशी केली तर समजलं की त्या कुटूंबासोबत कोणाचाच संपर्क नाही. कारण काय तर त्यांच्याकडे खूप दुर्गंधी येते. काय करतात, काय खातात काही माहित नाही. दोन वर्षांपासून त्या मुलाला कुठे बाहेर पाहिलेलं देखील नाही..

प्लॅटच्या बाहेर गेल्यानंतर फ्लॅटला बाहेरून लॉक असल्याचं लक्षात आलं. चौकशीत समजलं की एक जोडपं आहे, ते कधीही येत आणि कधीही बाहेर जातं. चाईल्ड लाईफवाल्यांनी जोडप्याची वाट पाहत तिथचं थांबण्याचा निर्णय घेतला.

तास दिड तास गेला आणि संबंधित जोडपं आलं. त्यांच्यासोबत फ्लॅटमध्ये गेल्यानंतर दिसणारं दृश्य भयानक होतं..

कारण फ्लॅटमध्ये एकदोन नाही तर तब्बल २२ कुत्रे होते. त्यातील चार कुत्रे तिथेच मृतावस्थेत पडली होती. घरातच कुजून त्यांचा वास येत होता. ठिकठिकाणी मांसाचे तुकडे पडले होते. कुत्र्यांना खायला देणाऱ्या गोष्टी अस्थावस्त पडलेल्या होत्या. अन् एका कोपऱ्यात तो ११ वर्षांचा मुलगा होता.

अस सांगितलं जातय की या मुलाच्या जवळ गेल्यानंतर तो देखील एखाद्या कुत्र्याप्रमाणेच त्याचं वागणं होतं. सर्वसामान्य ११ वर्षाचा मुलगा जे करतो त्याच्या पुर्णपणे उलट हा प्रकार होता. त्यानंतर या जोडप्याबरोबर बोलणं झालं. आपण केलं ते चुकीचं असून जोडप्याने चुक मान्य केली. त्या मुलाच्या आईवडिलांच समुपदेश करुन आत्ता सगळं सुरळीत होईल या विचाराने चाईल्ड लाईफची लोकं परत गेली..

मात्र या कुटूंबाने खरच बदल केला का? समुपदेशन करुन काय फायदा झाला का? यासाठी पुन्हा चाईल्ड लाईफवाल्या लोकांनी हे घर गाठलं. ती तारीख होती ९ मे. आजही तिच स्थिती होती अन् त्याच गोष्टी चालू होत्या.

ते पाहूनच आई वडिलांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला, अन या प्रकाराची बातमी प्रसिद्ध झाली..

नेमकं काय सांगण्यात आलं…  

कोंढव्यात राहणारे हे जोडपं आपल्या मुलासोबत गेल्या ७ वर्षांपासून कृष्णाई बिल्डिंगमध्ये रहात होतं. या जोडप्याचं लग्नचं मुळात “डॉग लव्हर” असल्याने झालं. त्यातूनच या जोडप्याने आपल्यासोबत २० ते २२ भटकी कुत्री संभाळली. इथपर्यन्त काहीच चुकीचं नव्हतं. मात्र त्यांनी या कुत्र्यांना ना कधी घराबाहेर काढलं ना आपल्या मुलाला कधी घराबाहेर नेलं. गेली दोन वर्ष कुत्र्यासोबतच हे तिघेही रहायचे.

काही कामानिमित्त बाहेर पडायचे आणि पुन्हा घरी परतायचे. मात्र हा मुलगा गेली दोन वर्ष याच २०-२२ कुत्र्यासोबत रहात होता. शेजारच्या लोकांनी सांगितलय की, आम्हाला खिडकीतून कधी हा मुलगा दिसायचा तेव्हा तो कुत्र्याप्रमाणेच चार पायांवर चालायचा. या सगळ्या प्रकारात कुठेही स्वच्छता नव्हती. एखाद्या उकिरड्याप्रमाणे उष्ट अन्न, मासांचे तुकडे व घरात मेलेल कुत्रे व दुर्गंधी यांच्यासोबत हे कुटूंब रहात होते.

या मुलाने व त्यांच्या कुटूंबाने कधीच अंघोळ केली नव्हती. जेव्हा मुलाला रेस्क्यु करण्यात आलं तेव्हा तो मुलगा आकाश पाहून हारकला होता. आकाशाकडे पाहतं हे भारी आहे म्हणू लागल्याचं उपस्थित सांगतात..

कुटूंब काय करत होतं..

या मुलाचे वडील अशिक्षित आहेत. ते पुर्वी सेल्समन म्हणून काम करत होते. ५ वर्षांपूर्वी त्यांनी एक कपड्याचं दुकान सुरू केल्याचं देखील सांगण्यात येतं. मात्र कोरोना आला आणि हे दुकान बंद झालं. मुलाची आई उच्चशिक्षित आहे मात्र ती कोणतही काम करत नाही. त्या घरात कोणी पैपाहूणे कधी आले नाहीत की शेजारचे देखील कधी गेले नाही. घरातून दुर्गंधी येत असल्याने कायमच लोकांनी त्यांच्यापासून अंतर ठेवणं योग्य समजलं. अन् या गोष्टीचा तोटा झाला तो त्या मुलाच्या आयुष्याचा.

या संपुर्ण प्रकाराबाबत बोल भिडूशी बोलतांना ज्ञान देवी चाईल्ड लाईफच्या संचालिका अनुराधा सहस्रबुद्धे म्हणाल्या की,

१ बीएचके घर, आई वडील, ११ वर्षांचा मुलगा आणि २२ कुत्रे असे त्यांचे कुटुंब होते. कोरोना नंतर त्यांनी आपल्या मुलाला भटक्या कुत्रांबरोबर डांबून ठेवले होते. त्या मुलाचा वावर नेहमी कुत्रांबरोबरच असल्याचे त्याचे वागणे तसेच झाले होते. 

शाळेतील मुलांवर कुत्र्याप्रमाणे धावून जाणे, त्यांना चावणे यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात आले. यानंतर या मुलाला त्या दाम्पत्याने घरातच डांबून ठेवले होते. मुलाने दोन वर्षानंतर आकाश बघितल्या नंतर किती भारी दिसतंय असं सांगितले. त्या दाम्पत्यासाठी त्यांचा मुलगा आणि कुत्रे त्यासाठी सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले. 

त्यामुळे मागचे २ वर्ष बाहेरच काहीच पाहिलं नव्हतं. त्याला अंघोळ का केली नाही, तोंड का धुतले नाही असे विचारल्यावर त्याने हे काही रोज करण्याचे काम आहेत का असा प्रश्न उलट विचारला. इतके दिवस कुत्र्यांसोबत राहिल्याने मुलावर दुष्परिणाम झाला आहे. मुलाला डांबून कुठं जायचे हे पोलीस तपासात समोर येईल.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये बाल न्याय अधियनियम २००० अंतर्गत गुन्हा दाखल केल्याचं सांगण्यात आलं आहे. चाईल्ड ॲण्ड वुमन डेव्हलपमेंट कमिटी समोर या घटनेची माहिती देवून त्यानंतर मुलाच्या भविष्याच्या हेतून समुपदेश व पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.