कधीकाळी हॉटेलमध्ये भांडी घासणारा मुलगा आज फेमस शिवसागर रेस्टॉरंटचा मालक आहे..

एखाद्या हॉटेलमधला सर्वात शेवटचा कामगार कोणता. तुम्हाला वेटर किंवा फरशी पुसणारा वाटत असेल तर नाही. मोरीत बसून भांडी धुणारा मोऱ्या हा हॉटेलमधला सर्वात खालचं काम करणारा व्यक्ती.

साधारण या लाईनमध्ये येणाऱ्या नवीन पोरांना पहिल्यांदा हेच काम दिलं जातं. इथे काम करणाऱ्या प्रत्येक पोराचं एक स्वप्न असतं. अन् ते म्हणजे एक दिवस याच हॉटेलच्या गल्ल्यावर बसायचं, मॅनेंजर व्हायचं..

अन् अशी कित्येक उदाहरणं आहेत जी दोन-तीन चार वर्ष मोरीत भांडी धुतात. त्यानंतर वेटर होतात. त्यानंतर हळुहळु करत रिटायरमेंटच्या वयात आल्यानंतर मालकाच्या अनुपस्थितीत गल्ल्यावर बसायचं ध्येय पुर्ण करतात.

पण ही स्टोरी जराशी वेगळी आहे.

स्टोरी सुरू होते ती १९८० च्या काळात. या सालात कर्नाटकातून एक पोरगा मुंबईत ३० रुपये घेवून आला. त्यावेळी या मुलाचं वय होतं फक्त १३ वर्ष. एकट्याच्या जीवावर त्याने मुंबई गाठली. काहीतरी काम करायचं आणि पोट भरायचं. एवढचं त्याचं ध्येय होतं.

मुंबईत आल्यानंतर हा पोरगा एका हॉटेलमध्ये कामाला लागला. काम तेच दिवसभर मोरीत बसून भांडी धुवायचं. पाचवीत शाळा सोडलेल्या या पोराने नाईट स्कूलमध्ये प्रवेश घेतला. रात्री अभ्यास आणि दिवसभर काम चालू झालं. हळुहळु करत हा पोरगा आत्ता वेटर म्हणून काम करू लागला.

अशात १० वर्ष गेली. पोटाची खळगी भरायला रोजचं काम होतचं. पोरानं आत्ता इथेच एकदिवस गल्ल्यावर बसायचं हे स्वप्न पाहिलेलं. पण कसय न ठरवून काही होत नाही. खूप गोष्टी न ठरवता होत असतेत. असच या पोराच्या बाबतीत झालं.

एकदिवस त्याला बाबूभाई पटेल भेटले…

बाबूभाई पटेलांनी त्या पोराला नाव विचारलं. पोरानं सांगितल नारायण पुजारी. नारायण पुजारीसोबत ओळख झाली. गप्पा सुरू झाल्या. अन् एकदिवस बाबूभाई पटेल यांनी पोराला ऑफर दिली. पार्टनरशीपमध्ये हॉटेल सुरू करायची..

कॅम्पस कॉर्नर नावाचं एक हॉटेल सुरू करण्यात आलं. ते ठिकठाक चालू पण होतं. पण म्हणावा असा जम बसत नव्हता.. 

नारायण पुजारीला कायम काहीतरी चुकतय अस वाटायचं. तेव्हा एकाच पदार्थावर फोकस करुन तो पदार्थ हिट केला पाहीजे हे त्याच्या डोक्यात आलं. या पोराने हेरलं ते पावभाजीचं मार्केट. मुंबईमध्ये काय चालतं तर वडापाव, साऊथ इंडियन आणि पावभाजी..

नारायण पुजारीने हॉटेलमध्ये पावभाजी हा पदार्थ घेवून मार्केट करायचं हे ठरवलं, अन् त्यातूनच सुरू झालं

शिवसागर रेस्टॉरंट..

शिवसागर रेस्टॉरंटमधली पावभाजी नव्वदच्या दशकात मुंबईकरांच्या ओळखीची होत गेली. दिवसाला १००० प्लेट पावभाजी खपू लागली. पण त्याहूनही अधिक भारी गोष्ट म्हणजे ही पावभाजी सेलिब्रिटी लोकांच्यात फेमस झाली. सचिन तेंडुलकर, जॉकी श्रॉफ, काजल असे अनेकजण ही पावभाजी खाण्यासाठी शिवसागर रेस्टॉरंटमध्ये येवू लागले.

त्यातूनच पावभाजीला ग्लॅमर मिळत गेलं..

 गेल्या १५-२० वर्षात नारायण पुजारींनी शिवसागर रेस्टॉरंटच्या १५ पेक्षा जास्त शाखा सुरू केल्या. त्यातील ३ शाखा ह्या इतर राज्यांमध्ये देखील सुरू झाल्या. आत्ता पावभाजीसोबत इतर पदार्थ देखील फेमस झाले पण पावभाजी हि पावभाजीचं म्हणत रोजची गर्दी कायमची झाली. तरिही नारायण पुजारी या पोराने आजही एक गोष्ट सोडली नाही. ती म्हणजे रोज सकाळी रेस्टॉरंटमध्ये जाणं आणि स्वत: काम पाहणं. त्यामुळेच नारायण पुजारी आज तिथे आहेत. 

एक सफाईकामगार मुलगा जो आज ५० कोटींचा मालक झाला आहे ते त्याच्या कष्टामुळं हेच खरं. 

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.