पानिपतातल्या लढाईबद्दलचे गैरसमज दूर केले आणि मराठ्यांचा पराक्रम जगापर्यंत पोचवला..

आपल्याला नेहमीच असं वाटतं राहिलंय की, मुंबईचा इतिहास आणि त्या संबंधी सर्व गोष्टी या पोर्तुगीजांनी आल्यावर लिहून ठेवल्या. म्हणजे उलट्या शब्दात पोर्तुगाली आल्यावर मुंबईचा इतिहास लिहिला गेला. पण तस अजिबात काही नाहीये. जेव्हा प्रसिद्ध इतिहासकार वि. का. राजवाडे यांनी १९२६ मध्ये ‘माहिकावतीची बखर’ यावर प्रकाशझोत टाकला तेव्हा मात्र वेगळंच चित्र समोर आलं.

अत्यंत महत्वाचं म्हणजे पानिपतची तिसरी लढाई आपल्याला समजलीच नसती जर राजवाडे यांनी त्यावर विपुल लेखन केलं नसत. त्यांनी बऱ्याच चुकीच्या धारणांवर प्रकाशझोत टाकून नवा इतिहास लोकांसमोर आणण्याचं काम केलंय.

इतिहासकार विश्वनाथ काशिनाथ राजवाडे, हे त्यांच्या वि.का. राजवाडे या नावानेच प्रसिद्ध होते.  एक इतिहासकार, अभ्यासक, लेखक, भाषाशास्त्रज्ञ आणि भाष्यकार होते, ज्यांना महाराष्ट्राच्या इतिहासाचे, त्याच्यावर खऱ्या अर्थाने व्यापक संशोधन करणारे पहिले इतिहास संशोधक मानले जाते. १८६३ मध्ये महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यात जन्मलेल्या राजवाडे यांनी डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट आणि रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे येथून पदवी प्राप्त केली.

मराठा इतिहासावर काम करणारे वि.का. राजवाडे हे पहिले व्यक्ती नव्हते. गंमत म्हणजे, मराठा इतिहासावरील सर्वात जुन्या आणि सर्वात मान्यताप्राप्त पुस्तकांपैकी एक, इंग्रजी सैन्य अधिकारी जेम्स ग्रांट डफ यांचे “हिस्ट्री ऑफ महाराष्ट्र” आहे. जे  सन १८२६ मध्ये लिहिले होते. या काळात संपूर्ण भारतात सामाजिक सुधारणा चळवळींची लाट सुरू झाली होती. पुण्यात सांस्कृतिक पुनर्जागरण होत होते.

आर.जी. भांडारकर सारख्या नामांकित विद्वानांनी भारताचा प्राचीन भूतकाळ पुन्हा शोधण्याचा आणि पुन्हा एकदा संघटित करण्याचे काम हाती घेतले. क्रांतिकारी नेते लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य संग्रामाविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी १८८१ मध्ये “केसरी” वृत्तपत्र सुरू केले. ब्रिटिशांविरूद्ध स्वातंत्र्याच्या लढाईत समाजातील विविध घटकांमधील लोकांना एकत्र करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला.

भारतीय इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या काही इंग्रज विद्वानांनी त्यांच्या फायद्यानुसार इतिहास मांडायला सुरुवात केली. या गोष्टीचा वि.का. राजवाडे यांच्यावर खोलवर परिणाम झाला. गैरसमज पसरवणाऱ्या इतिहासाला खोटे ठरवण्यासाठी अस्सल स्त्रोतांचा वापर करून त्यांनी भारताचा सामाजिक आणि राजकीय इतिहास पुन्हा लिहिला.

राजवाडेंचे मुख्य उद्दिष्ट होते ते म्हणजे देशभरातून अस्सल कागदपत्रे गोळा करून ती प्रकाशित करणे. मराठा साम्राज्याचा पतन होऊन फार काळ लोटला नसल्याने, राजवाडेंनी मराठा साम्राज्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे महत्त्वाची भूमिका बजावलेल्या कुटुंबांकडून मूळ कागदपत्रे गोळा करण्याचा निर्णय घेतला.

मराठा साम्राज्य उपखंडाच्या मोठ्या भागावर पसरलेले असल्याने ही कुटुंबे देशाच्या विविध भागात राहत होती. सर्व आर्थिक, शारीरिक आणि हंगामी अडचणींना तोंड देत राजवाडेंनी देशभर प्रवास केला आणि अगदी लहानातला लहान कागद ही शोधून काढला.

त्यांनी या कामासाठी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, पंजाब, रावळपिंडी, कराची ते कर्नाटक आणि कन्याकुमारी असा प्रवास केला. त्यांनी महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक गावात पायी प्रवास केला होता. ही कागदपत्रे गोळा करणे सोपे काम नव्हते. ज्यांच्याकडे कागदपत्रे होती त्यांनी ती देण्यास नकार दिला. काही व्यक्तींकडून कागदपत्रे मिळवण्यासाठी त्यांना अनेक दिवस थांबावे लागले.

कधी कधी तर लोकांनी त्यांची रद्दी झालेली कागदपत्रे देण्यास नकार दिला कारण ते पिढ्यानपिढ्या  त्यांच्या जवळ होते. त्याची प्रत देण्यासही नकार दिला. बहुतेक लोकांना त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांचे महत्त्वही कळलेच नव्हते. राजवाडेंनी ही कागदपत्र मिळवण्यासाठी सर्व शक्य ते पर्याय वापरले. प्रसंगी  अडाणी गावकऱ्यांना आमिष ही दाखवले.

अनेकांनी आपली कागदपत्रे लोकांच्या नजरेपासून दूर सुरक्षित ठिकाणी लपवली होती. या वर्षांमध्ये राजवाडे हजारो नाणी, कागदपत्रे आणि शिलालेख गोळा करण्यात यशस्वी झाले. १८९८ च्या सुमारास, ‘मराठ्यांच्‍या इतिहासाची साधने’ नावाच्‍या त्‍यांच्‍या मालिकेचा पहिला खंड प्रकाशित करण्‍यात आला. ज्यात मराठा साम्राज्य आणि अफगाणांमध्‍ये झालेल्या पानिपतच्‍या तिसर्‍या लढाईनंतरच्या सुमारे आठ-नऊ महिन्यांनंतरची सुमारे ३०४ पत्रे होती.

मराठा छावण्या आणि कारभाऱ्यांच्या दृष्टीकोनातून लिहिलेली ही पत्रे प्राणघातक युद्ध आणि त्याची कारणे याबद्दल होती. या कागदपत्रांवरून राजवाडे लवकरच महाराष्ट्राच्या अग्रगण्य इतिहासकारांपैकी एक ठरले. राजवाडेंच्या हयातीत, “मराठ्यांच्या इतिहासाची साधने” चे एकूण एकवीस खंड प्रकाशित झाले. ज्यात मराठा साम्राज्याची महत्त्वाची कागदपत्रे होती.

यामध्ये छत्रपती शिवाजींचे नातू शाहू महाराज, पेशवा बाजीराव पहिला आणि तंजावरमधील मराठा राजवटीतील कागदपत्रांचा समावेश आहे. हे सर्व खंड मराठा इतिहासाचे बहुमूल्य स्त्रोत बनले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दल आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्यांचे वडील शहाजी राजेंबद्दल फारशी माहिती नव्हती. १९२२ मध्ये, राजवाडेंनी “राधा माधव विलास चंपू” नावाचा एक दस्तऐवज प्रकाशित केला. शहाजींचे चरित्र जयराम पिंडे नावाच्या व्यक्तीने लिहिले.  राजवाडेंना चिंचवडमधील एका घरातून एक जुना दस्तऐवज मिळाला.

हे जुने संस्कृत आणि मराठी दस्तऐवज जीर्ण अवस्थेत होते. मूळ दस्तऐवज फक्त५५-५६ पृष्ठांचे होते. परंतु राजवाडेंनी त्या दस्तऐवजावर आधारित सुमारे २०० पृष्ठांची तपशीलवार प्रस्तावना लिहिली. ज्यात त्यांनी एका कवितेचे विश्लेषणही केले. या विश्लेषणाद्वारे त्यांनी कविता लिहिणाऱ्याचे संभाव्य युग आणि संभाव्य ठिकाण शोधले. त्याच्या विश्लेषणातून असे दिसून आले की शहाजींचे राज्य देशाच्या दक्षिण भागात होते.

१९२६ मध्ये, राजवाडेंचा धुळे येथे मृत्यू झाला. धुळ्यात स्थापन झालेल्या राजवाडे संशोधक मंडळात त्यांच्या नंतरच्या आयुष्यात लिहिलेली पुस्तके आहेत. इंडियन हिस्ट्री काँग्रेसने या महान इतिहासकाराच्या सन्मानार्थ भारतीय इतिहासात आजीवन सेवा आणि योगदान देणाऱ्यांसाठी “विश्वनाथ काशिनाथ राजवाडे पुरस्कार” ची सुरुवात केली.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.