BCCI म्हणजे राजकारणी हे इक्वेशन फिक्स झालं ते आपल्या एका मराठी माणसामुळेच…

देशात अनेक निवडणूका सध्या चर्चेत आहेत. महाराष्ट्रात अंधेरीच्या पोटनिवडणुकीची चर्चा आहे. नॅशनल लेव्हलला काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडुकांची चर्चा होती ती पार पडलेय. हिमाचल प्रदेशच्या निवडणुका जाहीर झाल्यात पाठोपाठ गुजरात विधानसभेच्या निवडणुका असणार आहेत.

मात्र या सगळ्यांमध्ये अजून एक निवडणूक आहे जिथं राजकारणच तसा संबंध नाहीये मात्र देशातले अनेक राजकारणी यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत त्या म्हणजे BCCI च्या निवडणुका.

सौरभ गांगुलीला टर्म  नाही अशी बातमी बाहेर आल्यानंतर ही निवडणूक चांगलीच लाइमलाइटमध्ये आली आहे. अमित शहा हे स्वतः या निवडणुकीमध्ये लक्ष घालून आहेत आणि त्यांच्याच बंगल्यावर झालेल्या मीटिंगमध्ये सौरभ गांगुलीला BCCI मधून डच्चू देण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्याचवेळी BCCI च्या पुढच्या टर्मच्या निवडणुकांसाठी जी नावं सजेस्ट करण्यात आली आहेत ती नेहमीसारखीच राजकारण्यांची आहेत.

BCCI च्या अध्यक्षपदासाठी माजी क्रिकेटपट्टू रॉजर बिन्नी यांचं नाव समोर करण्यात आलं मात्र बाकीचे सगळे राजकारणी आहेत किंवा त्यांचे नातेवाइक आहेत.

इकडे सौरव गांगुलीला दुसरी टर्म नकार आला असला तरी अमित शहा यांचे पुत्र जय शहा यांना दुसऱ्यांदा BCCI च्या सेक्रेटरीपदासाठी पुढं करण्यात आलं आहे. त्याचवेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचे बंधू अरुण धुमल, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, काँग्रेसचे खासदार राजीव शुक्ला ही नावं आपल्याला BCCI च्या नव्या बोर्डावर दिसतील. त्यामुळे प्रश्न हा पडतो की राजकारण्यांची BCCI मध्ये एंट्री झालीच कशी…

त्यामुळे मग प्रश्न पडतो BCCI पहिल्यापासूनच राजकारण्यांचा ताब्यात होती का? तर सुरवातीपासून नव्हती. मात्र जसजशी क्रिकेटची लोकप्रियता वाढली, त्यामध्ये पैसा वाढण्याची शक्यता निर्माण झाली तसा मग राजकारण्यांनी आपला मोर्चा इकडे वळवला.

आता क्रिकेट लोकप्रिय व्हायला कशी सुरवात झाली ह्याचं उत्तर तितकं अवघड नाहीये. भारतात क्रिकेटचा सुवर्णकाळाचा दिवस उजाडला तो 25 जून 1983ला. कपिल देवाच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्रजांच्या भूमीत जाऊन त्यांनीच भारताला दिलेल्या खेळामध्ये भारत विश्वविजेता झाला होता. कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील संघाने वेस्ट इंडिजवर विजय मिळवल्याने अख्या भारत जल्लोष करत होता.

आतापर्यंत सिनेकलाकारांनाच सुपरस्टार मानणाऱ्या भारताला आता स्टार नवीन चेहरे परिचित झाले होते. आणि याच संधीचा फायदा घ्यायचं ठरवलं इंदिरा गांधी यांनी.

क्रिकेटची प्रमुख बॉडी असलेल्या BCCI वर आपल्या विश्वासू माणसाला बसवून या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचं इंदिरा गांधींची योजना होती.त्यांनी या जबाबदारीसाठी प्रणव मुखर्जी यांचं नाव समोर केलं. प्रणवदा त्यावेळी केंद्रात डिफेन्स मिनिस्टर होते आणि त्यांना त्याचबरोबर BCCI चं अध्यक्षपद घेण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र राजकारणात निरनिराळे खेळ खेळण्यास माहीर असलेल्या प्रणवदांना मैदानावरील खेळाचा मात्र रस नव्हता. त्यामुळे क्रिकेट प्रशासनातला कोणताही अनुभव नसलेल्या प्रणवदा यांनी हे पद स्वीकारण्यास असमर्थता दर्शवली.

मात्र त्याचवेळी त्यांनी त्यांचे मंत्री सहकारी एन के पी साळवे यांचे नाव सुचवले, ज्यांना क्रिकेट या खेळात प्रचंड रस होता.

अशाप्रकारे महाराष्ट्र काँग्रेसचे नेते बीसीसीआयचे अध्यक्षपद भूषवणारे पहिले राजकारणी ठरले.एन के पी साळवे हे एक मोठे राजकारणी, विचारवंत म्हणून देशभर प्रसिद्ध होते. वेगळ्या विदर्भाचे ते खंदे समर्थक होते. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची म्हणजे बीसीसीआयची सूत्रे हाती घेण्यापूर्वी साळवे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही होते. त्यामुळे त्यांनी या पदाला लगेच होकार कळवला.

त्यातच १९८२ ला भारतात एशियाड गेम्समुळे टीव्हीचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. त्यात १९८३च्या विश्वचषक विजयामुळे खेळाचा प्रसारही झाला होता. त्याचबरोबर बाजारपेठेतही उदारीकरणाचे, खाजागीकरणाचे वारे वाहू लागल्याने खेळाकडे येणाऱ्या स्पॉन्सरची देखील संख्या वाढली होती. यातूनच एन के पी साळवे यांच्या पुढाकाराने सरकारकडून कोणतीही मदत नं घेता त्यावेळी BCCI ने पाकिस्तानबरोबर मिळून १९८७चा वर्ल्डकप होस्ट केला होता. हा वर्ल्ड कप जोरदार हिट झाला आणि त्याचं कमर्शियल सक्सेसही राजकारण्यांना आकर्षित करण्यासाठी पुरेसी होती.

त्यामुळे मग आणखी एक ज्येष्ठ काँग्रेस सदस्य BCCI च्य राजकरणात पुढे आले. माधवराव सिंधिया BCCI मध्ये येण्याच्या आधी मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष होते. मात्र १९९० साली BCCI चं अध्यक्षपद उत्तर विभागासाठी राखीव होतं.

मात्र BCCI चं अध्यक्षपदासाठी हट्टाला पेटलेले सिंधिया मग त्यासाठी हरियाणामधून प्रतिनिधी म्हणून निवडून गेलॆ. 

हाच इतिहास रिपीट झाला जेव्हा शरद पवार BCCI चे अध्यक्ष झाले.

२००५ मध्ये जेव्हा शरद पवार BCCI चे अध्यक्ष होण्यास उत्सुक होते तेव्हाही हे पद उत्तर विभागासाठी राखीव होतं. यावर उपाय म्हणून मुंबई क्रिकेट संघटनेपासून सुरवात केलेले शरद पवार थेट पंजाबमधून प्रतिनिधी म्हणून निवडून जाऊन BCCI चे अध्यक्ष झाले. यानंतर राजकारण्यांचं BCCI वर वर्चस्व राहिले ते कायमचंच.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.