आसाममध्ये दरवर्षी महापूर येतो आणि ४० लाख लोकांना फटका बसतो, असा आहे इतिहास..

ओ गंगा तुम, गंगा बहती हो क्यूँ?

हे गाणं तर प्रत्येकाने कधी ना कधी ऐकलंच असेल. हे गाणं आहे प्रसिद्ध आसामी गायक भूपेन हजारिका यांचं. परंतु हे गाणं गंगा नदीवर गायलेलं नाही. ते गायलं आहे आसाम राज्यात दरवर्षी महाभयानक पूर घेऊन येणाऱ्या ब्रह्मपुत्रा नदीवर.

आसाममध्ये सध्या महापूर आलेला आहे. आत्तापर्यन्त 72 लोकांचा मृत्यू व 42 लाख लोक या पूरापासून प्रभावित झालेले आहेत.  राज्याच्या आपत्कालीन प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार एकूण ४२ लाख लोकं या महापुरामुळे प्रभावित झालेले आहेत तर आत्तापर्यन्त दोन लाख लोकांनी शरणार्थी शिबीरांचा आधार घेतलेला आहे. 

या नदीला दरवर्षीच इतका मोठा पूर का येतो? 

असा प्रश्न आपल्याला पडला असेल. तर जाणून घेऊयात यामागे नेमकी कारणं काय आहेत.   

आता या ब्रह्मपुत्रेला दरवर्षीच एवढा भयानक पूर का बरं येतो 

यामागचं कारण आहे ती या नदीची भौगोलीक स्थिती. ही नदी चीनमधल्या मानस सरोवरातुन उगम पावते. आणि वाहत वाहत पुढे भारताच्या अरुणाचाल प्रदेशात येते. अरुणाचल हा पूर्णपणे डोंगराळ भाग आहे. त्यामुळे ही नदी खाली आसामच्या मैदानात उतरते. खाली उतरते तशी सर्व प्रवाह खाली घेऊन येते. या पाण्यामुळेच ब्रह्मपुत्रेला पूर येण्याची सुरुवात होते.

याशिवाय इतर नदया देखील याला कारणीभूत ठरतात..

होय. निव्वळ अरुणाचल प्रदेशातून ब्रह्मपुत्रा नदी पाणी घेऊन येत नाही तर अरुणाचल प्रदेशाबरोबरच भुटान मधून तसेच नागालँड आणि मिझोराम राज्यात उगम पावणाऱ्या ब्रह्मपुत्रेच्या उपनद्याही ब्रह्मपुत्रेच्या पात्रात आणखी पाणी वाहून आणतात. यामुळे ब्रह्मपुत्रा विनाशकारी रूप धरते. यात ती शेती व घरांचं नुकसान करत पशुपक्ष्यांसह दरवर्षी अनेकांचा बळी घेते.

आता एकंदरीत पूर येण्याची प्रक्रिया अशी घडते…

आसाम राज्य म्हणजे उत्तरेला हिमालय आणि दक्षिणेच्या मेघालय राज्यातील पर्वतरांगांच्या बरोबर मध्ये असलेलं मैदान होय. तसेच पूर्वेला नागालँड हा सुद्धा डोंगराळ भागच. यामुळे सगळीकडून वाहत येणाऱ्या नद्या आपलं पाणी आसाम राज्याच्या मैदानी भागात घेऊन येतात. मैदानातली माती मऊ आणि सपाट असल्यामुळे पाणी सर्वदूर पसरते आणि महापूर येतो. हिमालय पर्वतरांगा आणि मेघालयातील पर्वतरांगांमध्ये भारतातील सगळ्यात जास्त पाऊस पडतो. त्यामुळे हे महापूर येतात.

या नदीला दरवर्षी तर पूर येतोच पण अनेक महापुर सुद्धा आलेले आहेत. या नदीला स्वातंत्र्यांनंतर आलेला सगळ्यात मोठा पूर होता तो २००४ चा.  

या पुराचा तब्बल सव्वा कोटी लोकांना फटका बसला आणि यात २५१ जणांचा मृत्यू झाला होता. 

तसेच शेती आणि पशुधनाची सुद्धा मोठी हानी झाली होती. सोबतच १९८८, १९९८ आणि २००७ मध्ये सुद्धा मोठे महापूर आले होते. १९८८ च्या महापुरात ९ हजार गावे, १९९८ च्या महापुरात ८ हजार गावे, २००७ च्या महापुरात ११ हजार गावे तर २००४ च्या महापुरात तब्बल १६ हजार गावे  प्रभावित झाली होती. या चारही महापुरांनी मोठी हानी केली होती. 

यात महापुरात जाणारी मनुष्यबळी आणि शेतीचं नुकसान पाहायचं झाल्यास, 

या पुरात आसाम राज्यातील तब्बल ४१ टक्के म्हणजेच ३१.०५ लाख हेक्टर जमिनीवरील पिकांना दरवर्षी फटका बसतो. हे क्षेत्र देशात पुराने प्रभावित होणाऱ्या जमिनीपैकी १० टक्के आहे. यामुळे आसाममधील शेतीचं आणि शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान होतं. दरवर्षी सरासरी २०० कोटींचं नुकसान होतं.

१९९८ मध्ये तर ५०० कोटींचं नुकसान झालं होतं आणि २००४ मध्ये सुमारे ७७१ कोटींचं नुकसान झालं होतं.

एवढंच नाही तर १७८७ मधील एका महापुरात एका नदीचं पात्रच बदलून गेलं..

ब्रह्मपुत्रा नदी आसाम राज्यातून बांग्लादेशात जाते. यात तीला तिस्ता नदी येऊन मिळते. परंतु ही तिस्ता काही ब्रह्मपुत्रेची उपनदी नव्हती.  इ. स १७०० च्या नकाशानुसार ती गंगेची उपनदी होती. परंतु इ. स. १७८७ मध्ये आलेल्या महापुरामुळे तिस्ता नदीचं पात्र बदललं आणि ती ब्रह्मपुत्रेंची उपनदी झाली. यामुळे महापूराचे परिणाम किती भयंकर असू शकतात याची जाणीव होते.

पण या पुरांना निव्वळ भौगोलिक आणि नैसर्गिक कारणंच जबाबदार नाहीत तर मानवी करणंही जबाबदार आहेत

निव्वळ भरपूर पावसामुळे आणि मैदानी प्रदेशामुळेच पूर येत नाही. तर नव्याने केलेल्या बांधकामांमुळे, वाढत जाणाऱ्या शहरांमुळे आणि धरणांमुळे सुद्धा पूर येतो. या बांधकामांमुळे पाण्याला वाहून जायला जागा मिळत नाही आणि पाणी साठत जातो. तसेच पूर येणाऱ्या भागात मानवी वस्ती मोठ्या प्रमाणावर वसली असल्याने माणसांचे मृत्यू होण्याचं प्रमाण वाढतं.

या महापुराची समस्या दूर करण्यासाठी काही प्लॅन सुद्धा केले गेले आहेत. 

हा महापूर नियंत्रणात राहून नुकसान कमी व्हावं यासाठी सरकार आणि तज्ज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनात अनेक प्लॅन सुद्धा केले आहेत. यातील पहिलं प्लॅन आहे नदीचं पसरट पात्र खोल करणे. यामुळे पाणी कमी जागेतून लवकर वाहून जाईल असं मत आहे. तसेच नदीवर आणखी धरणं बांधण्याचा दुसरा प्लॅन सुद्धा बनवला गेला. यात पाणी साठवलं गेल्याने ते दुसरीकडे पसरणार नाही असाही अंदाज आहे.    

परंतु पर्यावरणाच्या मुद्यांवरून ते प्लॅन रखडून पडले आहेत. पर्यावरण तज्ज्ञ आणि कार्यकर्ते यासाठी तयार नाहीत. या योजनांमुळे पर्यावरणाचे नुकसान होईल. तसेच हे प्लॅन शॉर्ट टाइम उपाय असून लॉन्ग टाइम त्याचे दुष्परिणाम होतील असं त्यांचं मत आहे.     

सरकार आणि पर्यावरण या दोघांच्या मध्ये दरवर्षी सामान्य आसामी लोकांना या पुरामुळे जान-मालाचं  नुकसान सहन करावं लागतंय. यामुळे कोणत्याही प्रकारे का असेना यावर उपाययोजना करणं, हेच भूपेन हजारीकांच्या गाण्यातलं दुःख दूर करेल हे मात्र नक्की….

हे ही वाच भिडू

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.