अबूधाबी मधलं पहिलं हिंदू मंदिर ज्यासाठी ३ हजार भारतीय रात्रंदिवस राबत आहेत

लोकसभा स्पीकर ओम बिर्ला सध्या संयुक्त अरब अमिरातच्या दौऱ्यावर आहेत. पाच दिवसांच्या या दौऱ्या दरम्यान भारत आणि युएईमध्ये अनेक महत्वपूर्ण विषयावर चर्चा होणार हे फिक्स, पण सध्या बिर्ला यांचा हा युएई दौरा चर्चित आहे तो अबू धाबी मधल्या हिंदू मंदिरामुळं. 

आपल्या दौऱ्या दरम्यान ओम बिर्ला यांनी अबुधाबीमध्ये बांधण्यात येणाऱ्या भव्य अशा स्वामी नारायण मंदिराला भेट दिली. सोबतच तिथे काम करणाऱ्या भारतीय कामगारांची सुद्धा त्यांनी आवर्जून भेट घेतली.

तसं पाहिलं तर अबू धाबीमधल्या या मंदिराची चर्चा गेल्या कित्येक दिवसांपासून सुरु आहे.  अबुधाबी मधल्या बोचासंवासी अक्षर पुरुषोत्तम स्वामीनारायण संस्था (BAPS) यांच्याकडून हे मंदिर बांधलं जातंय.  ११ फेब्रुवारी २०१८ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराचे भूमिपूजन केलं होत. क्राऊन प्रिन्स यांच्यासोबत युएईमधले अनेक मोठी मंडळी या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होती. 

अबू धाबी मधलं हे पाहिलं हिंदू मंदिर असल्याचं बोललं जातंय, जे दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिराच्या धर्तीवर बांधलं जाणार आहे. या भव्य मंदिरासाठी ५५,००० स्क्वेयर मीटर जमीन देण्यात आलीये.  ज्यासाठी तब्बल ९०० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. येत्या २ वर्षात या मंदिराचे बांधकाम पूर्ण होणार असल्याचं म्हंटल जातंय.

युएईमधली उष्णता सहन करण्यासाठी या मंदिरात सुमारे १२ हजार टन वाळूचा खडक बसवण्यात येणार आहे. याशिवाय राजस्थान आणि गुजरातमधून कोरलेल्या कलाकृती आणि दगड मंदिरात बसवण्यात येणार आहेत. मंदिरात ७ शिखरे असतील. असं म्हंटल जात कि,  हे मंदिर यूएईच्या ७ अमिरातीचे प्रतीक असेल. ज्यात अरब देशांची कलाकारी सुद्धा पाहायला मिळणार आहे. 

अबू धाबी मधल्या या मंदिराच्या बांधकामात युएईबरोबरच  राजस्थानमधील सुमारे ३००० मजूर गुंतलेले आहेत. आपले लोकसभा स्पीकर ओम बिर्ला सुद्धा राजस्थानातील असल्या कारणाने त्यांनी या कामगारांची आवर्जून भेट घेतली.  

दरम्यान काही वर्षांपूर्वी या मंदिरावरून वाद निर्माण झालेला. वाद होता या मंदिराला हिंदू मंदिर म्हणण्यावरून. कारण हे मंदिर बांधण्यात येतंय स्वामीनारायण पंथाकडून. तसा स्वामीनारायण  पंथ हा हिंदूचं आहे. पण असं म्हंटल गेलेलं कि, हिंदू धर्मात ज्या प्रकारे विविधता आणि परंपरा पहायला मिळते, तसं या संप्रदायात त्यांचे संतच त्यांच्यासाठी सगळ्यात मोठे आहेत. त्यामुळे या संप्रदायाकडून बांधण्यात येणाऱ्या मंदिराला हिंदू मंदिर म्हणण्यावरून वाद सुरु झालेला. 

 पण तसं पाहायचं झालं तर अनेक देशात स्वामीनारायण पंथाची मंदिरे आहेत. ज्यात अमेरिका, दक्षिण आफ्रिका, पूर्व आफ्रिका आणि ब्रिटनसारखे देश आहेत.  स्वामीनारायण हा गुजरातचा एक प्रादेशिक संप्रदाय आहे. आज  स्वामीनारायण संप्रदाया आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोहोचलाय ज्याचं कारण अनिवासी भारतीय गुजराती आहेत.  

असं म्हंटल गेलेलं कि, स्वामीनारायण संप्रदायाच्या मंदिरात हिंदू देवी-देवतांच्याही मूर्ती असतात, पण त्यांचे विचार आणि पद्धती हिंदू परंपरेपेक्षा वेगळ्या आहे. अनेक जाती तर स्वामिनारायण संप्रदायाच्या नियमात सामील होऊ शकणार नाहीत. तसा हा फार काही फार काही टिकला नाही आणि आता मंदिराचं बांधकाम शेवटच्या टप्प्यात आलंय. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.