समुद्रातील कासवांकडून ९०% ‘माद्याच’ जन्माला येतायेत त्याचं कारण टेन्शन घेण्यासारखंच आहे

प्रजनन म्हटलं कि त्यासाठी नर आणि मादी दोघांची गरज असते. दोघांपैकी एकाची जरी संख्या प्रमाणापेक्षा कमी झाली तरी त्या प्रजातीच्या संख्येवर परिणाम होतो. भविष्यात असाच काहीसा परिणाम कासवांच्या संख्येवर होईल असं तज्ज्ञ सांगतात.

अमेरिकेतील फ्लोरिडाच्या समुद्रकिनाऱ्यांवर लॉगरहेड प्रजातीच्या कासवांच्या अंड्यांमधून निव्वळ माद्यांचाच जन्म होतोय. गेल्या तीन वर्षात जन्माला येणाऱ्या पिल्लांमध्ये नर कासवांच्या शोध घेतल्यावर नर पिल्लं सापडत नाहीयेत. 

निव्वळ लॉगरहेडच नाही तर भविष्यात जगभरातील कासवांच्या प्रजातींवर याचा परिणाम होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. जगभरात आढळणाऱ्या समुद्री कासवांच्या सहा प्रजातींपैकी ४ प्रजाती आढळतात त्यामुळे भविष्यात भारतातील प्रजातींवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. 

मात्र फ्लोरिडामध्ये अचानक कासवांच्या अंड्यांमधून निव्वळ मादी पिल्लं जन्माला येण्याचं कारण काय आहे?

तर कासवांच्या अंड्यातून निव्वळ माद्या जन्माला येण्यासाठी दिवसेंदिवस तापमानात होणारी वाढ जबादार आहे. मानवात एक्स आणि वाय असे दोन क्रोमोजोम असतात. या दोन गुणसूत्रांनुसार मुलगा होणार कि मुलगी होणार हे ठरत असतं. त्यातसुद्धा यातील गुणसूत्र वडिलांमुळेच ठरत असतो. 

मात्र कासवांच्या बाबतीत असं होत नाही. कासवांमध्ये मुळात याची गुणसूत्र नसतात. कासवं ज्या रेतीमध्ये कासवं अंडी घालतात त्या रेतीच्या तापमानानुसार मादी जन्माला येणार कि नर जन्माला येणार हे ठरत असतं. 

कसं ते सोप्या भाषेत डिटेल समजून घेऊयात….

समुद्री कासवं बहुतांश काळ कासवं समुद्रातच राहतात परंतु गर्भवती माद्या अंडी घालायला समुद्राच्या किनाऱ्यावर येतात. समुद्राच्या किनाऱ्यावर असलेल्या रेतीत किंवा रेताळ जमिनीत अंडी घालतात. रेतीत अंडी घातल्यानांतर माद्या तेथून निघून जातात. 

त्यानंतर ज्या रेतीत अंडी घातली आहेत त्या रेतीचे तापमान जर २७ अंश सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर त्या अंड्यांमधून नार कासवं जन्माला येतात. त्याउलट तापमान जर ३१ अंश सेल्सिअस च्या वर असेल तर त्या अंड्यांमधून मादी कासवं जन्माला येतात.

परंतु तापमानाचे प्रमाण २७ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअसच्या दरम्यान असेल तर नर आणि मादी दोन्ही कासवं संमिश्र प्रमाणात जन्माला येतात. त्यामुळे नर आणि मादी या दोघांचे संतुलन साधले जाते. 

जगभरातील कासवांच्या ६ प्रजातींपैकी चार प्रजाती भारताच्या समुद्रकिनाऱ्यांवर अंडी घालतात. 

यातील पहिली प्रजाती म्हणजे ऑलिव्ह रिडले कासव.

ऑलिव्ह रिडले कासवाला त्याचं नाव त्याच्या तपकिरी रंगामुळे मिळालं आहे. ऑलिव्ह रिडले प्रजाती भारतीय समुद्रकिनाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर अंडी घालणारी प्रजाती आहे. ऑलिव्ह रिडले प्रजाती अंडी घालण्यासाठी भारतातील ओडिशाच्या समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या संख्येने जमा होते आणि अंडी घालते. 

ओडीशाबरोबरच कोकण किनाऱ्यावर सुद्धा हे कासव आढळून येतात. रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्रकिनाऱ्यावर सुद्धा ही प्रजाती अंडी घालते.

दुसरी प्रजाती आहे ग्रीन टर्टल. 

हा कासव रंगाने हिरवा असतो तसेच याच्या चरबीचा रंग सुद्धा हिरवाच असतो त्यामुळे याचं नाव ग्रीन टर्टल असं पडलय. या कासवाची रुंदी साधारणपणे दीड मीटर रुंदी आणि वजन  ७० ते १९० किलोपर्यंत असतं.

हा कासव भारताच्या पूर्व आणि पश्चिम या दोन्ही किनारपट्यांवर आढळतो. परंतु याची संख्या ऑलिव्ह रिडले इतकी मोठी नसते त्यामुळे याची फारशी दाखल घेतली जात नाही.

तिसरी प्रजाती आहे हॉक्स बिल टर्टल.

या कासवांच तोंड पक्षाच्या चोचीसारखं असतं त्यामुळे याला हॉक्स बिल टर्टल किंवा चोच्या कासव म्हणतात. हा कासव सगळ्या कासवांपेक्षा अगदी एकांतात राहणं पसंत करतो.

हा कासव भारतात अंदमान-निकोबार बेटांच्या किनाऱ्यांवर आढळतो व त्याच किनाऱ्यांवर अंडी घालतो. अंदमान आणि निकोबार बेटे भारताच्या मुख्यभूमीपासून बरीच लांब असल्यामुळे फार कमी लोकांनाच याबद्दल माहिती असते.

चौथी प्रजाती आहे लेदर बॅक टर्टल.

या कासवांच्या पाठीवर काळ्या रंगाचं ठिपकेदार आवरण असतं व ते अगदी चामड्यासारखं. असतं त्यामुळे या कासवाला लेदर कासव असं म्हणतात. हा कासव समुद्री कासवांमध्ये सगळ्यात मोठा असतो.

याची रुंदी साधारणपणे १.७ मीटर असते. तर वजन तब्बल ५०० किलोपर्यंत असतं त्यामुळे हा कासव बराच बलाढ्य असतो. हॉक्स बिल टर्टल प्रमाणे लेदर बॅक टर्टल सुद्धा भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांवर आढळतो.

मात्र तापमानवाढीमुळे फ्लोरिडातील कासवांमध्ये निव्वळ माद्या जन्माला येत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून तापमानात अचानकपणे वाढ होत आहे. त्यामुळे समुद्रकिनाऱ्यावरचं पाणी आणि रेती दोन्ही गरम होत आहेत. त्यामुळे कासवांच्या पिल्लांमध्ये नर पिल्ले आढळत नाहीयेत. मॅरेथॉनमधील टर्टल हॉस्पिटलचे व्यवस्थापक बेट झिरकेलबॅच यांच्या अभ्यासानुसार गेले चार उन्हाळे फार उष्ण होते.

त्यामुळे गेल्या चार वर्षांमध्ये संशोधकांना एकही नर पिल्लू आढळलेला नाहीये.

गेल्या दहा वर्षांपैकी सात वर्षांमध्ये मादी कासवांचीच नोंद होत आहे. तर ऑस्ट्रेलियाती ग्रेट बॅरिअर रीफमढील उबदार भागात ९० टक्के मादी कासवांची नोंद करण्यात आलीय. तर थंड भागात ६५ ते ६९ टक्के मादी कासवांची नोंद करण्यात आलीय.

वाढत्या तापमानामुळे भविष्यात सुद्धा मादी कासवांचाच जन्म झाल्यास कासवांच्या प्रजातीवर याचा मोठा परिणाम होईल असं संशोधक सांगत आहेत.

अमेरिका आणि ग्रेट बॅरिअर रिफ या दोन टोकांच्या समुद्रकिनाऱ्यांवर इतका बदल झाला आहे त्यामुळे भारतातील कासवांच्या प्रजातींवर सुद्धा याचा नकारात्मक परिणाम होण्याची दाट शक्यता आहे.

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.