एका गणितानं हुकलं नाहीतर, जेंटलमन शॉन पोलॉक आफ्रिकन क्रिकेटचा बादशहा असता…
९० च्या दशकातले दिवस. टी२० नावाचं मनोरंजन अजून सत्यात उतरलं नव्हतं. क्रिकेटमध्ये सगळ्यात कठीण गोष्ट मानली जायची, रन्स करणं. यामागचं कारण होतं त्याकाळचे बॉलर्स. ग्लेन मॅकग्रा, शोएब अख्तर, अॅलन डोनाल्ड, ब्रेट ली, शेन बॉण्ड, वसीम अक्रम, चामिंडा वास ही खतरनाक टोळी त्याकाळी भल्याभल्या फलंदाजांना घाम फोडायची.
यातले काही जण असे होते की त्यांच्या वेगाची दहशत होती, काहींचा टप्पा डेंजर होता आणि काही हातभर स्विंग करण्यात मातब्बर होते.
ही वरची सगळी फळी प्रचंड फेमस झाली, आजही त्यांच्यातल्या एकाचं जरी नाव घेतलं तरी आपल्याला क्रिकेटमधला बॉलिंगचा सुवर्णकाळ आठवतो. पण याच फळीतला तरी यांच्यापेक्षा वेगळा भिडू होता तो म्हणजे शॉन पोलॉक.
गोरा वर्ण, करारी डोळे, तांबूस केस आणि चेहऱ्यावर कायम हसू. त्या तांबूस केसांमुळेच पोलॉकला नाव पडलेलं जिंजर निंजा. कार्टून आणि पिक्चरमध्ये दिसणारे निंजा कार्यकर्ते जसं झटकन येऊन आपलं काम करुन बाजूला जातात, पोलॉक अगदी तसाच होता. तो कधी कुणाला स्लेज करण्याच्या भानगडीत पडला नाही, त्यानं कुठला वाद ओढवून घेतला नाही. त्यानं विकेट्स काढल्या, रन्स केले आणि आपला बॅटन पुढं सोपवला.
या सगळ्यात पोलॉकला यश प्रचंड मिळालं, मात्र प्रसिद्धीच्या रकानातल्या बऱ्याच जागा कोऱ्या राहिल्या.
वडील क्रिकेटर, काका क्रिकेटर, इतर दोन तीन नातेवाईकही क्रिकेटमध्येच. पण तरीही आफ्रिकन क्रिकेटमध्ये घराणेशाही चालणारी नव्हतीच. पोलॉकनं आपल्या टॅलेंटच्या जोरावर आफ्रिकेच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवलं. सुरुवात झालेली बॉलर म्हणून, पण त्याच्यातलं बॅटिंग स्किलही इतकं भारी होतं, की पोलॉक कायम ऑलराउंडर म्हणूनच ओळखला गेला.
पोलॉकच्या नावावर टेस्ट मॅचेसमध्ये विकेट्स आहेत, ४२१ आणि वनडेमध्ये हा आकडा आहे ३९३. एखाद्या प्रॉपर बॉलरपेक्षा भारी कामगिरी त्यानं बॉलिंग डिपार्टमेंटमध्ये केली. पण त्याहीपेक्षा भारी गोष्ट होती, त्यानं बॅटिंगच्या जोरावर जिंकून दिलेल्या मॅचेस.
२००७ मध्ये ऍफ्रो-आशिया कपचं आयोजन करण्यात आलं होतं.
झहीर खान, मोहम्मद आसिफ, जयसूर्या, हरभजन अशी तगडी बॉलिंग लाईनअप आशिया इलेव्हनकडे होती. या असल्या बॉलिंगसमोर आफ्रिकेचा स्कोअर झाला होता, ७ आऊट ८७ रन्स. एबीडी, डिपानेर, बाऊचर, जस्टीन केम्प कुणीच टिकलं नाही. पण पोलॉक वाघासारखा भिडला.
त्यानं ११० बॉलमध्ये १३० रन्स चोपले आणि तेही सातव्या नंबरवर बॅटिंगला येऊन. वनडे क्रिकेटमध्ये सातव्या नंबरच्या बॅट्समननं केलेला तो त्यावेळचा हायेस्ट स्कोअर होता. मात्र हा रेकॉर्ड टिकला फक्त, ४ दिवस. आपल्या धोनीनं त्याच सिरीजमध्ये हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.
शॉन पोलॉकचा अचूक टप्पा, मोठमोठे स्पेल टाकण्याचा स्टॅमिना, संघाच्या गरजेनुसार खेळात बदल करायची ताकद, या गोष्टींबाबत कायम चर्चा केली जाते. पण पोलॉकला मोठं बनवणारे तीन किस्से सांगणं गरजेचं आहे.
पोलॉक आणि दारू –
हर्शेल गिब्सचं नाव घेतल्यावर त्यानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या जगप्रसिद्ध ४३८ मॅचमध्ये केलेली बॅटिंग आठवते. पण लगेचच सांगितलं जातं की, गिब्सनं ही बॅटिंग दारुच्या नशेत केली. त्याच्या एवढ्या बाप इनिंगला दारुच्या नशेमुळं बट्टा लागला तो कायमचाच.
गिब्स स्वतःच एका ठिकाणी सांगतो की, “पोलॉक मात्र कधीच दारु प्यायचा नाही. तुम्ही त्याला फसवून दारू द्या किंवा अर्धा ग्लास पिण्याचा आग्रह करा, याचा निश्चय काही बदलायचा नाही.” दारू पिणं चूक की बरोबर हा वेगळा विषय, पण एखादी गोष्ट ठरवल्यावर आयुष्यभर त्यावर ठाम राहणं फार कमी लोकांना जमतं, पोलॉक त्यातलाच एक.
पोलॉक आणि कॅप्टन्सी –
पोलॉक साऊथ आफ्रिकेच्या कॅप्टन्सीवरुन कसा बाजूला झाला, हे पुढच्या किश्श्यात बघू. पण कॅप्टन्सी काढून घेतल्यावर बऱ्याच प्लेअर्सचा फॉर्म गंडतो. लीडरशिपची सवय पटकन मोडता येत नाही आणि याचा परिणाम खेळावर होतो. पोलॉक इथंही अपवाद होता. खरंतर टीमचा सगळ्यात ज्येष्ठ प्लेअर असलेल्या पोलॉकची कॅप्टन्सी गेल्यावर ती फक्त २२ वर्षांच्या ग्रॅमी स्मिथला देण्यात आली होती.
पण याचा परिणाम त्याच्या खेळावर झाला नाही. फॉर्म इतका मेंटेन राहिला की, टीममध्ये डेल स्टेन असतानाही बऱ्याचदा नवा बॉल हातळण्याची जबाबदारी पोलॉकवरच असायची. कॅप्टन्सी गेल्यावर त्यानं टेस्टमध्ये १४३ विकेट्स काढल्या आणि वनडेमध्ये १२५.
चुकलेलं गणित आणि ठाम पोलॉक –
२००३ मध्ये शॉन पोलॉककडे आफ्रिकन संघाचं नेतृत्व होतं. ऑलराउंडर पोलॉक चमत्कार घडवून आणेल अशी अगदी दाट शक्यता होती. लीग स्टेज मधला अखेरचा सामना, आफ्रिकेला फक्त जिंकायचं होतं. श्रीलंकेनं २६८ रन्स बोर्डावर लावले होते. रन्सचा पाठलाग करताना पाऊस पडला, डकवर्थ लुईस नियम लागला.
आफ्रिकन प्लेअर्सनं आकडेमोड केली आणि त्यांच्यानुसार विजयाचं गणित आलेलं २२९ रन्स. लास्ट ओव्हरच्या पाचव्या बॉलवर आफ्रिकेनं २२९ रन्स केले. सगळ्यांना वाटलं आफ्रिका जिंकली आणि शेवटच्या बॉलवर शॉट मारुनही बाऊचर पळालाच नाही. प्रत्यक्षात आफ्रिका विजयापासून एका रननं दूर राहिली आणि पुन्हा एकदा त्यांचं वर्ल्डकप जिंकायचं स्वप्न हुकलंच.
या चुकलेल्या गणितावरुन आफ्रिकन टीमवर प्रचंड टीका झाली. क्रिकेट बोर्डानं थेट पोलॉकच्या राजीनाम्याची मागणी केली. पण पोलॉकचं मत इथंही ठाम होतं. तो म्हणाला, “सगळ्या ड्रेसिंग रुमच्या चुकीसाठी मी एकटा राजीनामा देणार नाही, तुम्हाला मला काढून टाकावं लागेल.”
याच पार्श्वभूमीवर पोलॉक पत्रकार परिषदेला सामोरं गेला, प्रश्नांचा मारा होईपर्यंत त्यानं पॉईंट्स काढून ठेवले आणि न चिडता, न ओरडता पत्रकार परिषद पार पडली. हे संपेपर्यंत बातमी आलीच, की पोलॉकची कॅप्टन्सी गेली. त्यालाही परिणाम माहिती होता, पण तो झुकला नाही.
विकेट्स, रन्स, रेकॉर्ड्स यांचं मोठं पाठबळ घेऊन जेव्हा पोलॉक रिटायर झाला तेव्हा त्याला निरोप द्यायला आफ्रिकन चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली होती. भारत असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा साऊथ आफ्रिका मैदानावरचे क्रिकेटर्स आपल्यासाठी हिरो असतात, यात शंका नाही. पोलॉक लोकांसाठी या लेव्हलचा हिरो होता, की त्याच्या रिटायरमेंटवेळी बॅनर झळकलेले…
“Polly for President!”
आपल्या जवळपास १३-१४ वर्षांच्या करिअरमध्ये पोलॉकनं क्रिकेटला बरंच काही दिलं, मात्र स्वतःची आणि खेळाची आब राखून. बाऊचर आणि कंपनीचं गणित चुकलं असलं, तर कदाचित आफ्रिकेवरचा चोकर्सचा शिक्का पुसला गेला असता आणि शॉन पोलॉक आफ्रिकन क्रिकेटचा बादशहा ठरला असता.
पण बादशहा न ठरताही पॉली आपल्या लक्षात राहतो, म्हणूनच म्हणता येतं की दुसरा शॉन पोलॉक मिळणं शक्य नाही!
हे ही वाच भिडू:
- क्रोनिए हिरो की व्हिलन याचं उत्तर मिळतं, पण त्याच्या मृत्यूच्या कारणावर विश्वास बसत नाही
- क्रिकेट किटमध्ये शेणाचा तुकडा ठेवणारा आफ्रिकन कट्टर गोरक्षक : मखाया एन्टिनी
- भारतातला एकमेव बाप ज्यांनी पोराला इंजिनियरिंग सोडून क्रिकेटमध्ये करियर करायला लावलं ….