अब्दुल सत्तार आणि वाद हे समीकरण लय जुनं आहे

शिंदे फडणवीस सरकारच्या स्थापनेपासून शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार हे कायम वादात अडकत आलेले आहेत. मंत्रपदाची चर्चा सुरु असतांना सत्तार यांच्या मुलांची नावं टीईटी घोटाळ्यात सापडली होती. या प्रकरणामुळे सत्तार यांना मंत्रिपद मिळेल की नाही अशी चर्चा झाली, पण सत्तार यांना कृषीमंत्रीपद मिळालं.

कृषी मंत्री झाल्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या मागे असलेला वादाचा भोवरा थांबेल अशी चर्चा झाली पण सत्तार यांच्यामागे लागलेला वादाचा भोवरा थांबण्याचं नाव घेत नाही. 

टीईटीनंतर जमीन घोटाळ्याचे आरोप, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी न विचारता परस्पर निर्णय घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेली कानउघाडणी आणि आता सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या आक्षेपाहार्य विधानामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार हे पुन्हा वादात अडकले आहेत.

सुप्रिया सुळे यांनी शिंदे गटातील नेते अब्दुल सत्तार यांच्यावर ५० खोके घेतल्याचा आरोप केला होता.

याबद्दल एका वृत्तवाहिनीने अब्दुल सत्तार यांना प्रश्न विचारला. त्या प्रश्नाचं उत्तर देतांना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांचा एकेरी उल्लेख करून त्यांना शिवीगाळ केली होती.

सत्तार म्हणाले की, “इतकी भि**** झाली असेल सुप्रिया सुळे तर तिलाही खोके देऊ.”

सत्तारांच्या या वक्तव्यानंतर अनेक स्तरांमधून सत्तार यांच्यावर टीका करण्यात आली. सत्तार यांच्या वक्तव्याबद्दल शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसकर यांनी सुद्धा दिलगिरी व्यक्त केली आहे.

तर अब्दुल सत्तर यांनी सुद्धा स्वतःच्या वक्तव्याची माफी मागितली आहे.

ते म्हणाले की, “जे आम्हाला बदनाम करत आहेत त्यांच्याबद्दल बोललो. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे किंवा कोणत्या महिलांची मने दुखावतील असा कोणताच शब्द बोललो नाही. परंतु माझ्या बोलण्याने जर कुणाची मने दुखावली असतील तर मी माझा शब्द मागे घेतो, सॉरी म्हणतो.”

सत्तार यांनी आज आपला शब्द मागे घेतला आणि सॉरी म्हटलं पण ते स्वतःच्या  विधानामुळे पहिल्यांदाच अशा वादात अडकलेले नाहीत. 

२००९ मध्ये आमदार म्हणून राज्याच्या राजकारणात आल्यापासूनच सत्तार हे त्यांच्या वक्तव्यांमुळे कायम वादात अडकत आलेले आहेत. काँग्रेस नेत्याला मारहाण केल्यामुळे मंत्रिपद गेलं. तर राधाकृष्ण विखे, बाळासाहेब थोरात यांच्यावर केलेली टीका अशा अनेक विधानामुळे सत्तार वादात अडकलेले आहेत. 

काँग्रेस नेत्याला मारहाण केल्यामुळे सत्तार यांचं मंत्रिपद काढून टाकण्यात आलं होतं.  

सत्तार हे २००९ मध्ये सिल्लोड मतदारसंघातून पहिल्यांदा काँग्रेस पक्षाकडून विधानसभेवर निवडून गेले होते. सत्तर यांनी निव्वळ सिल्लोड मतदार संघच जिंकला नव्हता तर सलग १४ वर्ष मतदारसंघात निवडून येणाऱ्या भाजपची सत्ता सुद्धा संपवली होती. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या अशोक चव्हाण यांनी सत्तारांना राजकीय पाठबळ दिलं आणि राज्यमंत्री बनवलं. 

पण औरंगाबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत तिकीट मागणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला सत्तार यांनी शिवीगाळ करून रक्तबंबाळ होईपर्यंत लाथा बुक्यांनी मारहाण केली होती. त्यांच्या या कृतीमुळेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सत्तारांना राज्यमंत्रीपदावरून काढून टाकलं होतं. 

तत्कालीन पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याबरोबर घातलेली हुज्जत. 

२०१० मध्ये खरीप हंगामाचे नियोजन करण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती. ठरल्याप्रमाणे बैठकीत पहिल्यांदा खताच्या विषयावर चर्चा झाली आणि त्यानंतर बियाण्यांच्या मुद्यावर चर्चा सुरु होती. तेव्हा सत्तार हे उशिरा सभागृहात पोहोचले आणि पालकमंत्री थोरात यांना खताबद्दल प्रश्न विचारला. 

त्यावर पालकमंत्र्यांनी बियाण्यांच्या विषयावर चर्चा सुरु आहे असं सांगितलं. यावर पालकमंत्री प्रश्न विचारू देत नाहीत असा आरोप सत्तार यांनी थोरात यांच्यावर केला होता. 

या आरोपावर उत्तर देतांना थोरात यांनी सुद्धा सत्तार यांच्यावर प्रत्येक बैठकीला उशिरा येण्याचा आरोप केला. त्या आरोपांचं उत्तर देतांना सत्तार यांनी सुद्धा थोरात यांच्यावर आरोप केले की, “पश्चिम महाराष्ट्रातले थोरात हे मराठवाड्यावर अन्याय करण्यासाठी आले आहेत.” 

पालकमंत्री बाळासाहेब थोरात आणि अब्दुल सत्तार यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली आणि सत्तार  यांनी सभागृहाचा त्याग केला. तेव्हा सुद्धा अब्दुल सत्तार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. 

२०१७ मध्ये सत्तार यांनी एका शेतकऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केली होती. 

 सत्तार यांच्या फार्महाऊसपासून जवळच असलेल्या एका शेतीच्या खरेदीवरून वाद सुरु होता. ही जमीन महार वतनाची होती परंतु या जमिनीला काँग्रेसच्या नेत्यांना विकण्यात आलं असा वाद सुरु होता. या वादामध्ये सत्तार यांनी त्या शेतकऱ्याला बेदम मारहाण आणि शिवीगाळ केली होती. या प्रकरणाचा  एक व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. तेव्हा सुद्धा सत्तार वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. 

शेतकरी सन्मान योजनेवरून फडणवीसांनी सत्तार यांची कानउघडणी केली होती.

सप्टेंबर २०२२ मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या धर्तीवर राज्य सरकार सुद्धा अशी योजना सुरु करणार आहे असं माध्यमांना सांगितलं होतं. त्यानंतर माध्यमांनी या बातमीचा प्रसार केला. ही बातमी चर्चेत आल्यानंतर कॅबिनेट बैठक बोलावण्यात आली. त्या बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तार यांची कानउघाडणी केली होती. 

कॅबिनेट बैठकीत निर्णय झाल्याशिवाय मनमर्जीने कोणत्याही योजनांची घोषणा करू नये असा सल्ला फडणवीसांनी सत्तार यांना दिला होता. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पीएला केलेली शिवीगाळ.

ऑक्टोबर २०२२ मध्ये मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवास्थानी शिंदे गटाच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत सत्तार आणि मुख्यमंत्र्यांचे पीए खतगावकर यांच्यात बाचाबाची झाली. १०० दिवस झाले तरी मतदारसंघाला निधी देण्यात आला नाही असं म्हणत सत्तार यांनी खतगावकरांना शिवीगाळ केली होती.

या प्रकरणात शिंदे गटातील अनेक नेत्यांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला होता परंतु प्रकरण आटोक्यात आले नव्हते. या प्रकरणामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सत्तार यांच्यावर नाराज झाले होते अशी माहिती सूत्रांनी दिली होती. 

तुम्ही दारू घेता का? असा प्रश्न सत्तार यांनी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना विचारला होता.

राज्यात झालेल्या अतिवृष्टीची पाहणी करतांना कृषिमंत्री सत्तार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. तेव्हा बैठकीमध्ये सगळे जण चहा पित असतांना सत्तार यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण विनोद यांना चहा पिणार का असा प्रश्न विचारला. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी नाही असं उत्तर दिलं. तेव्हा सत्तार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दारू पिता का? असा प्रश्न विचारला. कृषिमंत्र्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी निरुत्तर झाले होते. 

या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यावर विरोधकांनी सत्तार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यात सत्तारांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करण्यात आली होती.   

अशाप्रकारे वादग्रस्त विधानं करणे आणि मारहाण करण्याच्या अनेक मुद्यांमुळे सत्तार हे अनेकदा वादात अडकलेले आहेत. यासोबतच कुत्रा निशाणी दिलीत तरी निवडून येईन असं विधान, टीईटी घोटाळ्यात मुलांची नावं, वाळू ठेकेदारांना दिलेली मुदतवाढ, आदित्य ठाकरेंवर पप्पू म्हणून केलेली टीका, जमिनीचा घोटाळा या सर्व प्रकरणामुळे सुद्धा सत्तार अनेकदा वादाच्या भोवऱ्यात अडकलेले आहेत. 

हे ही वाच भिडू   

 

Leave A Reply

Your email address will not be published.