ना मुंबईत, ना नागपुरात विधी मंडळाचं पहिलं अधिवेशन झालं होतं पुण्यात

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीच्या सत्तेनंतर राज्यात आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा नागपुरात हिवाळी अधिवेशन घेण्यात आलं . यावरून सत्ताधाऱ्यांनी यावरून मागच्या सरकारला चांगलेच डिवचले होते.

आता यावरून मग खूप साऱ्या बातम्या आणि स्टोऱ्या आल्या की नागपुरातच हिवाळी अधिवेशन का होतं ?  पहिलं अधिवेशन कुठं झालं आणि बरंच काही. पण भिडुनो तुम्हाला माहित नसेल म्हणून सांगतो,  

ना मुंबईत, ना नागपुरात,  विधी मंडळाचं पहिलं अधिवेशन झालं होतं पुण्यात..

होय तर. पुण्यातल्या कोरेगाव पार्कातल्या कौन्सिल हॉल मध्ये हे अधिवेशन पार पडलं होत.

महाराष्ट्र विधिमंडळाला देशात एक वेगळी प्रतिष्ठा लाभली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आतापर्यंत सर्वच क्षेत्रांत राज्याला याचबरोबर देशालासुद्धा नेतृत्व देणारे अनेक दिग्गज नेते महाराष्ट्राने दिले आहेत. या सर्वच नेत्यांनी आपल्या कर्तृत्वाने व झळाळणाऱ्या  कामगिरीने भारतीय लोकशाहीची प्रतिष्ठा तर उंचावलीच, परंतु राज्याला आणि पर्यायाने देशाला सर्वच क्षेत्रांमध्ये अग्रक्रम मिळवून दिला.

यामध्ये महाराष्ट्र विधिमंडळाचं योगदान अनन्यसाधारण असं आहे. मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलची पहिली बैठक २२ जानेवारी १८६२ रोजी मुंबई येथील टाऊन हॉलच्या दरबार हॉलमध्ये भरली होती. मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर सर जॉर्ज रसेल क्लार्क हे त्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. 

१९३५ चा भारत सरकारच्या कायद्यानुसार संघराज्यात्मक शासनपद्धती स्वीकारल्यामुळे प्रांतांना स्वायत्तता देण्यात आली होती. याच कायद्यामुळे मुंबई प्रांतात विधानसभा व विधान परिषद अशी दोन सभागृहे जुलै १९३७ मध्ये अस्तित्वात आली. 

१९३५ च्या कायद्यानुसार अस्तित्वात आलेल्या व २९ सदस्य असलेल्या विधान परिषदेचे पहिले अधिवेशन २० जुलै १९३७ रोजी तसेच १७५ सदस्य असलेल्या विधानसभेचे पहिले अधिवेशन १९ जुलै १९३७ रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये भरले होते.

तत्कालीन गव्हर्नरांनी गणेश कृष्ण चितळे यांची विधानसभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती.

याच विधानसभेच्या अधिवेशनात २१ जुलै १९३७ रोजी गणेश वासुदेव मावळंकर हे अध्यक्ष म्हणून व नारायण गुरुराव जोशी हे उपाध्यक्ष म्हणून बिनविरोध निवडून आले होते.

२० जुलै १९३७ रोजी पुणे येथील कौन्सिल हॉलमध्ये दुपारी दोन वाजता विधानपरिषदेची पहिली बैठक झाली. आजवरची चौदा अधिवेशने पुण्याच्या कौन्सिल हॉलमध्ये झाली. १९५५ पर्यंत परिषदेचे पावसाळी अधिवेशन पुण्यातच भरत होतं. नंतर ते खंडित झालं. त्यानंतर नागपूर करारामध्ये नमूद केल्यानुसार १९६० पासून सामान्यतः ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन दरवर्षी नागपूर येथे भरु लागले.

विशेष म्हणजे देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ही विधानपरिषदेचं पहिलं अधिवेशन १७ ऑक्टोबर १९४७ मध्ये पुण्यातच भरलं होतं.  

हे ही वाच भिडू. 

 

Leave A Reply

Your email address will not be published.