अशा प्रकारे ६४ वर्षांपूर्वी अरबांच्या दुबईत पहिलं हिंदू मंदिर बांधण्यात आलं…

दुबई शहरातील हिंदू मंदिर आज सगळ्यांना दर्शनासाठी उघडण्यात आलंय. ४ ऑक्टोबर २०२२ ला रात्री युएईचे मिनिस्टर ऑफ टॉलरेन्स शेख नाहयान बिन मुबारक अल नाहयान आणि भारताचे यूएईमधील राजदूत संजय सुधीर यांच्या उपस्थितीत या मंदिराचं उदघाटन करण्यात आलं. मात्र सामान्य नागरिकांच्या दर्शनाची सुरुवात आजपासून झालीय. 

‘हिंदू हाऊस ऑफ वॉरशिप’ नावाचं हे मंदिर जेबेल अली गावाच्या स्ट्रीट ऑफ टॉलरेन्सवर बांधण्यात आलंय. या मंदिराच्या बांधकामात अरबी आणि भारतीय वास्तुशैलीचा वापर करण्यात आलाय. सिमेंट काँक्रीट आणि संगमवरी दगडाचा वापर करून बांधण्यात आलेल्या या मंदिरात १६ देवी देवतांच्या मूर्तींची स्थापना करण्यात आलीय.

पण हे मंदिर बांधण्याच्या ६४ वर्षांपूर्वीच दुबईत पहिलं हिंदू मंदिर सुरु करण्यात आलं होतं.

यूएई आणि खाडीच्या देशात तेल आणि सोन्यावर आधारित उद्योग सुरु झाले तेव्हापासून भारतातील लोकं खाडीच्या देशात स्थलांतरित होत आहेत. यामध्येच १९५० च्या दशकात थोड्या फार संख्येने हिंदू लोक सुद्धा दुबईत स्थलांतरित झाले होते.

हळूहळू दुबईतील हिंदूंची संख्या ६ हजारावर पोहोचली. तेव्हा हिंदूंना पूजा अर्चनेसाठी मंदिराची आवश्यकता लक्षात घेऊन १९५८ मध्ये दुबईतील पहिलं हिंदू मंदिर बांधण्यात आलं होतं. दुबई शहराच्या जुन्या भागातील ‘बुर दुबई ओल्ड सुक’ नावाच्या दुकानाच्या कॉम्प्लेक्स मध्ये मंदिराची निर्मिती करण्यात आली होती. या मंदिराची व्यवस्था भारताच्या वाणिज्य दूतावासाकडून चालवली जाते. 

दुबईचे तत्कालीन शेख रशीद बिन सईद अल मकतुम यांनी, दुकानांच्या गाळ्यांवर असलेल्या मजल्यावर या मंदिराची स्थापना करण्याची परवानगी दिली होती. 

या मंदिरात सुरुवातीला दोन देवतांसाठी गर्भगृह बांधण्यात आलेले होते. त्यात पहिल्या गर्भगृहात महादेव आणि दुसऱ्या गर्भगृहात श्रीकृष्णाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. तर नंतर साई बाबांच्या मूर्तीसाठी तिसरं गर्भगृह बांधण्यात आलं होतं. पण या मंदिरात एकावेळी केवळ १५ लोकच व्यवस्थितरीत्या दर्शन घेऊ शकतात. त्यामुळे लोकांना धार्मिक पूजापाठ आणि सणउत्सव चांगल्या पद्धतीने साजरे करता येत नव्हते. 

हे मंदिर दुकानांच्या गाळ्यांवर बांधण्यात आलंय त्यामुळे याचं बांधकाम दुकानाच्या कॉम्प्लेक्सरखंच दिसतं. या मंदिरात जाण्यासाठी दुकानाच्या कॉम्प्लेक्समधील छोट्या छोट्या बोळांमधून जावं लागतं. या मंदिराच्या दोन्ही बाजूंना पूजेच्या साहित्यांची दुकानं आहेत. मात्र हा वर्दळीचा भाग असल्याने इथे मोठ्या प्रमाणावर गोंगाट असतो. सरकारने गोंगाटाचा आवाज टाळण्यासाठी ध्वनिरोधक भिंतींचं बांधकाम केलंय मात्र ते पुरेसं नाही. 

हे मंदिर अतिशय मर्यादित जागेत आहे आणि बाजूच्या भागाचा वापर स्टोर रूम सारखा करण्यात येतो त्यामुळे मंदिर परिसर अडगळीसारखं दिसत आहे. त्यामुळे चांगल्या आणि भव्य मंदिराची निर्मिती करण्यात यावी अशी हिंदू धर्मातील लोकांकडून मागणी करण्यात येत होती.

मंदिर मुळात लहान होतंच पण गेल्या ६४ वर्षांमध्ये दुबईतील हिंदू धर्मियांची संख्या सुद्धा मोठ्या संख्येने वाढली आहे.

१९५८ सालात यूएई मध्ये ६ हजाराच्या आसपास हिंदू धर्मीय राहत होते. पण गेल्या ६४ वर्षात यात वाढ झालेली आहे. आजच्या घडीला यूएईत अंदाजे १२.५ लाख हिंदू लोकं राहतात. या वाढलेल्या लोकसंख्येला पुरेसं असेल असं हिंदू मंदिर बांधण्यात यावं अशी मागणी वेळोवेळी करण्यात येत होती. त्यातूनच आता दुबईमध्ये प्रशस्त हिंदू मंदिर बांधण्यात आलंय. 

सिंधी गुरु दरबार या मंदिराचा विस्तार करून, तब्बल ७० हजार चौरस फूट क्षेत्रफळावर हे मंदिर बांधण्यात आलंय. यात एकूण १६ देवतांच्या मुर्त्यांची स्थापना करण्यात आली आहे.

इथे स्थापन केलेल्या मुर्त्या मध्यप्रदेशातील मंडला येथील मुर्त्यांप्रमाणे आहेत. या मुर्त्या जयपूर, मदुराई, कन्याकुमारीतल्या मूर्तिकारांनी कोरलेल्या आहेत. 

या मंदिरात भव्य सभामंडप आहे, भिंतींवर थ्रीडी प्रिंटिंग असलेलं भव्य कमळाचं फुल बनवण्यात आलेलं आहे. मंदिरातील खांब हे गुजरातमधील सोमनाथ मंदिरासारखे आहेत. तर मंदिराचे शिखर नगर शैलीतले आहेत. या मंदिराचे सर्व शिखर पितळेचे असून या मंदिराच्या बांधकामात एकूण ५५० करोड रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.

या मंदिरात वैदिक भाषेसंबंधी डिजिटल लायब्रेरी आणि गरजूंसाठी मेडिकल आणि एज्युकेशनल सुविधा सुद्धा निर्माण करण्यात आल्या आहेत. तर दररोज तब्बल १ हजार लोकांसाठी जेवण बनवण्याची क्षमता असलेलं स्वयंपाकगृह सुद्धा यात बांधण्यात आलेलं आहे. 

या मंदिरात दर्शन करण्यासाठी क्यूआर कोडचा वापर करून बुकिंग करावी लागेल त्यांनंतरच या मंदिरात धार्मिक कार्य करण्यासाठी आणि दर्शनाला परवानगी देण्यात येणार आहे. ६४ वर्षानंतर पूर्वीच्या छोट्याश्या मंदिराऐवजी प्रशस्त मंदिर बांधण्यात आलय म्हणून याची चर्चा केली जात आहे. पण या मंदिरामुळे हिंदू धर्मियांना धार्मिक समारंभ आणि कार्यक्रम करण्यासाठी हक्काची जागा मिळणार आहे हे नक्की. 

हे ही वाच भिडू 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.