तुमचं प्रेम भलेही चिरतरुण असेल पण प्रेमाचं प्रतीक असलेला आयफेल टॉवर गंजत चाललाय..

२०१९ चं टोकियो ऑलिंपिक कोविड मुळं असंख्य नियमांच्या अधीन राहून कसंबसं पार पडलं. आता २०२४ मध्ये जगात लोकप्रिय असणार्‍या ऑलिंपिक खेळांच आयोजन फ्रान्स च्या पॅरिस शहरात करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने फ्रान्स ने जोरदार तयारी सुद्धा चालू केल्याचं पाहायला मिळतय.

पॅरिस म्ह्टल्यावर आपल्या डोळ्यापुढं उभा राहतो तो म्हणजे तिथला आयफेल टॉवर. 

जगातल्या ७ आश्चर्यापैकी एक असणारा आणि जगभरातल्या प्रेमियूगुलांच प्रतिक असलेला फ्रान्सचा आयफेल टॉवर स्थापत्य शास्त्राचा एक उत्तम नमुना आहे.

जगभरातले प्रेमी पॅरिस ला येऊन आयफेल टॉवर समोर आपल्या प्रेमाच्या आणाभाका घेत असतात. आयफेल टॉवर प्रमाणेच आपलं प्रेम दिवसेंदिवस उत्तुंग होत जाईल अशी या जोडप्यांची प्रेमळ कम भाबडी अपेक्षा असते.

२०२४ ला जगभरातून लोक पॅरिसला ऑलिंपिक खेळ बघायला येणार आहेत म्हटल्यावर ते आयफेल टॉवर बघायला जाणार ह्यात काय शंकाच नाही. म्हणून फ्रान्स प्रशासनाने या टॉवरची देखभाल करायला सुरुवात केलीये. फ्रान्स मधल्याच एका नियतकालिकातून एक धक्कादायक माहिती लिक झालीये.

आयफेल टॉवरला मोठ्या प्रमाणात गंज चढलाय आणि हळू हळू त्याची झीज व्हायला लागलीये.

त्यामुळे फ्रान्स प्रशासन आता खडबडून जागं झालय आणि त्यांनी टॉवरच्या देखभालीला सुरुवात केलीये. फ्रान्स नियतकालिक मैरिएनच्या एका लिक झालल्या रिपोर्ट नुसार संपूर्ण १०६३ फुटांचा आयफेल टॉवरच गंजून गेलाय संपूर्ण टॉवरलाच मेंटेनन्सची गरज आहे. नुसती वरचेवर पेंटिंग करून चालणार नाही तर चांगल्या प्रकारे देखभाल करणं जास्त गरजेचं आहे.

आयफेल टॉवर चं बांधकाम १८८९ मध्ये पूर्ण झालं. फ्रांस राज्यक्रांती ला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदात ह्या टॉवरची निर्मिती केली गेली होती. हा टॉवर सुरूवातीला फक्त २० वर्षांसाठी ठेवण्यात येणार होता. पण पुढे पर्यटकांच्या प्रेमाखातर हा टॉवर कायम स्वरूपीसाठी ठेवला गेला.

हा टॉवर बनवत असताना सरकारने काही अटी घातल्या होत्या. 

टॉवरची ऊंची ३०० मीटर पर्यंत असावी, टॉवर पुर्णपणे लोखंडाचा असायला हवा. 

टॉवरच्या चारही मुख्य खांबांमधील अंतर १२५ मीटर एवढं असलं पाहिजे. आता ह्या प्रस्तावावर त्यावेळी जवळपास १०७ इंजिनियर्स ने आपलं डिझाईन सरकारला सादर केलं, आणि त्यातून ‘गुस्ताव आयफेल’ या फ्रेंच सिव्हिल इंजिनियरच्या डिझाईनला सरकार कडून मान्यता देण्यात आली. त्यानंतर एका भाषणात बोलताना गुस्ताव आयफेल असे म्हणाले की,

हा टॉवर बांधून पूर्ण झाल्यानंतर ही फ्रांसची ओळख बनून जाईल 

आणि झालं सुद्धा तसच. अखंड मेहनत घेऊन त्यांनी या टॉवरचं काम पूर्णत्वास नेलं आणि १८८९ साली हा टॉवर दिमाखात उभा सुद्धा राहिला. त्यानंतर जगभरताले पर्यटक इथे हा टॉवर बघण्यासाठी येऊ लागले. दरवर्षी  जगभरातून सुमारे ७० लाख प्रवासी या टॉवरला भेट देण्यासाठी येत असतात. 

गुस्ताव आयफेल यांच्या अथक प्रयत्नांतून साकार झालेल्या या टॉवरला त्यांचंच नाव देऊन त्यांच्या कष्टाचा आणि कल्पकतेचा एकप्रकारे फ्रांस सरकारने सन्मान केलं होता.  

आता आयफेल टॉवरला पेंट करण्याचं नियोजन आहे.

या टॉवरला एकदा पेंट करायचं झालं तर त्याला २.४ हजार कोटी इतका प्रचंड खर्च येतो.आत्तापर्यंत २० वेळा हा टॉवर रंगवला गेलाय. टॉवरच्या देखभालीसाठी दर सात वर्षांनी रंग दिला जातो. सर्वात गडद रंग तळाशी वापरला जातो आणि सर्वात फिकट रंग वरच्या ठिकाणी वापरला जातो. 

संपूर्ण टॉवरला रंगविण्यासाठी जवळपास ३ वर्ष लागतात आणि जवळ जवळ ६० हजार किलो रंगाचा वापर केला जातो.

तज्ञांच्या मते, आत्ता सध्या मेंटेनन्सचे चालू असलेले काम हे फक्त कॉस्मेटिक फेसलिफ्ट आहे त्याशिवाय शिवाय दुसरे काहीही नाही. त्याचा परिणाम एवढा चांगला दिसून येणार नाही असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. टॉवर पूर्णपणे दुरुस्त करून पुन्हा रंगविणे आवश्यक आहे त्यामुळे जुन्या पेंटवरच पुन्हा एकदा पेंटिंग केल्याने गंज आणखी वाढतच जाण्याची भीती आहे.

आयफेल टॉवरच्या देखभालीची ही पहिलीच वेळ नाही.

२०१० च्या एका अहवालात असं स्पष्ट करण्यात आलय की, स्मारकाच्या संवर्धनासाठी जबाबदार असलेल्या Societe d’ Exploitation de la Tour Eiffel (SETE) ने  टॉवरच्या जुन्या धातूच्या संरचनेच्या चाचणीवर आधारित पूर्णपणे नवीन देखभाल  दुरूस्ती धोरण आणले पाहिजे असं म्हटलय.

२०१४ मध्ये एक्सपायरिस या पेंट कंपनीच्या आणखी एका अहवालात टॉवरला भेगा पडल्याचे आणि गंज लागल्याचे आढळले. 

टॉवरवरील नवीन पेंटपैकी फक्त १० टक्के पेंटच टॉवरला चिकटत होता असे गार्डियनच्या अहवालात म्हटले आहे.

२०१४ चा अहवाल लिहिणारे एक्स्पायरिसचे प्रमुख बर्नार्ड जिओव्हानोनी यांनी सांगितले की, “मी टॉवरवर बरीच वर्षे काम करत आहे. २०१४ मध्ये तर असं वाटले होतं की गंज काढण्यासाथी उपाययोजना करणं अत्यंत गरजेचं आहे.” पुढे ते असं म्हणतात की “टॉवरला मूळापासून उखडून पुन्हा नवीन बनवावा लागेल इतकी त्याची अवस्था भयाण झालीये”

२०१६ च्या अहवालात टॉवर मध्ये जवळपास ८८४ दोष आढळले होते, त्यापैकी ६८ तर खूप जास्त धक्कादायक म्हणजे टॉवरच्या टिकाऊ पनावरच शंका घेण्यासारखे होते.

टॉवरचं संपूर्ण नूतनीकरण करायचं झालं तर टॉवर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद करावा लागेल. परंतु SETE असं करण्यासाठी तयार नाहीये त्यांच्या मते २०२० मध्ये कोविड महामारीमुळे पर्यटक न आल्यामुळे उत्पन्नात मोठा तोटा झालाय. असा तोटा पुन्हा एकदा सहन करायला ते तयार नाहीयेत. म्हणून ते पूर्ण नूतनीकरण करायला तर होत नाहीयेत असं बोललं जातं.

डिस्नेलँड, लुव्रे आणि व्हर्साय पॅलेस नंतर आयफेल टॉवर हे फ्रान्समधील चौथे सर्वाधिक भेट दिलं जाणारं सांस्कृतिक स्थळ आहे.

आयफेल टॉवरच्या या अवस्थेकडं फ्रान्स सरकारने लवकरात लवकर लक्ष देऊन या जगप्रसिद्ध वास्तुचं योग्यप्रकारे संवर्धन करावं हीच जगभातल्या पर्यटन प्रेमींची इच्छा असणार.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.