पिसाटलेल्या बैलाच्या शिंगावर लटकलेला खेळ म्हणजे जल्लीकट्टू !

पोंगल निमित्ताने दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झालीय. शुक्रवारच्या दिवशीच अवनियापुरममध्ये वळूच्या शिंगावर बेतलेल्या या खेळात एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. त्यानंतर जल्लीकट्टू खेळ विशेष चर्चेत आला.

काय आहे जलीकट्टू?

पोंगल सणादरम्यान खेळण्यात येणारा जलीकट्टू हा तामिळनाडू आणि दाक्षिणात्य राज्यांचा पारंपारिक खेळ आहे. जलीकट्टू या खेळाचा अर्थ आहे वळूंना वश करणे. या खेळाला २५०० वर्षांची परंपरा आहे. या खेळामागे एक गोष्ट सांगितली जाते ती अशी की,

फार वर्षांपूर्वी एका राज्यात एक प्रसंग घडतो. वळू आणि त्यांची राखण करणारे गुराखी आपल्या घराकडे परतत असतात. त्या गुरांच्या कळपात मजबूत धष्टपुष्ट असे बैल, काही नवी जन्मलेली वासरं आणि त्यांचे राखणदार गुराखी असतात. त्यातला एक बैल पिसाटलेला असतो. माजाला आलेल्या त्या बैलाला काही न समजल्याने तो दिसेल तिकडे धावत सुटतो. कळपातील इतर जनावर त्या बैलाला बघून भुजतात. अक्ख्या कळपाची वाताहत होऊ शकते असा अंदाज आल्यावर एक तरुण गुराखी चपळाईने माजलेल्या बैलाच्या दिशेने धावत सुटतो.

इतर गुराखी उरलेल्या कळपाला एकत्र बांधून ठेवतात आणि उत्सुकतेपोटी त्या तरुण गुराख्याकडे बघायला लागतात. तो तरुण गुराखी वाऱ्याच्या वेगाने दौडत जातो आणि माजलेल्या त्या बैलाच्या शिंगांवर आपला ताबा मिळवतो. सर्वशक्तीनिशी तो तरुण गुराखी बैलाच्या शिंगाला हिसका मारतो आणि त्याला जमिनीवर आदळतो.

दहा पंधरा मिनिटांच्या या खेळात बैल हरतो आणि तो तरुण गुराखी त्या बैलाच्या वेसणीला हात घालू त्याला कळपात परत घेऊन येतो.

हा घटनाक्रम त्या राज्यात सर्वदूर वाऱ्याच्या वेगाने पसरतो. त्या तरुण गुरख्याच हे कसब चर्चेत येतं. राजा त्या तरुण गुरख्याला आपल्या दरबारात बोलावतो. त्याची मुक्तकंठाने प्रशंसा करतो. त्याच कसब राज्यातल्या इतर तरुणांना शिकवण्याची विनंती करतो.

तो तरुण गुराखी राजाच्या विनंतीला मान देतो आणि आपलं कसब राज्यातल्या इतर उमद्या तरुणांना शिकवतो. आणि इथून सुरू होतो वळूच्या शिंगावर लटकलेला खेळ,

इरु ताजुवूथूल

रोजच्या जीवनात कामी येणारं हे कसब लोकांनी शिकावं म्हणून चाली परंपरेने येणारे प्रत्येक राजे ह्या खेळाचं आयोजन वर्षानुवर्षे करत जातात. पुढं एक राजा ह्या खेळाचं नाणं देखील काढतो. हेच नाणं प्रोत्साहन पर बक्षीस दिलं जातं. या नाण्यांना सल्ली म्हंटल जायचं. आणि हा खेळ होता बैलाच्या शिंगांना नाणी बांधण्याचा अर्थात कट्टू.

ह्यातूनच जन्माला आला जल्लीकट्टू

सल्ली कासू म्हणजे नाणी आणि कट्टू म्हणजे या नाण्यांचा संग्रह. हा खेळ खेळताना एक पिशवी बैलांच्या शिंगांना बांधली जाते. जेव्हा हे बैल पळतात तेव्हा त्यांच्या मागे युवक धावतात आणि त्यांच्या शिंगांना बांधलेली पिशवी काढून घेण्याचा प्रयत्न करतात. या खेळामध्ये जेलीकट या विशिष्ट जातीच्या बैलांचा वापर केला जातो म्हणून देखील या खेळाला जलीकट्टू हे नाव पडलं आहे.

मदुराई जवळ मोठाल्या शिळा सापडल्या आहेत ज्यावर  एकटा माणूस बैलाला भिडलेला दाखवला गेलाय. तज्ज्ञांच्या मते हे चित्र किमान २५०० वर्ष जुनं आहे, ज्यावरून हा खेळ तितकाच जुना आहे असं अभ्यासक मानतात. सर्वात जुन्या खेळांपैकी एक म्हणून जल्लीकट्टू मानला जातो.

बैलांना माणसाळवणे असं ह्या खेळाचं स्वरूप असलं तरी ह्या २ शब्दात हा खेळ स्पष्ट होत नाही. बैलांना पुनरुत्पादनासाठी तयार करणे ह्या वार्षिक क्रियेचा भाग म्हणून दर वर्षी पोंगलच्या दिवशी हा खेळ खेळला जातो.

कसा खेळला जातो जलीकट्टू खेळ?

ज्या बैलांचा आणि खेळाडूंचा ह्या खेळात सहभाग असतो, त्यांची फार कठोर ट्रेनिंग होत असते. बैलांनी धष्टपुष्ट व्हावं म्हणून त्यांना भरपूर पौष्टिक अन्न खाऊ घातलं जातं. त्यांना वयात आल्यावर छोट्या छोट्या शर्यतींमध्ये नेऊन सवय केली जाते. खेळाची ट्रेनिंग दिली जाते. हेच बैल पुढे शेतीच्या व इतर कामांत वापरले जातात. परंतु ह्या खेळात कुठेही नं हरणारे मजबूत बैल आणखी गाई-बैलांच्या पैदासीसाठी वापरले जातात.

जेव्हा या खेळाला सुरुवात होते तेव्हा वळूंच्या शिंगांना पैसे बांधून त्यांना भडकवले जाते. त्यांना पळण्यास प्रवृत्त केले जाते. बऱ्याचदा गर्दीमुळे हे वळू गांगरुन जातात आणि ट्रॅकवर पळण्याऐवजी ते गर्दीमध्ये घुसू पाहतात. काही वेळा या वळूंना मद्य देखील दिले जाते. त्यांनी जोरात पळावे म्हणून त्यांची शेपटीही पिरगाळली जाते.

या जलीकट्टू खेळाला वादाची पार्श्वभूमी सुद्धा आहे.

जलीकट्टू हा खेळ देशातील सर्वात धोकादायक खेळांपैकी एक मानला जातो. या खेळामुळे आतापर्यंत कित्येक लोक मृत्यूमुखी पडले आहे तर अनेकांना अपंगत्वदेखील आले आहे. २०१० ते २०१४ दरम्यान जलीकट्टू या खेळामुळे १,१०० लोक गंभीरिरत्या जखमी झाले तर १७ जणांना आपला जीव गमवावा लागला. गेल्या २० वर्षांमध्ये २०० पेक्षा अधिक लोक बळी पडले आहेत. या खेळावर सर्वोच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र जनमताच्या रेट्यानंतर ही बंदी पुन्हा उठवण्यात आली.

हे ही वाच भिडू.

 

Leave A Reply

Your email address will not be published.